Monday 2 May 2022

ग्रामीण व कृषी उद्योग व्यवस्थापन

ग्रामीण व कृषी उद्योग व्यवस्थापन

देशाच्या ग्रामीण स्तरावर- विशेषत: शेती उद्योगात
कृषी मालाची किंमत ठरवणे हा एक महत्त्वाचा निर्णय या उद्योगांशी संबंधित सर्वाना घ्यावा लागतो.

देशाच्या ग्रामीण स्तरावर- विशेषत: शेती उद्योगात वेगाने बदल होताना दिसत आहेत. याचा थेट संबंध यासंबंधीत क्षेत्रांतील उपलब्ध करिअर संधींशी आहे. व्यवस्थापनाच्या ग्रामीण व कृषी उद्योग या स्पेशलायझेशनच्या अभ्यासात कोणत्या घटकांचा-उपघटकांचा समावेश आहे आणि त्याद्वारे कोणत्या करिअर संधींची कवाडे खुली होतात, याचे विवेचन..
व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांसाठी असलेले ग्रामीण व कृषी उद्योग व्यवस्थापन (रुरल अ‍ॅण्ड अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) हे  एक महत्त्वाचे स्पेशलायझेशन काही विद्यापीठांमध्ये उपलब्ध असते. देशाच्या ग्रामीण स्तरावर आणि शेती उद्योगात बरेच आणि वेगाने बदल होत असताना ग्रामीण भागातील प्रगतीसाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यांची तसेच शेतीवर आधारित उद्योगधंद्यांची नितांत गरज आहे. शेती उद्योगातही नवनवी आव्हाने उभी राहत आहेत.  या आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच अद्ययावत  व्यवस्थापन तंत्रांची आवश्यकता आहे नजिकच्या भविष्यकाळात शेती आणि ग्रामीण विकासामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी आवश्यकता भासणार आहे. या दृष्टिकोनातून या स्पेशलायझेशनकडे पाहिल्यास ग्रामीण व कृषी उद्योग या विषयाचे महत्त्व समजते आणि उपलब्ध संधींची कल्पना येऊ शकते.

या विषयाचे कोणकोणते उपघटक आहेत, हे जाणून घेऊयात. भारतीय कृषी क्षेत्राचा परिचय होण्यासाठी कृषीक्षेत्र आणि अर्थव्यवस्था यासंबंधीचा  एक विषय या स्पेशलायझेशनमध्ये असतो. या विषयामध्ये साधारणत: आपल्या देशातील कृषीक्षेत्राची सद्यस्थिती, पंचवार्षिक योजनांमधून झालेली शेतीची प्रगती तसेच जमीनविषयक सुधारणा, शेती पाणीपुरवठय़ाची स्थिती, मजुरांची उपलब्धता इत्यादी बाबींचा समावेश होतो. या गोष्टींची सविस्तर माहिती होण्याकरता देशाच्या वेगवेगळ्या भागांतील ग्रामीण भागात फिरून शेतीची सद्यस्थिती नजरेखालून घालायला हवी.

यासोबत ग्रामीण भागातील विपणन (रुरल मार्केटिंग), ग्रामीण भागाचा विकास (रुरल डेव्हलपमेंट), वस्तूंची बाजारपेठ (कमॉडिटी मार्केट), कृषीमालाचे विपणन आणि किमतीविषयक धोरण (अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग अ‍ॅण्ड प्राइसिंग), अर्थपुरवठा (मॅक्रो फायनान्स), शेतीमालाचे वितरण, ग्रामीण विभागातील संशोधन पद्धती (रुरल रिसर्च मेथड्स), बँकिंग इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो. म्हणजेच प्रामुख्याने शेतीचे तसेच ग्रामीण विभागातील शेतीवर आधारित उद्योगांचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती या विषयाच्या अभ्यासातून मिळते.

विपणन विषयक उपघटकात शेतीमालाचे उत्पादन तसेच पूरक उद्योगामध्ये वस्तूंचे उत्पादन केल्यानंतर त्यांचे शास्त्रीयदृष्टय़ा, विपणनाची आधुनिक तंत्रे वापरून या मालाचे प्रभावी विपणन कसे करता येईल हे शिकता येते. त्यादृष्टीने ग्रामीण बाजारपेठांचे संशोधन कसे करावे, वितरण साखळी ग्रामीण भागात कशा पद्धतीने वापरता येईल, याविषयी वस्तूंचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग तसेच जाहिरात कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन मिळते.

हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की, व्यवस्थापनविषयक कोणताही विषय शिकताना आपण आपल्या स्वत:च्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे असते. यासाठी आपण शिकत असलेल्या शहराच्या आसपासच्या ग्रामीण विभागात फिरलो तरी प्रत्यक्ष विषयाची पुरेशी कल्पना येऊ शकते. शेती आणि शेतीविषयक व्यवसायाचे व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करताना या बाबींची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

ग्रामीण विकासासाठी आवश्यक असणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वित्तपुरवठा. शेतीविषयक उद्योगांना भांडवल उभारणी दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही भांडवल उभारणी कशी करावी यामध्ये ठिकठिकाणच्या अल्पबचत गटांचा उपयोग कसा करून घ्यावा, मॅक्रो फायनान्स म्हणजे नक्की काय इत्यादी अनेक विषयांची माहिती, वित्त विषयाशी संबंधित वर्तमानपत्रांद्वारे मिळते. याकरता या स्पेशलायझेशनमध्ये ग्रामीण विभागातील अर्थपुरवठा, बँकिंग इत्यादी अनेक विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयांचा अभ्यास करतानासुद्धा अशा ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवणे आवश्यक ठरते. बँकांची कार्यपद्धती, कर्जासंबंधीचे नियम इत्यादी वेगवेगळ्या कामांची माहिती करून घेता येते. ग्रामीण भागातील लोकांना बँकिंगविषयक तसेच इतर वित्तीय सेवा देण्यासाठी कोणत्या  उपाययोजना केलेल्या आहेत याची माहिती होते.

कृषी मालाची किंमत ठरवणे हा एक महत्त्वाचा निर्णय या उद्योगांशी संबंधित सर्वाना घ्यावा लागतो. शेतीमध्ये निर्माण होणाऱ्या मालाची किंमत कशी ठरवावी यासंबंधीची माहिती अ‍ॅग्रिकल्चर प्राइजिंग या विषयातून होते. ही किंमत ठरवताना वस्तूंचा उत्पादनखर्च कसा ठरवावा याची माहिती घ्यावी लागते तसेच किंमत ठरवताना ती जशी ग्राहकांना परवडणारी असावी लागते तसेच उत्पादकांनाही पुरेसा नफा देणारी असावी लागते. या दोन गोष्टींची सांगड कशी घालावी हे या उपघटकाच्या अभ्यासातून लक्षात येते. किंमत ठरवताना फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचा वापर कसा करावा, त्यातून उत्पादकांचा लाभ कसा होईल याचीही माहिती मिळते. कमॉडिटी मार्केट्समध्ये मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण (फंडामेंटल अ‍ॅण्ड टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस) कसे करावे यासंबंधीची माहिती मिळते. थोडक्यात या विषयाद्वारे उत्पादित कृषी उत्पादन आणि कृषी उद्योगावर आधारित वस्तूंचे मूल्य कसे ठरवावे हे शिकता येते.

ग्रामीण विकासामध्ये सरकारी संस्थांचे महत्त्व मोठय़ा  प्रमाणावर आहे. यासंबंधित सरकारी संस्था, सहकारी संस्था, पतसंस्थांचे कामकाज कसे चालते व त्यासंबंधीचे नियम काय आहेत याची माहितीसुद्धा असणे अत्यावश्यक ठरते. सरकारी पतपेढय़ांमार्फत, सरकारी बँकांमार्फत आणि इतर बँकांमार्फत जो कर्जपुरवठा होतो त्यासाठी कोणते नियोजन करावे तसेच जोखमीचे व्यवस्थापन (रिस्क मॅनेजमेंट) कसे करावे याची माहिती घेता येते. कृषीविषयक उद्योगांचा प्रकल्प अहवाल कसा तयार करावा व त्याचे मूल्यमापन कसे करावे हेही शिकता येते.

विपणन व वित्तीय बाबींसोबतच ग्रामीण भागातील शेतीमालावर आधारित उद्योगांमधील मनुष्यबळ विकासाचे व्यवस्थापन कसे करावे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. या उद्योगात काम करणारे कामगार बहुतांशी ग्रामीण भागांतून आलेले असतात. त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे या सर्व गोष्टी आव्हानात्मक आहेत. याकरता मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन यातील आधुनिक तंत्रे शेतीवषयक उत्पादनातील उद्योगांमध्ये कशा पद्धतीने वापरता येतील असा विचार करणे हाही अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, व्यवस्थापनातील वेगवेगळे विभाग आणि त्यांची कामे म्हणजे विपणन (मार्केटिंग), वित्त (फायनान्स), मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन (ह्युमन रिसोर्स, डेव्हलपमेंट व मॅनेजमेंट), उत्पादन व्यवस्थापन (प्रॉडक्शन मॅनेजमेंट). या सर्वाचा वापर या उद्योगांमध्ये कसा करता येईल हे या विषयाच्या अभ्यासातून जाणून घेता येते.

देशातील ग्रामीण विभाग आणि अर्थातच शेती विभाग यांचा विकास होण्याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच याही स्पेशलायझेशनमध्ये अनेक उत्तम करिअर संधी आहेत आणि भविष्यात त्या अधिक वाढतील. मात्र, त्याकरता आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हायला हवा.

क्रमिक अभ्यासाला प्रात्यक्षिकाची जोड दिल्यास  यासंबंधीच्या विविध घटक-उपघटकांमधील करिअरमध्ये भक्कम पाय रोवणे सहजशक्य आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...