Sunday 17 March 2024

दख्खन पठार.


🅾️‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


🅾️पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


🅾️दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


🅾️ह पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


🅾️तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


🅾️पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


🅾️जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


🅾️पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...