Ads

25 April 2022

अनुसूचित जाती व जमाती - लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी

अनुसूचित जाती व जमाती -

लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी:

स्वातंत्र्योत्तर काळात वरील योजनांच्या साह्याने अनुसूचित जातींची प्रगती झाली आहे. या जातींच्या साक्षरतेचे प्रमाण १९३१ मध्ये असलेल्या १·९ टक्क्यांवरून १९६१ मध्ये १०·२७ टक्क्यांवर गेले. तसेच १९४४-४५ला शिष्यवृत्तिधारकांची संख्या ११४ होती, ती १९६४-६५ मध्ये ७५,१४६ झाली. १९४४-४५ सालापासून १९६४-६५ पर्यंत एकूण ४,६२,२९६ शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या आणि त्याकरिता एकूण १९३०-७९ लक्ष रुपये खर्च झाले. या जातींच्या मुलांना तांत्रिक व धंदेशिक्षणासाठी संक्षणसंस्थांत राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

सरकारी नोकरीतही अनुसूचित जातींसाठी राखीव जागा आहेत. अखिल भारतीय पातळीवर खुल्या स्पर्धांच्या जागांसाठी १२ १/२ टक्के जागा अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत नोकरीसाठी नियुक्त केलेली कमाल वयोमर्दाही कायद्याने पाच वर्षांनी वाढविली आहे. वरच्या पादावरील बढतीसाठी या जातींसाठी १५ टक्के राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जातींच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी शासनाने इतरही योजना आखल्या आहेत. मागासलेल्या वर्गांच्या घरबांधणीसाठी शासनाने पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांमधून एकूण सु. २० कोटी रूपये खर्च केले. काही राज्य सरकारांनी तर त्यांसाठी खास वसाहती बांधल्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही या कामी केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदान देते.

अनुसूचित जातींसह सर्व मागासवर्गांच्या आरोग्यरक्षणार्थ शासनातर्फे सु. ४,००० दवाखाने व प्रसूतिगृहे १९६१ पर्यंत नव्याने उघडली आहेत. तसेच फिरते दवाखाने, मलेरिया-निर्मूलन-केंद्रे, बालक-कल्याण-केंद्रे वगैरे मार्गांनीही आरोग्यरक्षणार्थ प्रयत्न करण्यात येतात. औषधखरेदी व मोठ्या आजारातील औषधोपचार यांसाठीही शासन या लोकांना आर्थिक मदत देते. याशिवाय योग्य मुबलक पाण्याचा पुरवठा होण्यासाठी विहिरी खोदणे, तलाव बांधणे इ. बाबतीत केंद्र सरकार व राज्य सरकारे यांनी सु. ८ कोटी रुपये १९६१ पर्यंत खर्च केले आहेत. शासकीय प्रेरणेने स्थानिक स्वराज्य संस्थाही या बाबतीत कार्य करीत असतात.

अनुसूचित जातींसंबंधीच्या योजना कार्यान्वित होऊन, त्यासंबंधीच्या संविधानात्मक तरतुदी पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाहीत व नसल्यास त्यासंबंधी कोणती उपाययोजना करावी, यासाठी केंद्रीय गृहखात्यात एक स्वतंत्र विभाग उघडला आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये राष्ट्रपतींनी अनुसूचित जाती-जमातींसाठी एका आयुक्ताची नेमणूक केली आहे. आपल्या नऊ उपआयुक्तांच्या मदतीने अशा जमातींच्या प्रगतीचा आढावा घेणे, नवीन सूचना करणे, खाजगी संस्थांना मदत देणे, घटक राज्यांतील या जातींच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या शासकीय व अशासकीय संस्थांना आर्थिक मदत व सल्ला देणे आणि त्यांचे हिशोब तपासणे इ. कामे तो करतो.

लोकप्रतिनिधींच्या सल्ल्याचा उपयोग अनुसूचित जातींच्या प्रगतीसाठी करून घेण्याकरिता केंद्र शासनाने ‘सेंटल अ‍ॅडव्हायसरी बोर्ड फॉर हरिजन वेलफेअर’ या मंडळाचीही स्थापना केली आहे. याशिवाय केंद्र व राज्य शासन निरनिराळ्या परिषदा व परिसंवाद भरवून अनुसूचित जातींच्या प्रगतीविषयी विद्वानांचा सल्ला घेत असते. अस्पृश्यतेची समस्या आणि अनुसूचित जातींचे आर्थिक व शैक्षणिक उन्नतीचे प्रश्न यांचा विचार करण्याकरिता एप्रिल १९६५ मध्ये श्री. एल्. इलियापेरूमल यांच्या अध्यतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने जानेवारी १९६९ मध्ये सादर केलेल्या अहवालात अनुसूचित जातींच्या शैक्षणिक व आर्थिक विकासावर भर देण्याची व त्यांच्या सर्ल प्रकारच्या सवलती चालू ठेवण्याची शिफारस केली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय ध्येयधोरणे व योजना आणि वाढत्या औद्योगिकीकरणाचे समाजरचनेवर झालेले परिणाम यांमुळे अनुसूचित जातींची प्रगती होण्यास साहाय्य झाले. तथापि अनुसूचित जातींची सामाजिक अपंगता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नव्या मूल्यांचा स्वीकार, कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी व जागृत लोकमत यांचीही आवश्यकता आहे. असे तज्ञांचे मत आहे.

अनुसूचित जमाती : अनुसूचित जामातींना आदिवासी, मूलनिवासी, आदिम जाती व टोळ्या, वन्यजाती व गिरिजन अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यांपैकी ‘आदिवासी’ हे नाव राष्ट्रीय परिभाषेत अधिक प्रचलित आहे.

लोकसंख्या आणि प्रदेशिक विभागणी:
१९६१ सालाच्या जनगणनेप्रमाणे भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या २,९८,४६,३०० म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ६·८ टक्के आहे. या जमातींपैकी जवळजवळ निम्म्या जमाती मध्य प्रदेश (६६,७८,४१०), ओरिसा (४२,२३,७५७) आणि बिहार (४२,०४,७७०) या राज्यांत मिळून आहेत.

उत्तर आणि ईशान्य विभाग, मध्य विभाग व दक्षिण विभाग असे तीन भौगोलिक विभाग आदिवासी जमातींच्या बाबतीत स्थूल मानाने कल्पिलेले आहेत. उत्तर आणि ईशान्य विभागात उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेला डोंगराळ प्रदेश आणि ईशान्येस ब्रह्मदेशापर्यंत जाऊन भिडणारा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश येतो. या प्रदेशात बहुतांशी आदिवासींची वस्ती आहे. आसामपासून तिबेटपर्यंच्या भागात अका, डफला, मिरी आणि अपातानी या जमाती राहतात. गालोग, मिन्योंग, पासी आणि पदम या जमाती दीहोंगच्या दरीत राहतात. उत्तर व ईशान्य डोंगराळ भागात राहणाऱ्या इतर आदिवासी जमातींमध्ये गुरूंग, लिंबू, लेपचा, अबोर, मिशमी, सिंगफो, मीकीर, राभा, कचारी, गारो, खासी, नागा, कुकी आणि चकमा ह्या प्रमुख जमाती आहेत. त्यांपैकी काही जमातींमध्ये अनेक उपशाखा आहेत. नागा जमातीत रंगपान, कोन्याक , रेंगमा, सेमा, अंगामी आणि आओ ह्या मुख्य उपशाखा समजल्या जातात. उत्तरेस गंगा नदीच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरलेला डोंगराळ प्रदेश हा मध्य विभागात मोडतो. या विभागात भारतातील बहुसंख्या आदिवासींची वस्ती आहे. त्या बिहार आणि आसपासच्या राज्यांत पसरलेली संथाळ जमात आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र आणि ओरिसा येथे पसरलेली गोंड जमात या सर्वांत मोठ्या आहेत. ह्यांची लोकसंख्या अनुक्रमे अदमासे २५ लक्ष आणि २० लक्ष (१९६१ ची शिरगणती) आहे. यांव्यतिरिक्त ओरिसा पर्वतराजीवर राहणारे खोंड, भूमीज आणि भुईया; छोटा नागपूरच्या पठारावर राहणारे मुंडा, ओराओं, हो आणि बिऱ्होर; विंध्य पर्वतराजीच्या परिसरात राहणारे कोल आणि भिल्ल आणि सातपुड्याच्या पर्वतराजीवर राहणारे कोरकू, आगरिया, परधान आणि बैगा ह्या जमाती मुख्य आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यांतील आदिवासी जमाती या जमातींच्या मानाने अल्पसंख्य आहेत. गुजरातमध्ये भिल्ल, धोडिआ, दुबळा, कोळी, वाघरी, वारली इ. जमाती प्रमुख आहेत. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या परिसरातील आगरी, कातकरी, कोकणा, महादेव कोळी, ठाकूर, वारली, खानदेशातील भिल्ल आणि विदर्भातील गोंड ह्या जमाती मोठ्या आहेत. राजस्थानात भिल्लांची जमात सर्वत्र पसरलेली असून सर्वात मोठीही आहे. दक्षिण विभाग म्हणजे पश्चिम घाटापैकी दक्षिणेचा डोंगराळ भाग. यात दक्षिण कन्नड जिल्ह्याचे कोरगा, कूर्गमधील युरूव, वायनाडचे इरूलर, पणियन व कुरुंबा, कोचीन-त्रावणकोरमधील कादर, कणिकरन, मलपंतरम इ. जमाती येतात. निलगिरी पर्वतराजीत राहणारे तोडा, बदागा आणि कोटा हेही या विभागात येतात. चेंचू ही जमात या विभागात उत्तरेकडे आंध्र प्रदेशात राहते.

या तीन विभागांशिवाय बंगाल उपसागरातील अंदमान, निकोबार आणि लखदीव-मिनिकॉई बेटांवरही आदिवासी जमाती राहतात. त्यांपैकी  अंदमानातील ओंगी आणि निकोबारी या जमाती मुख्य आहेत.

हवामान सरासरी स्थिती

हवामान सरासरी स्थिती

मराठी मध्ये हवामान हा एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. इंग्रजी मध्ये हवामान ह्या शब्दाची Weather आणि Climate अशी दोन वेगवेगळी भाषांतर करता येतील. ह्या दोन्ही भाषांतराचा अर्थ ही तितकाच भिन्न आहे. व्हेदर ह्या अर्थी वापरण्यात येणाऱ्या हवामान हा शब्द "वातावरणाची सद्य स्थिती" दर्शवितो. तर क्लायमेट ह्या अर्थी वापरण्यात येणारा हवामान हा शब्द "वातावरणाची किमान ३० वर्षे असलेली सरासरी स्थिती" दर्शवितो. हा लेख क्लायमेट शी निगडीत आहे.


जगातील विभागीय हवामान क्षेत्राचा नकाशा, मोठ्या प्रमाणात अक्षांशांद्वारे प्रभावित. विषुववृत्त पासून वरच्या दिशेने जाणारे झोन (आणि खालच्या दिशेने) उष्णकटिबंधीय, कोरडे, मध्यम, खंड आणि ध्रुव आहेत. या झोनमध्ये उपक्षेत्रे आहेत.
जगभरातील कोप्पेनवर आधारित हवामान वर्गीकरण
हवामान (क्लायमेट) ही हवामानाची दीर्घ-कालावधीची सरासरी असते, साधारणत: ३० वर्षांच्या कालावधीत त्या भागात असलेल्या वातावरणाची सरासरी असते. [१][२] तापमान, आर्द्रता, वातावरणाचा दाब, वारा आणि पर्जन्यवृष्टी ही सामान्यत: हवामानासाठी मोजली जाणारी काही गुणके आहेत.

व्यापक अर्थाने हवामान (क्लायमेट) म्हणजे हवामान प्रणालीतील घटक ज्यात पृथ्वीवरील समुद्र आणि बर्फ यांचा मुख्यतः समावेश होतो. [१] एखाद्या स्थानाचे हवामान (क्लायमेट) त्याच्या अक्षांश, भूभाग आणि उंची तसेच जवळपासचे जल संस्था आणि त्यांच्या प्रवाहांनी प्रभावित होते. अधिक सामान्यत: प्रदेशातील हवामान व्यवस्थेची सामान्य स्थिती हिच त्या प्रदेशाचे "हवामान" दर्शवते.

सरासरीनुसार आणि वेगवेगळ्या चलांच्या विशिष्ट श्रेणी, सामान्यतः तापमान आणि पर्जन्यमानानुसार हवामानाचे वर्गीकरण केले जाऊ शकते. सर्वाधिक वापरली जाणारी वर्गीकरण योजना म्हणजे कोप्पेनवर आधारित हवामान वर्गीकरण पद्धत. इ.स. १९४८ पासून वापरल्या जाणाऱ्या थॉर्नथवेट सिस्टम [३] मध्ये तापमान आणि पावसाच्या माहितीसह बाष्पीभवनांचाही समावेश होतो आणि जैविक विविधता आणि हवामान बदलावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी उपयोग केला जातो

. बर्गरन आणि स्थानिक सिनोप्टिक वर्गीकरण प्रणाली क्षेत्राचे हवामान परिभाषित करणाऱ्या वायु जनतेच्या उत्पत्तीवर लक्ष केंद्रित करते.

पॅलेओक्लिमाटोलॉजी म्हणजे प्राचीन हवामानाचा अभ्यास. १९ व्या शतकापूर्वी हवामानाबद्दलचे फारच थोडे निरिक्षण उपलब्ध आहे. पॅलेओक्लीमेट्सचा प्रॉक्सी व्हेरिएबल्सद्वारे म्हण्जे लेक बेड्स आणि बर्फ कोरमध्ये आढळलेल्या गाळासारखे नॉन-बायोटिक पुरावे आणि वृक्ष रिंग्ज आणि कोरल सारख्या जैविक पुराव्यांच्या आधारावर अनुमान लावला जातो. हवामान मॉडेल भूत, वर्तमान आणि भविष्यातील हवामानाचे गणितीय मॉडेल आहेत.

हवामान बदल विविध घटकांमधून मोठ्या आणि लहान कालावधीत होऊ शकतो. अलीकडील जागतिक तापमानवाढ ग्लोबल वार्मिगच्या नावाखाली चर्चेत आहे. ग्लोबल वार्मिंगचा पुनर्वितरणामध्ये परिणाम होतो. उदाहरणार्थ, "सरासरी वार्षिक तापमानात ३ डिग्री सेल्सियस बदल हा अक्षांश (समशीतोष्ण प्रदेशात) किंवा ५०० मीटर उंचावरच्या अंदाजे ३०० - ४०० कि.मी.च्या आइसोथर्म्समधील बदलांशी संबंधित आहे. म्हणूनच प्राण्यांच्या जाती बदलत्या हवामान क्षेत्राला प्रतिसाद म्हणून उंच जागी स्थलांतरित होतात..

हवामानशास्त्र

हवामानशास्त्र

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश:
Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात.

वातावरणातील या घडामोडीचे निरिक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.

इतिहास संपादन करा
इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.

इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.

सद्य स्थिती संपादन करा
संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.

साधने संपादन करा

वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन - अ‍ॅनोमिटर
हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.

जमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात.
रडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.
समुद्राच्या पाण्यावरील साधने - समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.
वातावरणात सोडली जाणारी साधने - फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.
वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.

हवामान मॉडेल
हवामानाची मॉडेल करण्यासाठी प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.

हवामानाची माहिती - शेतकऱ्याचा हक्क

हवामानाची माहिती - शेतकऱ्याचा हक्क
हवामानाविषयी जगात माहितीचा प्रसार कसा होतो?
हवामान पीक सल्ला कुठे सर्वाधिक चांगला आहे?
आपल्याकडे हवामान साक्षरता कशी वाढेल?
दुष्काळ निवारणार्थ कसे उपाय करायला हवेत?
हवामान निर्देशांकाद्वारे विमा संरक्षण कसे शक्‍य आहे?
दुष्काळामुळे होणारे स्थलांतर रोखणे शक्‍य आहे का?
दक्षिण आशिया आणि आफ्रिका देशांत समन्वय का आवश्‍यक आहे?
हवामान माहितीवर नियंत्रण करणे कितपत योग्य आहे?
हवामान बदलाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना बसतोय. मात्र, या बदलांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानविषयक कोणत्याही सक्षम सेवा पुरविल्या जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. उत्पादनातील सातत्य कायम राखण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार गावपातळीवर हवामान सेवा मिळणे आवश्‍यक आहे. जागतिक हवामान संस्थेच्या कृषी हवामान विभागाचे माजी प्रमुख आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या आफ्रिका व दक्षिण आशियायी देशांतील शेतकरी संघ जोडणी प्रकल्पाचे मुख्य सल्लागार डॉ. मनावा शिवकुमार यांच्याशी "टीम ऍग्रोवन'ने साधलेला संवाद.

डॉ. शिवकुमार यांचा परिचय...

1973 ते 77 या काळात कृषी हवामानशास्त्र या विषयात पीएच.डी. केली. त्यानंतर हैदराबादमध्ये इक्रीसॅट संस्थेत सात वर्षे काम केले. त्यानंतर आफ्रिकेत व जिनिव्हा येथे काम केले. नायजेरियात त्यांनी 13 वर्षे दुष्काळ निर्मूलनविषयक कार्य केले. जागतिक हवामान संस्थेच्या कृषी हवामान विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांचे 300 हून अधिक संशोधन निबंध व 51 पुस्तके प्रसिद्ध. 150 हून अधिक देशांमध्ये कामानिमित्त भ्रमंती. अतिशय सूक्ष्म अभ्यास व कृषी हवामानशास्त्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जगभर लौकिक.

हवामानाविषयी जगात माहितीचा प्रसार कसा होतो?
ग्रामीण भागात हवामानविषयक माहितीचा प्रसार फारच सुमार आहे. मी जवळपास नायजेरियात 12 वर्षे काम केले. आफ्रिका खंडातील देशांत शेतकऱ्यांना आवश्‍यक माहिती देवाण-घेवाणाच्या दृष्टीने काहीही सुविधा नाहीत. दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत येथील नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आजही होते आणि ही तेथे सर्वांत मोठी समस्या आहे. दुसरीकडे दक्षिण आशियामध्ये प्रचंड मोठी लोकसंख्या ही समस्या आहे. येथेही शेतकऱ्यांना सेवा-सुविधांचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. याकरिता पहिल्यांदा उभय देशातील संवाद वाढविण्याची गरज आहे.

हवामान पीक सल्ला कुठे सर्वाधिक चांगला आहे?
अमेरिका, युरोपमध्ये प्रत्येक पिकासाठी कीड व रोगांचे मोड्युल आहे. इटलीमध्ये वाईन द्राक्ष हे मुख्य पीक, त्यांचे प्रत्येक किडीसाठी "वेदर मोड्युल' आहे. पिकाचे सर्वेक्षण व संनियंत्रण केले जाते. पिकावर देखरेख ठेवून तत्काळ माहिती पाठवतात. माहितीची देवाणघेवाण केली जाते. हवामानाची सद्यस्थिती व अंदाज यानुसार पुढे काय होईल याचे विश्‍लेषण केले जाते. त्यानुसार तत्काळ उपाययोजना केली जाते. चीनमध्ये प्रत्येक गावात माहिती केंद्र आहे. छोटी केबीन, एक मोठा स्क्रीन आणि त्यावर सतत माहिती येत असते. यास "फार्म मेट्रॉलॉजीकल सेंटर' (शेती हवामान केंद्र) असे स्वरुप असते. त्यानुसार पीक सर्वेक्षण (क्रॉप मॉनिटरींग) केले जाते. गरजेवर आधारित पिकांचा अंदाज दिला जातो. इटली, चीन हे देश प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहेत. टोळांचे सर्वेक्षण व नियंत्रण करण्यासाठी खूप चांगला उपयोग केला जातो. मलेशियामध्येही पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उपाययोजना यासाठी अतिशय चांगली माहिती व्यवस्था (इन्फॉर्मेशन सिस्टीम) राबवली जाते. याकरिता उपग्रह तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरू शकते. अमेरिकेने यात आघाडी घेतली आहे. आपल्याकडे इस्त्रोनेही यात खूप चांगले काम केले आहे. त्यांची दिशा योग्य आहे. मात्र, राज्य पातळीवर अत्यंत निराशाजनक स्थिती आहे.

आपल्याकडे हवामान साक्षरता कशी वाढेल?
हवामान साक्षरतेमुळे पीक संरक्षणाची पातळी उंचावते. विशेष करून आपल्या कृषी विद्यापीठांनी याकरिता प्रयत्न करण्याची गरज अधिक आहे. मात्र, आपल्या बऱ्याचशा कृषी विद्यापीठांमध्ये साधी "जीआयएस युनिट'ही नाहीत. जागतिक हवामान संस्थेने खूप वर्षांपूर्वीच सर्व विद्यापीठांमध्ये हवामान बदलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या शिफारसी केल्या आहेत. पदवी पातळीवर हे अभ्यासक्रम सुरू होणे आवश्‍यक आहे. मात्र, आपल्या विद्यापीठांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे प्रयत्न काही ठिकाणी चांगले सुरू आहेत. मोबाईल हे त्यासाठी अतिशय चांगले माध्यम ठरत आहे. काही मोबाईल कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष सेवाही देऊ केली आहे. अगदी नेपाळसारख्या देशांमध्येही त्याचा चांगला वापर होतोय, ही आशादायक बाब आहे. प्रगत शेतकऱ्यांना आता जिल्हास्तर नाही, तर गावपातळीवर हवामान अंदाज, सल्ला हवा आहे. गावनिहाय अंदाज देण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतील.

दुष्काळ निवारणार्थ कसे उपाय करायला हवेत?

दुष्काळ निवारण्याचा देखावाच जगभरात केला जातो. जेव्हा जेव्हा दुष्काळ होतो, तेव्हा तेव्हाच नियोजन आणि उपाययोजनांची पारंपरिक प्रथा अवलंबली जाते. योजना आणि तत्कालिक उपायांचा काहीच उपयोग होत नाही. याकरिता जगभरातील देशांनी स्वतंत्र धोरणच निर्माण करणे आवश्‍यक आहे. धोरण आल्यास ते सर्व सरकारी यंत्रणांसह राजकीय व्यवस्थेवर बंधनकारक असते. संयुक्त राष्ट्र संघाने याबाबत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. याकरिता स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या शिफारसी जगभरातील देशांना करण्यात आल्या. मात्र, फक्त ऑस्ट्रेलिया या एकाच देशात राष्ट्रीय दुष्काळ निवारण धोरण (नॅशनल ड्रॉट पॉलिसी) आहे. नियोजन, उपाययोजना नावापुरते असणे आणि त्याची अंमलबजावणी धोरण म्हणून होणे यात फार मोठे अंतर आहे. धोरण कायदेशीररित्या अंमलात येते. भारतात दुष्काळ ही मोठी समस्या आहे. मात्र, याबाबत अद्याप धोरण नाही. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍथॉरिटी) आहे. पण ते दुष्काळाकडे किती गांभीर्याने पाहतात हा प्रश्‍नच आहे. सध्या ब्राझिलमध्ये याबाबत खूप वेगाने काम सुरू आहे. दुष्काळविषयक धोरणाबरोबरच दुष्काळ विमा योजना (ड्रॉट इन्शुरन्स पॉलिसी) करण्यासाठीही प्रत्येक देशाने प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रसंघ याबाबत आग्रही आहे. मात्र, याबाबत अपवाद वगळता कोणत्याही देशाकडून कार्यवाही झालेली नाही.

हवामान निर्देशांकाद्वारे विमा संरक्षण कसे शक्‍य आहे?
जगात वेदर इंडेक्‍स इन्शुरन्स ही व्याख्या कृषी आणि आपत्ती विमा क्षेत्रात वापरली जाते. साधारणत: सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचे झालेले नुकसान विम्या माध्यमातून त्याला काही प्रमाणात कसे परत करता येईल, याकडे हा निर्देशांक लक्ष वेधतो. यासाठी पाऊस गावपातळीपर्यंत मोजावा लागतो. आपल्याकडील हवामान यंत्रणेचा आधार यास पुरेसा नाही. दुसरीकडे हवामान बदलांच्या परिणामांमुळे पावसाच्या वितरणात खूप बदल झाला आहे. नुकसानीचे प्रमाण अपघाती झाले असून, त्याची तीव्रताही वाढली आहे. शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी गावपातळीवरील हवामानाची माहिती नोंदवली जाणे अत्यावश्‍यक आहे. याकरिता गावपातळीवर हवामान केंद्र उभारावीच लागेल. दुष्काळ निवारणाच्या दृष्टीनेही गावपातळीवर हवामान घटकांची नोंद होणे आवश्‍यक आहे.

दुष्काळामुळे होणारे स्थलांतर रोखणे शक्‍य आहे का?
दुष्काळ आणि स्थलांतर हे परस्परपूरक घटनाक्रम आहेत. अनादी काळापासून दुष्काळामुळे स्थलांतरे केली जात आहेत. आज 21 व्या शतकातही दुष्काळ आणि आपत्तींमुळे स्थलांतर होत असून, यात मोठी वाढ झाली आहे. आफ्रिकन खंडात तर ही समस्या सामाजिकदृष्ट्या अधिकच गंभीर स्वरुप धारण करत असते. येथील देशांच्या प्रत्यक्ष सीमारेषाच नाही. स्थलांतराविषयीची आंतरराष्ट्रीय संस्थाही आहे. पण तिचा देश व राज्य पातळीवर फारसा फायदा नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवर देशांनी या विषयात लक्ष घालायला हवे. यासाठी ऐतिहासिक नोंदी महत्त्वाच्या ठरतील. सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो, तेव्हा स्थलांतरात वाढ होते. प्रत्येक देशाने, राज्याने दुष्काळ व स्थलांतराच्या अनुषंगाने संवेदनशील क्षेत्र निश्‍चित करून त्यानुसार स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याकरिता अधिक कार्यक्षम होण्याची आवश्‍यकता आहे. आपत्ती आल्यावर नुकसान निस्तारण्याचे काम करण्यापेक्षा; आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठीच्या कामावर मुख्य भर हवा. दुष्काळ हा वैयक्तिक पातळीवर न राहता सामाजिक पातळीवर आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे.

दक्षिण आशिया आणि आफ्रिका देशांत समन्वय का आवश्‍यक आहे?
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेमार्फत दक्षिण आशियायी देश व आफ्रिका यांच्यातील शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आफ्रिका व दक्षिण आशियात हवामान, भूस्थिती व भूरचना, तापमान आदी अनेक घटकांमध्ये कमालीचे साम्य आहे. यामुळे या दोन्ही भागांतील शेतकऱ्यांमध्ये संवाद वाढल्यास, शेतकरी एकमेकांच्या संपर्कात राहिल्यास व त्यांच्यात माहिती व अनुभवाचे आदान प्रदान झाल्यास दोन्ही भागांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात "नेटवर्क' तयार झाल्यानंतर त्यामार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या हवामानविषयक सेवांबाबतचा मोठा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. या नेटवर्कमधील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. हवामान माहितीचा प्रसार, आदान प्रदान, हवामान अंदाज व सल्ला यास यात सर्वाधिक महत्त्व असेल. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावरील हवामानाची नोंद व संभाव्य हवामानाचा अचूक अंदाज हवा आहे.

हवामान माहितीवर नियंत्रण करणे कितपत योग्य आहे?
अमेरिकेत प्रत्येक राज्याचे स्थानिक पातळीवर स्वतंत्र स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे आहे. या केंद्रांच्या सर्व नोंदी, माहिती सर्व लोकांसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून खुली आहे. अमर्याद माहिती निःशुल्क उपलब्ध आहे. नागरिक कर भरतात त्यातूनही ही सर्व यंत्रणा उभी केलेली असते. लोकांच्या पैशातून उभारलेल्या गोष्टी लोकांसाठी पूर्णपणे खुल्या हव्यात हे धोरण त्यांनी अंमलात आणले आहे. आपल्याकडे क्षुल्लक माहिती मिळविण्यासाठीही मोठमोठे अडथळे व अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागते. हवामानविषयक माहिती, आकडेवारी, नोंदी या प्रत्येक व्यक्तीसाठी खुल्या हव्यात. पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंचलित हवामान केंद्रांचे तंत्रज्ञान अतिशय प्रगत झाले आहे. शिवाय त्याची किंमतही खूप कमी झाली आहे. कुठेही मानवी हस्तक्षेप किंवा चुका न होता थेट वापरायोग्य आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. एकेका मिनिटाची अद्ययावत आकडेवारी प्राप्त होते. प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र असायलाच पाहिजे. ग्रामस्थांना हवामानाची माहिती देणे, सेवा पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. शेतीसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व घटकांच्या नोंदी घेतल्या जातात. गावात त्या प्रसिद्ध करता येतात व त्यानुसार शेतकऱ्यांना नियोजन करणे सोपे होते. या माहितीवर आधारित प्रत्येक पिकासाठीचे मॉडेल तयार करता येते. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गावातील हवामानाच्या अद्ययावत नोंदी मिळत राहणे, हवामानाचा अचूक अंदाज आणि पीकनिहाय सल्ला मिळणे अत्यावश्‍यक आहे, हा त्याचा मुलभूत हक्कही आहे. अशी सेवा पुरविण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाने, राज्याने पावले उचलली पाहिजेत.