Thursday 1 December 2022

महाराष्ट्राचा इतिहास




⭕️ मौर्य ते यादव ⭕️


(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)



👉 मौर्य साम्राज्याचा काळ


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



👉 सातवाहन साम्राज्याचा काळ


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



👉 वाकाटकांचा काळ


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



👉 कलाचुरींचा काळ


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



👉 यादवांचा काळ


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

________________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...