Sunday 4 August 2019

​🔹भारतीय अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ म्हणून ओळखले जाणार, जाणून घ्या या शब्दाचा अर्थ

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ २०२२ पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे. भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल. भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणार भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे.

▪️‘व्योमनॉट्स’चा अर्थ काय?
भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे. अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट’ म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे. ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा अकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अॅस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द तयार झाला आहे. त्यामुळे शब्दाची फोड केल्यास साधारपणे अवकाशातील व्यक्ती असा याचा अर्थ होतो.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’, रशियन अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ आणि चीनची अंतराळ संशोधन संस्था ‘सीएनएसए’ या संस्थांनी यशस्वीरित्या अंतराळवीर अवकाशात पाठवले आहेत. इस्रोसाठी ही मोहिम खूप महत्वाची आहे. आत्तापर्यंत केवळ एकच भारतीय अंतराळात गेला आहे. १९४८ साली सोव्हिएत युनियनच्या अंतराळ मोहिमेमध्ये भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांचा समावेश होता.

▪️भारताची पहिली अंतराळवीर महिला?
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी भारताकडून अंतराळात जाणारा ‘व्योमनॉट्स’ महिला असावी अशी इस्रोची इच्छा असल्याचे सांगितले आहे. अंतराळात कोणाला पाठवायचे याची निवड भारतीय हवाईदलामार्फत केली जाणार असल्याचेही सिवन यांनी सांगितले आहे.

▪️इस्रोच्या भविष्यातील मोहिमा
इस्रो २०२२ साली गगनयान मोहिमेअंतर्गत तीन व्योमनॉट्स अंतराळात पाठवणार आहे. २०२३ मध्ये इस्रो शुक्र ग्रहावर यान पाठवणार आहे.तर २०२९ पर्यंत भारत अंतराळात स्वत:चे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) तयार करणार आहे. २०२५ ते २०३० च्या दरम्यान भारत चंद्रावर मानवरहीत यान पाठवण्याच्या तयारीत आहे. पुढील दहा वर्षांमध्ये इस्रो कॉस्मीक रेडिएशनच्या अभ्यासासाठी २०२० मध्ये ‘एक्सपोसॅट मोहिम’ , २०२१ मध्ये सुर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल वन’ मोहिम, २०२२ मध्ये ‘मंगळ परिक्रमा मोहिम-२’, २०२४ मध्ये ‘चांद्रयान ३’ आणि सुर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी २०२८ साली एक मोहिम राबवणार आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या या सर्व मोहिमांचा खर्च जगभरातील इतर देशांच्या मोहिमांपेक्षा अगदीच कमी आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...