झिम्बाब्वे स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशाचे पहिले पंतप्रधान आणि नंतर अध्यक्ष अशी रॉबर्ट मुगाबे यांची ओळख. त्यांनी लोकशाही व समेटाचे आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली; पण नंतर ते देशाच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते. त्यांच्या निधनाने झिम्बाब्वेतील ३७ वर्षांच्या दडपशाहीचा कालखंड पडद्याआड गेला आहे.
हरारेजवळच्या कुटामा मिशन येथे १९२४ साली कॅथलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते शिक्षक झाले.
नंतर मार्क्सवादाकडे झुकलेल्या मुगाबेंनी द. आफ्रिकेतील फोर्ट हारे विद्यापीठातून शिक्षण घेतले. तिथे द. आफ्रिकेतील राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली.
घाना येथे अध्यापन करीत असताना मुगाबेंवर तिथले क्रांतिकारी नेते क्वामे एन्क्रुमाह यांचा प्रभाव पडला. नंतर ते ऱ्होडेशियात परतले आणि स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झाले. दहा वर्षे तुरुंगवासात राहिले.