21 April 2022

श्री. मोरारजी देसाई

श्री. मोरारजी देसाई

March 24, 1977 - July 28, 1979 | Janata Party

श्री. मोरारजी देसाई

श्री.मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी भादेली गावात झाला. हे गाव आता गुजरातमधील बुलसर जिल्हयात आहे. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि अत्यंत कडक शिस्तीचे होते. लहानपणापासूनच, छोटया मोरारजींनी वडिलांकडून कोणत्याही परिस्थितीत कठोर मेहनत आणि सचोटी ही मूल्ये आत्मसात केली. सेंट बुसर हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन मुंबई प्रांतातील विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवी घेतली आणि उपजिल्हाधिकारी म्हणून 12 वर्षे काम केले.

1930 मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेल्या स्वातंत्र्य लढयादरम्यान देसाई यांचा ब्रिटीश न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य लढयात उडी घेतली. हा निर्णय अतिशय कठीण होता, मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, तेव्हा कौटुंबिक समस्या दुय्यम स्थानी येतात असा विचार त्यांनी केला.
स्वातंत्र्य लढयादरम्यान, देसाई यांनी तीन वेळा तुरुंगवास भोगला. 1931 मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले आणि 1937 पर्यंत गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव होते.

1937 मध्ये पहिलया काँग्रेस सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर देसाई हे तत्त्कालीन मुंबई प्रांतात बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात महसूल, कृषी, वन आणि सहकारी मंत्री होते. जागतिक युध्दात भारताच्या परवानगीशिवाय सहभागाचा काँग्रेस मंत्रालयानी निषेध केला.
महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात देसाई यांना ताब्यात घेण्यात आले आणि ऑक्टोबर 1941 मध्ये सोडून देण्यात आले. ऑगस्ट 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या वेळी पुन्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. 1946 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकानंरत, ते मुंबईत गृह आणि महसूल मंत्री झाले. या काळात त्यांनी जमीन महसुलात अनेक सुधारणा केल्या. पोलिस प्रशासनात त्यांनी जनता आणि पोलिस यांच्यातील दरी दूर केली, आणि जनतेच्या गरजांप्रती पोलिस प्रशासन अधिक सजग केले. 1952 मध्ये ते मुंबईचे मुख्यमंत्री बनले.

त्यांच्या मते, जोपर्यंत गावे आणि शहरांमध्ये राहणारे गरीब लोक सामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम होत नाहीत, तोपर्यंत समाजवादाबाबत बोलण्यात काही अर्थ नाही. देसाई यांनी शेतकरी आणि भाडेकरुंच्या समस्या सुधारण्याच्या हेतूने प्रगतीशील कायदा बनवला आणि आपला विचार कार्यान्वित करण्यासाठी ठोस पाऊल उचलले. यामध्ये देसाई यांचे सरकार अन्य राज्यांपेक्षा खूप पुढे होते. याशिवाय, त्यांनी प्रामाणिकपणे कायदयाची अंमलबजावणी केली आणि मुंबईतील त्यांच्या प्रशासनाची सर्वांनी प्रशंसा केली.
राज्यांची पुनर्स्थापना केल्यांनतर, 14 नोव्हेंबर 1956 रोजी देसाई वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. नंतर 22 मार्च 1958 रोजी त्यांनी अर्थ खात्याचा कार्यभार स्वीकारला.

आर्थिक नियोजन आणि वित्तीय प्रशासनाबाबतचे ज्ञान त्यांनी कृतीमध्ये उतरवले. संरक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी महसूल वाढवला, अनाठायी खर्चात कपात केली आणि प्रशासनावरील सरकारी खर्चात काटकसरीला प्रोत्साहन दिले. आर्थिक शिस्तीची अंमलबजावणी करुन त्यांनी वित्तीय तूट कमी केली. समाजातील उच्चभ्रू वर्गाकडून होणाऱ्या वारेमाप खर्चावर नियंत्रण आणले. 1963 मध्ये कामराज योजनेअंतर्गत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. पंडित नेहरुनंतर पंतप्रधान झालेल्या लालबहादूर शास्त्री यांनी प्रशासकीय यंत्रणेची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष बनण्यासाठी देसाई यांचे मन वळवले. या कामात सार्वजनिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण अनुभवाची त्यांना मदत झाली.

1967 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात देसाई यांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जुलै 1969 मध्ये, गांधी यांनी त्यांच्याकडून अर्थखाते काढून घेतले. देसाई यांच्या एक गोष्ट लक्षात आली की पंतप्रधानांना आपल्या सहकाऱ्यांची खाती बदलण्याचा विशेषाधिकार आहे. मात्र इंदिरा गांधी यांनी याबाबत त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचे साधे सौजन्यही न दाखवल्यामुळे त्यांच्या आत्मसन्माला ठेच पोहोचली. त्यामुळे त्यांनी विचार केला की भारताच्या उपपंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. 1969 मध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले, मात्र देसाई काँग्रेस संघटनेसोबत राहिले. पुढेही ते पक्षात प्रमुख भूमिका पार पाडत राहिले. 1971 मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून गेले. 1975 मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रश्नावर त्यांनी आमरण उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणामुळे जून 1975 मध्ये निवडणुका पार पडल्या. चार विरोधी पक्ष आणि एक अपक्ष यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या जनता दल पक्षाला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गांधी यांची लोकसभेवर निवड निरर्थक असलयाचे जाहीर केल्यानंतर देसाई यांच्या मनात आले की, लोकशाहीची तत्त्वे ध्यानात घेऊन गांधी यांनी राजीनामा दयायला हवा.

आणीबाणी घोषित झाल्यानंतर, 26 जून 1975 रोजी देसाई यांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांना एकांत कारावासात ठेवण्यता आले आणि लोकसभा निवडणुका घेण्याच्या निर्णयापूर्वी 18 जानेवारी 1977 रोजी सोडून देण्यात आले. त्यांनी देशभरात संपूर्ण ताकदीनिशी प्रचार केला आणि मार्च 1977 मध्ये सहाव्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता दलाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात त्यांची महत्त्वूपूर्ण भूमिका होती. गुजरातमधील सुरत मतदारसंघातून देसाई लोकसभेसाठी निवडून गेले होते. नंतर त्यांची सर्वसंमतीने संसदेतील जनता दलाचे नेते म्हणून निवड झाली आणि 24 मार्च 1977 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली.

1911 मध्ये देसाई आणि गुजराबेन यांचा विवाह झाला. त्यांच्या पाच मुलांपैकी एक मुलगी आणि एक मुलगा हयात आहेत.
पंतप्रधान म्हणून देसाई यांची इच्छा होती की, भारतातील जनतेला इतके निडर बनवायचे की देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीने जरी काही चूक केली तर त्या व्यक्तीच्या निदर्शनात ती चूक आणून दिली जावी. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की, “कुणीही मग तो पंतप्रधान असला तरी देशाच्या कायदयापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही.”
त्यांच्यासाठी सत्य ही एक संधी नसून विश्वासाचे एक अंग होते. त्यांनी क्वचितच आपल्या तत्त्वांना परिस्थितीच्या दबावापुढे मुरड घातली. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते कटिबध्दतेने पुढे जात राहिले. ते स्वत: मानायचे की, “सर्वांनी सत्य आणि विश्वासाच्या जोरावर आयुष्यात मार्गक्रमण करायला हवे.”

श्री. लाल बहादूर शास्त्री

श्री. लाल बहादूर शास्त्री

June 9, 1964 - January 11, 1966 | Congress

श्री. लाल बहादूर शास्त्री

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.
1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”
आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.

जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

August 15, 1947 - May 27, 1964 | Congress
जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती. आयर्लंडमध्ये झालेल्या सिन फेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं. भारतात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता.

1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले. 1919 मध्ये अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले. त्यांनी 1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं. 1920-22 दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.

सप्टेंबर 1923 मध्ये नेहरू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले. 1926 मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशियाचा दौरा केला. बेल्जिअममध्ये ब्रुसेल्स येथील गरीब देशांच्या संमेलनाला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. 1927 मध्ये मॉस्को येथे ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले. तत्पूर्वी 1926 मध्ये मद्रास काँग्रेसमध्ये काँग्रेसला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाप्रती कटिबध्द बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 1928 मध्ये लखनौमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात एका मिरवणुकीचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. 29 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्याचवर्षी त्यांनी “भारतीय स्वातंत्र्य लीग”ची स्थापना केली आणि त्याचे सरचिटणीसही झाले. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मूळ उद्देश होता.

1929 मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. 1930-35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं. सुटका झाल्यानंतर आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले. फेब्रुवारी-मार्च 1936 मध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला. जुलै 1938 मध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युध्द सुरू होतं. दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते.

31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली. डिसेंबर 1941 मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला. 8 ऑगस्ट 1942 रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण 9 वेळा त्यांना तुरुंगवास घडला. जानेवारी 1945 मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च 1946 मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. 6 जुलै 1946 रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि 1951 ते 1954 पर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.

इंदरकुमार गुजराल

इंदरकुमार गुजराल

April 21, 1997 - March 19, 1998 | Janata Dal

इंदरकुमार गुजराल

श्री. इंदरकुमार गुजराल यांनी सोमवार 21 एप्रिल 1997, रोजी भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दिवंगत श्री. अवतार नारायण गुजराल व श्रीमती पुष्पा गुजराल ह्यांचे पुत्र असलेल्या श्री. गुजराल ह्यांनी एमए, बी कॉम, पी एचडी व डी लिट पदवी संपादन केली. त्यांचा जन्म 4 डिसेंबर1919 रोजी अखंड भारतातील झेलम येथे झाला. 26 मे 1945 रोजी ते श्रीमती शीला गुजराल यांच्याशी विवाहबद्ध झाले.
इंदरकुमार गुजराल यांचे आई वडील स्वातंत्र्यसेनानी होते त्यांनी पंजाब मधील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. 1931 साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी श्री गुजराल स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभागी झाले होते. झेलम गावात तरुण मुलांची संघटना स्थापन केल्याबद्दल श्री गुजराल यांना अनेक वेळा पोलिसांकडून बेदम मारहाणही झाली होती. भारत छोडो आंदोलनादरम्यान श्री गुजराल यांना तुरुंगवासही झाला होता.
पंतप्रधान पदावर नियुक्ती होण्यापूर्वी 1 जून 1996 पासून त्यांनी परराष्ट्र व्यवहार खात्याचा कारभारही सांभाळला होता, शिवाय जल संपदा मंत्रालयाचा अतिरिक्त कारभारही त्यांनी सांभाळला. 1989-1990 दरम्यानही ते परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम बघत होते, 1976-1980 दरम्यान ते भारताचे सोविएत रशियातील राजदूत(मंत्रीस्तर) होते व 1967-1976 दरम्यान त्यांनी खालील मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणून काम केले.
दळणवळण व संसदीय कामकाज मंत्राालय
माहिती व प्रसारण तथा संचार मंत्राालय
बांधकाम व गृहनिर्माण मंत्राालय
माहिती व प्रसारण मंत्राालय
नियोजन मंत्राालय
श्री. गुजराल यांनी भूषविलेली संसदीय पदे
श्री. इंदरकुमार जुन 1996 पासून राज्यसभेचे नेते होते. 1993 ते 1996 दरम्यान वाणिज्य व वस्त्रोद्योग वरील संसदीय स्थायी समितीचे सदस्य, 1996 पर्यंत परराष्ट्र व्यवहार संबंधित संसदीय स्थायी समितीचे सदस्य, 1964 ते 1976 व 1989 ते 1991 मध्ये खासदार, 1992 मध्ये बिहारमधून राज्यसभेवर पुन्हा नियुक्ती, याचिका समिती, लोकलेखा समिती, राज्यसभेच्या नियम संबंधित समिती, अधिनस्थ विधान समिती, सामान्य प्रयोजन समिती आदी समित्यांचे ते सदस्य होते.
श्री. गुजराल यांनी सांभाळलेली अन्य पदे
इंदरकुमार गुजराल भारतीय दक्षिण आशियाई सहकार्य परिषदेचे अध्यक्ष, भांडवल योजना देखरेख समितीचे सदस्य, संरक्षण अध्ययन व विश्लेषण समितीचे माजी अध्यक्ष(आयडीएसए), उर्दू भाषा प्रोत्साहन संबंधित सरकारी समितीचे (गुजराल समिती)अध्यक्ष, 1959-1964 पर्यंत दिल्ली महानगरपालिकेचे उपाध्यक्ष, लाहोरे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, पंजाब विद्यार्थी महासंघाचे सरचिटणीस, कोलकाता, श्रीनगर व दिल्ली येथे विरोधी पक्ष संमेलनाच्या संयुक्त मोर्चाचे निमंत्रक व प्रवक्ते होते.
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व
श्री. गुजराल यांनी 1996 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेतील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे, 1995 मध्ये जीनिव्हा येथे झालेल्या मानवाधिकारावरील संयुक्त राष्ट्र अधिवेशनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेते, 1990 मधील संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेतील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेते, 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक विकास विषयावर झालेल्या विशेष सत्रात भारतीय प्रतीनिधी मंडळाचे नेते, 1995 व 1996 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य, 1977 मध्ये शिक्षण व पर्यावरण विषयावरील युनेस्को मध्ये झालेल्या संमेलनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेते, 1970, 1972, 1974 मध्ये युनेस्को अधिवेशनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे पर्यायी नेते, 1973 मध्ये पॅरीसमध्ये युनेस्को द्वारे मनुष्य व नवसंप्रेषण प्रणाली वर आयोजित चर्चासत्राचे अध्यक्ष, 1995 मध्ये बुकारेस्ट मध्ये झालेल्या अंतर संसदीय संघ परिषदेचे प्रतिनिधी, 1994 मध्ये कॅनडा राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेचे प्रतिनिधी, 1967 मधील कॅनबेरा मध्ये झालेल्या आंतरसंसदीय संघ बैठकीचे प्रतिनिधी, 1974 मध्ये स्टॉकहोम मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र अधिवेशनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे पर्यायी नेते, 1975 मधील गेबोन, कॅमेरुन, कोंगो, चाड, व मध्य आफ्रिका प्रजासात्तकसाठी विशेष दूत, 1966 मध्ये मलावी प्रजासत्ताकाच्या उद्घाटनासाठी भारताचे विशेष दूत, 1961 मध्ये बल्गेरिया मधील विशेष दूत, श्रीलंका, भूतान, इजिप्त व सुदान येथील राजनैतिक दौऱ्यावर केंद्रीय मंत्री, भारताच्या दक्षिण आशियाई सहकार्य परिषदेचे अध्यक्ष, 1961 मध्ये झालेल्या आशियाई रोटरी संमेलनाचे सह-अध्यक्ष आदि विविध पदांवर भारताचे प्रतिनिधित्व केले.
श्री. गुजराल यांच्याशी संबंधित सामाजिक संस्था
श्री. गुजराल नारी निकेतन ट्रस्ट व जालंधर (पंजाब) के ए एन गुजराल मेमोरेअल स्कूल चे अध्यक्ष, भारत पाक मैत्री संस्थेचे अध्यक्ष, दिल्ली कला सभागृहाचे संस्थापक अध्यक्ष, लोक कल्याण समितीचे उपाध्यक्ष, 1960 मध्ये रोटरी क्लब दिल्लीचे अध्यक्ष, 1961 मध्ये आशियाई रोटरी परिषदांचे उपाध्यक्ष होते.
विशेष रुची
श्री. गुजराल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर लेखन करत होते. तसेच नाट्यलेखन व समीक्षा करत होते.