Friday 15 March 2024

तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)



०१. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८ मध्ये डूप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डूप्लेला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


१८ व्या शतकाच्या अखेरच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर तयार झालेले अतिरिक्त उत्पादन भारताच्या बाजारात खपवता येईल असा ब्रिटीश व्यापाऱ्यांचा कयास होता. यासाठी कंपनीने तीन मार्ग अवलंबिले. थेट युद्ध पुकारणे व पूर्वी अंकित केलेल्या प्रदेशावरील आपली पकड मजबूत करणे. यासोबतच तैनाती फौज पद्धत त्यापैकी एक होती.


०२. वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण वेलस्लीने भारतात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व भारताचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.


०३. वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली.


०४. आल्फ्रेड लायलने भारतीय युद्धात कंपनीच्या भाग घेण्याबाबत चार अवस्था सांगितल्या आहेत.


* आपल्या भारतीय मित्रांना युद्धात मदत करण्यासाठी कंपनी आपली फौज किरायाने पाठवत असे. ह्याअंतर्गत १७६८ मध्ये निजामाशी तह झाला होता.


* आपल्या मित्रांच्या मदतीने कंपनी स्वतःच युद्धात भाग घेऊ लागली


* कंपनीची मित्रराज्ये कंपनीला सैनिकाऐवजी पैसा पुरवू लागली. ज्याच्या आधारावर कंपनीने इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सानिक भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करण्यास प्रारंभ केला. पुढे गरजेनुसार हेच प्रशिक्षित सैन्य मित्रराज्यांना देऊन त्याऐवजी कंपनी पैसा घेऊ लागली. उदा. १७९८ चा हैद्राबाद तह


* शेवटच्या अवस्थेत कंपनीने मित्रराज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पत्करून त्याकरिता तैनाती फौज त्या राज्यात ठेवणे सुरु केले. त्याऐवजी कंपनी पैसे न घेता त्या राज्यातून काही प्रदेश घेऊ लागली. १८०० मध्ये निजामाशी झालेला तह.


०५. सर्वप्रथम प्रयोग १७६५ मध्ये अवधसोबत केला. यावेळी राजधानी लखनौत इंग्रज रेसिडेंट ठेवण्याचे अवधने मान्य केले. १७८७ मध्ये कंपनीने कर्नाटक नवाबाला विनंती केली कि त्याने इंग्रजान्शिवाय दुसऱ्या युरोपियन शक्तीशी संबंध ठेऊ नये.


०६. १७९८ मध्ये सर जॉन शोअरने अवधच्या नवाबाशी तह करताना अशी अट घातली कि नवाबाने इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना सेवेत घेऊ नये व कोणताही संबंध ठेऊ नये.


०७. पैशाऐवजी प्रदेशाची मागणी करणे हा एक नैसर्गिक टप्पा होता. भारतीय राज्ये धन कबुल करीत असत पण त्यांची फेड न झाल्याने रक्कम वाढत जाई. म्हणून कंपनीने तैनाती फौजेचा खर्च म्हणून प्रदेशाची मागणी सुरु केली. ह्या प्रदेशावर कंपनीची सार्वभौम सत्ता प्रस्थापित होत असे.


०८. ब्रिटिशांनी आपल्या सहा बटालियन हैदराबादेत ठेऊन फ्रेंचांना हाकलून दिले. या फौजेचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी २ लाख ४१ हजार ७१० पौंड निजामकडून वसूल केले. फौजेचा वाढता खर्च झेपेनासा झाल्याने निजामाने आपल्या संस्थानचा काही भाग ब्रिटीशांच्या हवाली केला.

No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...