Monday 7 December 2020

क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म


▪️जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.


▪️जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.


▪️विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.


▪️ उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्‍लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.


▪️जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.


▪️जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.


▪️ पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.



⭕️ क्षारयुक्त जमिनींची सुधारणा ⭕️


▪️ शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.


▪️शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.


▪️ सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा.


▪️जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.


▪️ हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.


▪️ भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.


▪️सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू.

नोंगपोक सेकमई (थौबल, मणीपूर): 2020 या वर्षात देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस ठाणे.



देशातल्या पोलीसांना अधिक परिणामकारकरीत्या त्यांचे काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे आणि कार्यक्षमतेबाबत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने भारत सरकार दरवर्षी देशभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पोलीस ठाण्यांची यादी जाहीर करते.


2020 या वर्षात देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रथम 10 पोलीस ठाण्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे -


नोंगपोक सेकमई (थौबल, मणीपूर)

AWPS-सुरामंगलम (सालेम सिटी, तामिळनाडू) खारसांग (चांगलांग, अरुणाचल प्रदेश) झिलमिल (भैया थाना) (सूरजपूर, छत्तीसगड)

संगुइम, दक्षिण गोवा कालीघाट (उत्तर व मध्य अंदमान, अंदमान व निकोबार बेटे)

पाकयोंग (पूर्व जिल्हा, सिक्किम)

कंठ (मुरादाबाद, उत्तरप्रदेश)

खानवेल (दादर व नगर हवेली)

जम्मीकुंटा टाउन पोलीस स्टेशन (करीमनगर, तेलंगणा)


▪️परस्कारासाठीचे निकष


प्रत्येक राज्यातल्या एकूण ठाण्यांपैकी उत्तम कामगिरी करणाऱ्या काही पोलीस ठाण्यांची निवड करताना खालील गुन्ह्यांबाबत केलेल्या कार्यवाहीचे निकष लावण्यात आले:


मालमत्तेच्या वादासंदर्भातील गुन्हे

महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे

समाजातील दुर्बल घटकांविरोधातील गुन्हे

हरविलेल्या व्यक्तींचा शोध, सापडलेल्या अनोळखी व्यक्ती आणि ओळख न पटलेले मृतदेह यांच्यासंदर्भातील पुढील कार्यवाही

अंतिम टप्प्यात 19 मानकांच्या कसोटीवर तत्पर सेवा आणि कामाचा दर्जा उंचावण्यासाठी नव्या तंत्रांचा उपयोग यांच्यासंदर्भात निष्कर्ष, पोलीस ठाण्यांमधील पायाभूत सुविधा, पोलीसांची उपलब्धता आणि त्या-त्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेतल्या नागरिकांचे अभिप्राय तपासण्यात आले. 



UN चा ऐतिहासिक निर्णय, गांजा ड्रग्स नव्हे तर औषध ! भारतासह २७ देशांनी केलं समर्थन



संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी हा निर्णय घेतला आहे.


जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. यासाठी झालेल्या मतदानात २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर, चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले. “या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकिय फायद्यांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सध्या ५० पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.

देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातील सर्वच अपात्र



केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला  नाही.


केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार दिला जातो. २०२० मधील दहा पोलीस ठाण्यांची यादी गुरुवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला पहिला पुरस्कार मिळाला. दुसरा क्रमांक तमिळनाडूतील सालेम शहर तर तिसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशमधील चँगलँग जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला मिळाला.


महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर- हवेली खानवेल पोलीस ठाण्याचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.


गोवा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील पोलीस ठाण्यांचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही. 

देशात लस काही आठवडय़ांत



नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असल्याने पुढील काही आठवडय़ांत लस उपलब्ध होऊ शकेल. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दिल्यानंतर लगेच लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली.


लसीकरणाचे प्राधान्यक्रमही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आदी करोनायोद्धे, तर पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा, सफाई कामगार हे आघाडीचे योद्धे, गंभीर व्याधिग्रस्त व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. या प्राधान्यक्रमाची यादी राज्यांकडून मागवली जात आहे. राज्यांच्या सूचनेनुसार लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.


शारीरिक अंतर नियम, मुखपट्टीचा वापर हे करोना प्रतिबंधक नियम कोणत्याही परिस्थितीत पाळले गेले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी.



आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे.


महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व 30 नोव्हेंबरला मुळे तयार झाले आहेत.


ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड करण्यात आली होती.


वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला.


मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ 27 दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती. ते मुळे 2021 मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.


तसेच आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे.


अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.

पूर्व हिंद महासागर प्रदेशात रशिया आणि भारत यांच्या नौदलांचा पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)



भारतीय नौदलाने 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत पूर्व हिंद महासागर क्षेत्रात रशियाच्या नौदलासोबत ‘पॅसेज एक्झरसाइज (PASSEX)’ नामक सराव केला.


ठळक बाबी


या सरावात RuFN मार्गदर्शित क्षेपणास्त्र जहाज ‘वर्याग’, मोठे पाणबुडी-भेदी जहाज ‘अॅडमिरल पॅन्टेलेयेव’ आणि मध्यम ओशन टँकर ‘पेचेंग’ या जहाजांचा समावेश होता. 


भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व हेलिकॉप्टरसह स्वदेशी बनावटीची मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट ‘शिवालिक’ आणि ‘कदमत’ हे पाणबुडीरोधी जहाजाने केले.

या सरावाचा उद्देश आंतरपरिचालन वाढवणे, सामंजस्य सुधारणे आणि मैत्रीपूर्ण नौदलांमधील उत्कृष्ट पद्धती आत्मसात करणे हा असून उन्नत पृष्ठभाग आणि पाणबुडीविरोधी युद्ध कवायती, शस्त्रास्त्र गोळीबार, सीमॅनशिप कवायती आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.


परस्परांच्या बंदरांना भेटीदरम्यान किंवा समुद्रातल्या भेटीच्या वेळी परदेशी मित्रदेशांमधल्या नौदलासोबत भारतीय नौदल नियमितपणे PASSEXचे आयोजन करीत आहे. 


पूर्व हिंद महासागर प्रदेशात आयोजित केला जाणारा हा सराव दोन्ही देशांमधले दीर्घकालीन सामरिक संबंध आणि विशेषत: सागरी क्षेत्रातले संरक्षण सहकार्य प्रतिबिंबित करतो.


रशिया देश


रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी आहे. रूबल हे रशियाचे राष्ट्रीय चलन आहे. 

भारतातही लसवापरासाठी ‘फायझर’चा अर्ज



‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. 


ब्रिटनने या लशीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली  आहे.


आता भारताने या लशीला परवानगी दिली तर ती येथेही उपलब्ध होईल, पण आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या लशीची गरज नसल्याचे प्रतिपादन यापूर्वी केले आहे.


तर आपल्याकडे 2—3 लशींची निर्मिती होत असताना या महागडय़ा लशीची खरेदी करण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ही लस साठवण्यासाठी उणे 70 अंश तापमान लागते.


ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायझर लशीच्या मदतीने कोविड 19 लसीकरण सुरू करण्यात येणार  आहे.


बहारिननेही या लशीला मान्यता दिली असून फायझरने भारतातही ही लस निर्यात करता यावी यासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे.


नवीन औषधे व वैद्यकीय चाचण्या नियम 2019  मधील विशेष तरतुदीखाली फायझर कंपनीने परवानगीसाठी अर्ज केला आहे.

लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे निधन



गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख आणि लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे चेन्नईतील रुग्णालयात फुफ्फुसाच्या विकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.


दिनेश्वर शर्मा यांच्याविषयी 

ते केरळ केडरचे 1976 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 


1994 ते 1996 दरम्यान ते काश्मीरमध्ये आयबीचे सहाय्यक संचालक होते आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजधानीतील ब्युरोच्या काश्मीर डेस्कवर सेवारत होते. 


डिसेंबर 2014 मध्ये त्यांना दोन वर्षांसाठी आयबीचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. 


जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करण्यासाठी शर्मा यांची 2017 मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 


ऑक्टोबर 2019 मधे शर्मा यांची लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

व्हाइट हाउस सोडण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार, पण ठेवली ‘ही’ अट



अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाइट हाउस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासाठी त्यांनी एक अट ठेवलीये. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं महत्त्वाचं विधान ट्रम्प यांनी केलं आहे.


निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी , जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना निवडणुकीचा विजेता ठरवलं तर मी निश्चितपणे व्हाईट हाऊस सोडेन असं म्हटलं. या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. तसंच, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केलं तर ती त्यांची मोठी चूक ठरेल असंही ट्रम्प म्हणाले.


डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.


दरम्यान, इलेक्टोरल कॉलेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील अशी माहिती आहे. 

‘जलीकट्टू’ चित्रपट: 93व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून नामांकन



“जलीकट्टू” या मल्याळम चित्रपटाला आगामी 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन प्राप्त झाले. यासह 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात भारताने अधिकृत प्रवेश केला आहे.


🌸ठळक बाबी


हा चित्रपट परदेशी भाषा चित्रपट या विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.


फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने ‘जलीकट्टू’ चित्रपटाची निवड केली.“जलीकट्टू” चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी हे आहेत.


‘जलीकट्टू’ हा चित्रपट केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते.

ऑस्कर पुरस्काराविषयी


"ऑस्कर पुरस्कार" या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतल्या चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS) तर्फे 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.


दिनांक 11 मे 1927 रोजी ‘अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता.

देश मंदीच्या छायेत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मायनसमध्ये.



करोनाचं संकट, लॉकडाउन या सगळ्यामुळे आपला देश मंदीच्या छायेत आहे हे स्पष्ट होताना दिसतं आहे. कारण सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर उमे २३.९ टक्के इतका नोंदवला गेला झाली होती. आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली. मागील चाळीस वर्षात पहिल्यांदा जीडीपीमध्ये इतकी घसरण झाली आहे.


पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक अशी उणे २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर आता दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५ टक्के घसरण झाली आहे. या आकडेवारीमुळे देश आर्थिक मंदीच्या छायेत आहेत हे स्पष्ट होतं आहे. दोन तिमाहीमध्ये जीडीपी म्हणजेच विकासदर हा उणे राहिला तर तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत असल्याचं म्हटलं जातं.


बांधकामासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ५० टक्के तर उत्पादन क्षेत्रात ४० टक्के घसरण झाी आहे. ही दोन क्षेत्र भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतात.कोणत्याही अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी वस्तूंना असलेल्या मागणीचा आणि खरेदीचा मोठा वाटा असतो. या काळात ६० टक्के घसरण झाली कमी झालेलं उत्पन्न, अनेकांचे रोजगार गेल्याने वाढलेलं बेरोजगारीचं प्रमाण यामुळे लोकांनी खर्च कमी केले आणि उद्योगांनी गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं. करोनाच्या जागतिक संकटामुळे अनेक लहान उद्योग कोलमडून पडले त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. 

इडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ सादर


◾️इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी त्याच्या मंचावर ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी PNB मेटलाइफ इंडिया विमा कंपनी सोबत करार केला.


◾️विशेषत: भारतातल्या बँकिंग व्यवस्था उपलब्ध नसलेल्या तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा करार झाला आहे.


🔷परधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे स्वरूप...


◾️परधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नावनोंदणी करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 50 वर्ष आहे.


◾️विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून नामनिर्देशित व्यक्तीला 2 लक्ष रुपयांपर्यंत विम्याची रक्कम दिली जाते. योजनेच्या अंतर्गत विमा हस्तांतरित केला जाऊ शकत नाही तसेच अवधी संपल्यानंतर कोणताही लाभ दिला जात नाही.

ग्राहकाच्या बचत खात्यातून दरवर्षी हप्ता वजा केला जातो.


🔷इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) विषयी


◾️इडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) भारत सरकारच्या 100 टक्के मालकीची देयक बँक आहे. त्याची स्थापना दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या टपाल कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आली. IPPB प्रायोगिक प्रकल्प म्हणून 30 जानेवारी 2017 रोजी रांची (झारखंड) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे कार्यरत करण्यात आले होते. त्याचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते.

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.



चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.तर मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे.


तसेच 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या 59 उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अन्वये बंदी घालण्यात आली.

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार



महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.


सोलापूरमध्ये होणार पुरस्कार वितरण - यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.

10 उपग्रहांसोबत ISROच्या ‘PSLV-C49’ प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण.



भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 7 नोव्हेंबर 2020 रोजी त्याचा ‘EOS-01’ ('अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट') याचे यशस्वी प्रक्षेपण केले. उपग्रह PSLV-C49 या प्रक्षेपकाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आला.


या मोहिमेत अमेरिका आणि लक्जमबर्गचे प्रत्येकी चार आणि लिथुआनियाच्या एका उपग्रहासह नऊ उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले.


आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. ही यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम आहे.


▪️EOS-01 ची वैशिष्ट्ये


‘EOS-01’ हा रेडार इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. त्यामध्ये सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) प्रस्थापित करण्यात आले आहे, जे कुठल्याही वेळी आणि कोणत्याही प्रकारच्या हवामानात पृथ्वीची स्पष्ट छायाचित्रे घेऊ शकते. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याद्वारे ढगांच्या आड असतानाही पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्र टिपले जाऊ शकते.

Online Test Series

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...