Thursday 5 September 2019

एनडीआरएफ म्हणजे काय? त्यांचं कार्य कसं चालतं?


✅ 1. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005

देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्याअंतर्गत 2006 मध्ये NDRFची स्थापना करण्यात आली. याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य करण्याची जबाबदारी NDRFकडे असते.

✅ 2. NDRFची संरचना

हे पथक राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर तयार करण्यात यावेत, असे सरकारचे निर्देश आहेत.

स्थापनेच्या वेळी NDRFचे देशभरात आठ बटालियन होते. सध्या बटालियनची संख्या वाढवून ती 12 करण्यात आली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत असतात.

आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात. प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरीत्या प्रशिक्षित जवान असतात.

✅ 3. महाराष्ट्रात 18 तुकड्या

महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. पाचव्या बटालियनमध्ये एकूण 18 तुकड्या आहेत - तीन तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, पुण्यातील मुख्यालयात 14 तुकड्या तैनात असतात तर नागपूरमध्ये एक तुकडी नेहमी सज्ज असते.

सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र NDRFचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.

4. निवड आणि प्रशिक्षण

आता प्रत्येक आपत्तीत लोकांचे जीव वाचवण्याचं काम किती प्रेरणादायी वाटतं ना? मग NDRFमध्ये कसं जाता येईल, हेही पाहा...

भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून NDRFमध्ये निवडण्यात येतं. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांसारख्या पॅरामिलिटरी पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते.
नियुक्ती केलेल्या जवानांना 19 आठवड्यांच्या प्रशिक्षणातून जावं लागतं. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं.

✅ 5. कोणकोणत्या आपत्तींशी सामना करावा लागतो?

जगभरातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण आणि उपकरणं वापरण्याची पद्धत ही एकाच प्रकारची ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं.

प्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसंच प्राण्याच्या मृतदेहांचं व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...