Monday 31 August 2020

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

No comments:

Post a Comment