Thursday 14 April 2022

शेषराव मोरे

शेषराव मोरे

प्रा. डॉ. शेषराव मोरे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९४८) हे वैचारिक लिखाणाचा प्रवाह समृद्ध करण्यारे एक मराठी लेखक आणि वक्ते आहेत. ते व्यवसायाने इंजिनिअर आहेत. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते कायद्याचे पदवीधरही आहेत.

प्रा. नरहर कुरूंदकर यांच्या परंपरेत घडलेले मोरे परखड विचारांचे लेखक आहेत. नांदेडला अभियांत्रिकी शिकत असताना ते बसायचे मात्र कुरूंदकर यांच्या वर्गात. कुरूंदकरांच्या विचारांचे त्यांच्यावर गारूडच होते. या वाटचालीत कुरूंदकरांशी स्नेह वाढला आणि एका विचारवंताची जडणघडण सुरू झाली.

लेखनासाठी केलेला अभ्यास
आपल्या प्रत्येक पुस्तकात डॉ. मोरे यांनी सामाजिक व राजकीय घडामोडींचा नवा वेध घेतला. एक हजार वर्षांच्या कालखंडात भारतावर इस्लामचा दीर्घ परिणाम झाला. या धर्माचा साधकबाधक अभ्यास सावरकर व डॉ. आंबेडकर यांनी केल्याचे मोरे यांच्या ध्यानात आले. त्यामुळे प्रेरित होऊन, १९९१ मध्ये त्यांनीही इस्लामचा सर्वांगीण अभ्यास आरंभला. रोज सात-आठ तास अभ्यास करूनही वेळ पुरत नसल्याने त्यांनी अखेर औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशभर भ्रमंती करून अभ्यासक, मौलवी यांच्या भेटी घेतल्या आणि हजारो पुस्तके अभ्यासली. यातून 'मुस्लिम मनाचा शोध', 'प्रेषितानंतरचे चार आदर्श खलिफा' ही पुस्तके साकारली. रूढार्थाने वाचकानुनय न करता अथक व्यासंग आणि चिंतनातून मोरे यांचे लिखाण साकारले आहे. शेषराव मोरे यांचे लेखन अनेक मराठी नियतकालिकात सातत्याने प्रकाशित होत असते.

सावरकरांविषयीचे लेखन
सावरकरांचा व्यासंग हे शेषराव मोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अभिन्न अंग आहे. सावरकरांचे जीवन हा मोरे यांच्या लिखाणाचा आवडता विषय. त्यामुळे प्रारंभी 'सावरकरांचा बुद्धिवाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सत्य आणि विपर्यास' या पुस्तकांतून सावरकरांच्या मौलिक विचारांची परखड मीमांसा त्यांनी केली.

शेषराव मोरे यांनी लिहिलेली पुस्तके
१८५७ चा जिहाद (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन)
अप्रिय पण (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन)
Islam - Maker of the Muslim Mind
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला (राजहंस प्रकाशन) : या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेकडून पुरस्कार मिळाला आहे.
काश्मीर एक शापित नंदनवन (राजहंस प्रकाशन)
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा (राजहंस प्रकाशन)
मुस्लिम मनाचा शोध
विचारकलह (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन) भाग १, २
शासनपुरस्कृत मनुवादी : पांडुरंगशास्त्री आठवले
(सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास
सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन)
सावरकरांचे समाजकारण
सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...