Wednesday 7 August 2019

🔹हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब का टाकला?

अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून प्रचंड विध्वंस केला त्या घटनेला ७१ वर्षे होत आहेत. जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ,
सेनानी यांनी विरोध केला होता. तरीही हा हल्ला का करण्यात आला याचा ऊहापोह करणारा लेख
अमेरिकन सरकारने हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकून दोन लाख जपानी नागरिकांना ठार मारले. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात. परंतु काही जण मात्र अजूनही या अणुबॉम्ब हल्ल्याचे समर्थन करतात : ‘झाले हे वाईट झाले, पण अणुबॉम्ब वापरला नसता, तर दुसरे महायुद्ध खूप लांबले असते व त्यात जास्त माणसे मारली गेली असती.’ अणुबॉम्ब हल्ल्यानंतरच्या ७० वर्षांत कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हिरोशिमाला भेट दिली नव्हती. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या नुकत्याच झालेल्या पहिल्यावहिल्या हिरोशिमा भेटीत बराक ओबामांनी अपार दु:ख व्यक्त करून अण्वस्त्रमुक्त जगाची अपेक्षा केली. परंतु जपानी नागरिकांची जाहीर माफी मात्र मागितली नाही. म्हणूनच अणुबॉम्ब हल्ल्यामागील या सरकारी कारणाची तपासणी केली पाहिजे.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली. दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला. हल्ल्यामागील कारणांच्या तपासात कायम उपयोगी असणारा हा तारीखवार घटनाक्रम अमेरिकेतील होलोकास्ट मेमोरियल म्युझियमच्या ‘वर्ल्ड वॉर सेकंड- टाइमलाइन ऑफ इव्हेंट्स’ शीर्षकाखाली उपलब्ध आहे. (संदर्भ: https://www.ushmm.org/wlc/en/article.php?ModuleId=10007306) अण्वस्त्र हल्ल्यामुळे झालेल्या मृतांच्या संख्येच्या विविध अंदाजांपैकी मृतांचा कमीतकमी अंदाज असा आहे : हिरोशिमाच्या २ लाख ५५ हजार लोकसंख्येपैकी १ लाख ३५ हजार आणि नागासाकीतील सुमारे १ लाख ९५ हजार लोकसंख्येपैकी ६४ हजार माणसे ठार. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांपेक्षा नागरिक जास्त मारले गेले आहेत. परंतु हिरोशिमा-नागासाकीमध्ये बहुसंख्य मृत्यू (९९%) निरपराध नागरिकांचे आहेत. जगातल्या कुठल्या दहशतवादी गटाने अथवा अमेरिकी शासनाच्या नजरेतील शांततेला धोकादायक कोणत्या राष्ट्राने (Rogue State) अमेरिकेच्या तोलामोलाचे दहशतवादी कृत्य केले आहे? युद्धकाळात नागरिकांवर होणारे हल्ले अनैतिक, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे असतात. त्याविरुद्ध १९२३ सालीच आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात आला होता. त्यामध्ये नुकसानभरपाईची तरतूददेखील आहे. महाभारताच्या युद्धाचेही त्या काळी धर्मनियम होते. ते मोडूनच श्रीकृष्णाने कुरुसैन्यातील द्रोणाचार्य, कर्ण, जयद्रथ अशा सेनापतींच्या हत्या करविल्या होत्या आणि भीष्माचार्यासमोर हतबल झालेल्या अर्जुनाला पाहून ‘न धरी शस्त्र करी’ हा स्वत:चा शब्द मोडून हाती सुदर्शनचR घेतल्याचे त्रिकालाबाधित सत्य व्यासांनी कथेतून सांगितले आहे. दुसऱ्या महायुद्धात आणि त्यानंतरही अनेक वेळा आंतरराष्ट्रीय नियमांची अनेक राष्ट्रांनी पायमल्ली केली आहे. असेच भयावह वक्तव्य इंग्लंडच्या नूतन पंतप्रधान तेरेसा मे यांनी नुकतेच संसदेत केले. ‘स्वत:च्या राष्ट्राचे संरक्षण’ या नावाखाली ‘दहशतवादी’ हल्ले करून लाखो नागरिकांना झटक्यात ठार मारण्याची मानसिक तयारी अनेक राष्ट्रप्रमुखांची कशी काय होते, याची उत्तरे अण्वस्त्र हल्ल्यांमागील जाहीर कलेली कारणे आणि प्रत्यक्ष कारणे, घटनाक्रम आणि निगडित संदर्भ लक्षात घेतले तर मिळू शकतील.
जर्मनीमध्ये अणुविखंडनाची साखळी प्रक्रिया १९३९ या वर्षी प्रथम हाती आली. आता अणुबॉम्बचे आव्हान तंत्रज्ञांपुढेच काय ते होते. जुलमी नाझी सत्ताकाळात अनेक ज्यू शास्त्रज्ञ जर्मनी सोडून अमेरिकेची वाट धरत होते. त्यांना जर्मनीच्या हाती येऊ शकणारा अणुबॉम्ब ही वंशविद्वेषी सत्तेच्या विजयाची खात्री वाटत होती. शांतताप्रिय अल्बर्ट आइन्स्टाइन हेदेखील त्या भावनेला अपवाद नव्हते. लिओ त्झिलार्ड या पदार्थ वैज्ञानिकाने आइन्स्टाइन यांचे मन मोठय़ा कष्टाने वळवून राष्ट्राध्यक्षांच्या पत्रावर त्यांची सही घेतल्यानेच तर मॅनहटन प्रकल्प १९४२ साली गुप्तपणे सुरू झाला. बघता बघता १ लाख ३० हजार व्यक्ती त्यासाठी झटू लागल्या. प्रकल्पाचा चार वर्षांच्या आयुष्यकाळातील एकूण खर्च (२०१६ या वर्षीच्या किमतीनुसार) २६ हजार कोटी डॉलर झाला. दरम्यान जर्मनी अण्वस्त्रे बनविण्याच्या जवळपासदेखील नाही हे कळल्यावर अनेक शास्त्रज्ञांनी मॅनहटन प्रकल्प बंद करण्याची विनंती केली होती. विनंती अमान्य केल्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी प्रकल्पाच्या कामातून अंग काढले. व्यथित झालेल्या आइन्स्टाइन यांना अणुबॉम्ब बनविण्याची विनंती करणाऱ्या पत्रावर सही करणे ही भलीमोठी चूक वाटली. अण्वस्त्र हल्ल्यामागचे बदललेल्या परिस्थितीमधील ‘मानवी हत्येची किमान किंमत मोजून महायुद्ध लवकर संपविणे’ हे कारण लेखाच्या सुरुवातीला पाहिले आहे. स्टीमसन आणि ट्रमन यांनी ते जनतेच्या गळी यशस्वीपणे उतरविले. अमेरिकेत ते कारण अजूनही शाबूत आहे. कदाचित त्याचाच आधार घेऊन महायुद्धानंतर राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्यावहिल्या हिरोशिमा भेटीत बराक ओबामांनी बॉम्बहल्ल्यातून बचावलेल्यांपैकी काही मंडळींची प्रतीकात्मक गळाभेट घेतली, अपार दु:ख व्यक्त केले आणि अण्वस्त्रमुक्त जगाची अपेक्षा केली. परंतु जपानी नागरिकांची जाहीर माफी नाही मागितली. ही दांभिकता नसेल तर काय आहे?
जर्मनीच्या शरणागतीनंतर जपानी शहरांवर अणुबॉम्ब हल्ला करण्याला अनेक शास्त्रज्ञ, सेनानी यांनी विरोध केला होता. त्यात आइन्स्टाइन यांच्या पहिल्या नावानंतर इतरही अनेक मान्यवर आणि अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांची अवतरणे आणि अवतरणांचे स्रोत ‘हू डिसअॅग्रीड विथ द अॅटमिक बॉम्बिंग’ या शीर्षकाखाली सापडतात. (संदर्भ; http://www.doug-long.com/quotes.htm ) त्यातील पहिले नाव आहे अमेरिकन आर्मीचे पंचतारांकित जनरल आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त सेनांचे सर्वोच्च अधिकारी आयसेनहॉवर यांचे. त्यांनी लिहून ठेवले आहे की, ‘सेक्रेटरी ऑफ वॉर स्टीमसन यांनी जुलै १९४५ मध्ये माझी जर्मनीतील कार्यालयात भेट घेतली. भेटीत अमेरिकेने अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचे सांगितले आणि जपानी शहरांवर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्याच्या प्लॅनिंगचे सूतोवाच केले. त्यावर माझे मत विचारले. माझे मत स्पष्ट होते: ‘जपान आता जवळजवळ पराभूत झाला आहे. अशा वेळी अणुबॉम्बचा वापर अमेरिकन सैन्याची हानी रोखण्यासाठीदेखील अनावश्यक आहे. शिवाय, असे महाभयंकर अस्त्र वापरून अमेरिकेने जगाला विनाकारण धक्का देऊ नये. माझ्या स्पष्टोक्तीमुळे स्टीमसन अस्वस्थ झाले होते.’ आयसेनहॉवर यांची राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द १९६१ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर याच मताचा पुनरुच्चार त्यांनी ११ नोव्हेंबर १९६३च्या न्यूजवीकमधील मुलाखतीत केला आहे.
अॅडमिरल विल्यम लेव्ही हे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्ट आणि ट्रमन या दोघांचेही मुख्य सल्लागार होते. ते स्वत:चे मत सांगताना म्हणतात, ‘या पाशवी अस्त्राचा हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर वापर करण्याचा जपानविरोधी युद्धात मुळीच उपयोग झाला नाही. जपानचा आधीच पराभव झाला होता. अमेरिकेने अशा अस्त्राचा जगात प्रथम वापर करून पाशवीपणाचे नवे मानांकन घडविले आहे.’ वरील इंटरनेट साइट आणखी काही मान्यवर अमेरिकन अधिकाऱ्यांचा विरोध नोंदविते. जपानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी एखाद्या निर्जन बेटावर अणुबॉम्ब टाकून त्याची संहारक शक्ती जपानसह जगाला दाखवून द्यावी, असेही काही शास्त्रज्ञांनी सुचवले होते. पण ट्रमन यांनी कोणताही सल्ला मानला नाही. यावरून अणुबॉम्ब वापराचे कारण आता बदलल्याचे स्पष्ट होते.
ट्रमन यांनी रशियन फौजा जपानमध्ये उतरण्याआधी अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय कृतीत उतरविला. त्यामुळे जपानवरील विजयाची माळ सोविएत रशियाच्या गळ्यात पडू नये आणि रशियाला भविष्यातही अमेरिकेची धास्ती वाटावी हे अणुबॉम्ब हल्ल्याचे खरे राजकीय कारण होते, असे मत डॉ. गेर अल्पेरोवित्झ या अमेरिकी इतिहासतज्ज्ञासह काही अभ्यासकांचे झालेले आहे. अणुबॉम्ब हल्ल्यानंतर मोजक्या दिवसांत अमेरिकेने गोळा केलेल्या डेटाचा आवाका पाहता रशियाकेन्द्री कारणालामानवी आणि इतर हानीची प्रत्यक्ष मोजदाद करण्यासाठी जिवंत प्रयोग, अशी पुस्ती जोडली पाहिजे.

Source: loksatta

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...