Saturday 24 August 2019

महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार’

◼️पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार-2018-19’ चे वितरण करण्यात आले.

🔘 क्षमता संवर्धनात महाराष्ट्र देशात दुसरा 🔘

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै 2018 पासून राज्यात सुरु असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीच्या आधारे ‘क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आयुक्त इंद्रा मालो आणि उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी पुरस्कार स्वीकारला. 50 लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम 🔘

◼️ पोषण अभियानाच्या अंमलबजावणींतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याने निश्चित उद्दीष्ट्ये पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये समुदाय विकास आधारित कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी झाली आहे. क्षमता बांधणी व विकासांतर्गत जिल्ह्यातील सर्व 2015 अंगणवाड्यांमध्ये 3 लाख उपक्रम राबविण्यात आले आहेत. यासोबतच पर्यवेक्षिकांमार्फत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, कुपोषण मुक्ती बालग्राम विकास केंद्र आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.

◼️केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) बी.एच.निपानीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 नेवासा व नाशिक प्रकल्पांच्या सांघिक कार्याचा सन्मान 🔘

◼️पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि ए.एन.एम. कार्यकर्त्या यांच्या उत्तम समन्वयातून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक-2 (शहरी) या दोन प्रकल्पांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

◼️नेवासा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अलका पंडीत आणि योगिता गुजर, एएनएम कार्यकर्त्या राखी पंडीत, अंगणवाडी मदतनीस उषा टाके आणि पर्यवेक्षिका श्यामला गायधने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2 लाख 50 हजार रूपये, प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

◼️नाशिक-2 (शहरी) प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसूळे, एएनएम कार्यकर्त्या उषा लोंढे, अंगणवाडी मदतनीस मोहिनी इप्पर आणि पर्यवेक्षिका विद्या गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

🔘 करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट 🔘

◼️राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...