Monday 26 October 2020

दामोदर नदी :



बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते. 


सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते.


दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्व‌स्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत.


दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात.


 दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे.


दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. सिंगभूम, पुरूलिया व रांची यांच्या सीमेवर डास्मा डोंगररांग असून यातून सुवर्णरेखा नदी मार्ग काढते. याच्या दक्षिणेस सिंगभूमच्या सपाट प्रदेशात अनेक अवशिष्ट शैल व माथ्यावर जांभा दगडांचा थर असलेली छोटी पठारे आहेत. चक्रधरपूर व चैबासा यांच्या पश्चिमेस छोटानागपूर पठाराची कड आहे. या पठारावर अनेक उपपठारे असून त्यांपैकी रांची पठार सु. ६१० मी. उंच आहे. ते पश्चिमेस ३१४ मी. पर्यंत उंच होत गेले असून त्यालाही अनेक अवशिष्ट शैल व कटक आहेत. रांची पठाराच्या उत्तरेस हजारीबाग पठार असून दोहोंच्या दरम्यान दामोदर नदी विभंग दरीतून वाहते. 


दामोदर खोऱ्यात हुगळीला मिळणारी दामोदर, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या सुप्रसिद्ध शोण नदीला मिळणारी उत्तर कोएल व महानदीस मिळणारी दक्षिण कोएल या प्रमुख नद्या असून त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूरनियंत्रण हा दामोदर खोरे प्रकल्पाचा एक प्रमुख उद्देश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...