Thursday 2 January 2020

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🖌प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🖌मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

📚प्रार्थना समाजाचे कार्य📚

🖌प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🖌न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🖌देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🖌मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🖌प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

📚प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚

🖌प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...