Thursday 21 October 2021

काही जुन्या पण महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

🌷झूल

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.

🌷आंबवणी, चिंबवणी

शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात.

🌷वाफा, सारा

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.

🌷खांदमळणी

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.

🌷कंडा

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.

🌷चाळ

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात.

🌷शेंट्या

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.

🌷आडणा

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.

🌷फण

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात *फण* बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.

🌷भूयट्या

जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला भूयट्या म्हणतात.

🌷रूमण

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.

🌷उभाट्या

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...