Wednesday 11 November 2020

अमेरिकेने टाकलेला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणजे नेमके काय?

 


अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.


मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.


मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.


जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.


२००३ मध्ये इराक युद्धादरम्यान अमेरिकेने एमओएबी बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत अमेरिकेसह कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. अमेरिकेने मदर ऑफ ऑप बॉम्बची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव दिले. मदर ऑफ ऑप बॉम्ब ३० फूट लांब आणि ४० इंच रुंद असतो. या बॉम्बचे वजन ९ हजार ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त होते.


मदर ऑफ ऑल बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे जबरदस्त नुकसान करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होता. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव सुरु होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...