Wednesday 16 March 2022

लोकसभेत मोदींचा जयघोष.

◼️पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जयघोषा’मुळे लोकसभेचे सभागृह सोमवारी सकाळी दणाणून गेले! मोदी सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी ‘मोदी-मोदी’चा उद्घोष केला आणि बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

◼️संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू होताच मोदी लोकसभेत आले. त्या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सदस्यांना सभागृहाच्या विशेष कक्षात बसलेल्या परदेशी पाहुण्यांची माहिती देत होते.

◼️ऑस्ट्रियाच्या संसदेतील सदस्यांचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून ते सोमवारी लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी सभागृहात उपस्थित होते.

◼️त्याच वेळी मोदी सभागृहात आल्यामुळे बिर्लाना बोलणे थांबवावे लागले. भाजपच्या सदस्यांनी मोदींचे स्वागत इतक्या उत्साहात केले की, अखेर बिर्लाना सदस्यांना मोदींच्या नावाने होणाऱ्या घोषणा थांबवण्याची विनंती करावी लागली.

◼️पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये बहुमताने विजय मिळवला.

◼️भाजपच्या या यशाचे श्रेय फक्त मोदींना असल्याचे लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी दाखवून दिले. मोदींचे स्वागत होत असताना सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी भाजपचे ज्येष्ठ नेते, तर विरोधी बाकांवर सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी आदी नेते उपस्थित होते.

चीनमध्ये करोनाची दोन वर्षांतली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या

♦️चीनमध्ये सध्या नोंदली जाणारी करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ही दोन वर्षांतील सर्वाधिक असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. तेथे २४ तासांत सरासरी सुमारे दोन हजार रुग्ण नोंदले जात आहेत.

♦️मध्यवर्ती चीनमध्ये शनिवारी करोनाचे नवे १८०७ रुग्ण नोंदले गेले. हे सर्व स्थानिक संक्रमणाचे रुग्ण आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या १३१ जणांचे करोना अहवाल होकारात्मक आले आहेत, अशी माहिती आयोगाने रविवारी दिली. आयोगाने म्हटले आहे की, जिलनव्यतिरिक्त शान्डाँगमध्ये १७५, गुआंगडाँगमध्ये ६२, शान्स्कीमध्ये ३९, हेबईमध्ये ३३, जियांग्सूमध्ये २३ आणि तिआनजिनमध्ये १७ रुग्ण नोंदले गेले आहेत. देशाच्या विविध भागांची एकत्रित दैनंदिन रुग्णसंख्या ही सुमारे दोन हजार असून ती दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. बीजिंगमध्येही २० रुग्ण आढळून आले आहेत.

♦️नवे रुग्ण ओमायक्रॉनचे - चीनच्या जिलिन प्रांतात नवे १४१२ स्थानिक रुग्ण आढळून आले. या प्रांताच्या राजधानीचे शहर असलेल्या चंगचूनमध्ये गेल्या शुक्रवारपासून टाळेबंदी लागू केली आहे. या शहरातील ९० लाख लोक टाळेबंदीचे निर्बंध पाळत आहेत. येथे वेगाने प्रसार होणाऱ्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या युचेंग शहरातही टाळेबंदी लागू केली आहे. हे शहर शान्डाँग प्रांतात आहे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...