Monday 2 May 2022

वाहतूक

वाहतूक

वाहतूक : एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाप्रत माणसे व माल हलविण्याची क्रिया वा कृती. माणसांना इष्ट त्या स्थळी जाण्याची गरज वा इच्छा असल्यास त्या स्थळी पाठविणे वा नेणे तसेच त्यांना आवश्यकता वा गरज भासणाऱ्या वस्तूंची वा मालाची पोच वा पाठवणी करणे, ह्या गोष्टी वाहतुकीमुळे शक्य होतात. वाहतुकीविना व्यापार शक्य नाही, व्यापाराशिवाय गावे वा शहरे वसणे शक्य नाही. परंपरेने गावे व नगरे (शहरे) ही संस्कृतिकेंद्रेच समजण्यात येतात. म्हणूनच एका प्रकारे वाहतूक ही संस्कृतीची माता वा जननीच मानावयास हवी.

विविध संस्कृत्यांचे (वा देशांचे / राष्ट्रांचे) इतिहास पाहू जाता असे आढळून येते की, वाहतुकीची प्रगती सतत मंद व अत्यंत अवघड अशीच होत आली आहे. प्रागैतिहासिक काळापासून लोक मुख्यतः पायीच प्रवास करीत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे माल आपल्या पाठीवरून, डोक्यावरून अथवा जमिनीवरू ओढत वा ढकलत नेत असत. इ. स. पू. ५००० वर्षांच्या सुमारास, लोक ओझी वाहून नेण्याकरिता प्राण्यांचा वापर करू लागले. इ. स. पू. ३००० वर्षांच्या सुमारास, चार चाकांची गाडी (वॅगन) तसेच शिडांची गलबते यांचा शोध लागला. त्यामुळे प्राणी, वॅगन व शिडांची गलबते यांचा वापर केल्यामुळे लोकांना ओझी व माल अधिक अंतरावर-सुदूर अंतरावर -वाहून नेणे सुलभ होत गेले. अर्थातच वाहतुकीचा वेग मात्र गतिमान होण्यासाठी अनेक शतकांचा काळ जावा लागला.

एंजिनांमुळे गतिमानता लाभलेल्या वाहनांचा शोध सतराव्या शतकाच्या जवळजवळ शेवटी व अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत लागल्याचे आढळते. हा विकास म्हणजे वाहतूकक्षेत्रातील क्रांतीचा आरंभ टप्पा (आरंभावस्था) मानावयास हवा, कारण की विकासप्रक्रिया अजूनही चालू आहे. सांप्रत जेट विमाने माणसांना जवळजवळ ध्वनीच्या वेगाने अथवा त्याहूनही अधिक वेगाने एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाहून नेतात. जगातील बहुतेक भागांत आगगाड्या, ट्रक, अवाढव्य मालवाहू जहाजे प्रचंड मालाचा साठा सातत्याने खरेदीदारांकडे पोहोचवीत असतात. मोटारगाड्या लक्षावधी लोकांची सोयीस्कर व सुकर वाहतूक देश-प्रदेशांच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत घडवून आणतात.

जरी एंजिनप्रणीत वाहनांच्या वाहतुकीमुळे लोकांना अनेक फायदे झाले असले, तरी तीमुळे समस्याही उद्‌भवल्या आहेत. उदा., एंजिनांच्या वाहनांमुळे इंधन इंधन प्रमाण फार मोठे लागते व परिणामी जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर व साठ्यावर विलक्षण ताण निर्माण होतो. मोटारगाड्यांच्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते व राजमार्ग यांमध्ये प्रचंड अडथळे निर्माण होऊन त्यांचा परिपाक प्रवासाच्या मंदगतीमध्ये होतो. याशिवाय या मोटारगाड्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे व वाफेमुळे सबंध परिसर व आसमंत दूषित होतो. या समस्या इतक्या जटिल आहेत की, वाहतूक प्रश्नांची उकल करण्याच्या कामी शासनांना जास्तीत जास्त भाग घ्यावा लागत आहे.

या लेखामध्ये वाहतूक प्रकार, त्यांचा विकासेतिहास आणि सांप्रतची एंजिनप्रणीत गतिशील वाहतूक यंत्रणा यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

वाहतूक प्रकार : वाहतुकीचे मुख्यतः (१) जमीन, (२) जल व (३) हवा, असे तीन प्रकार संभवतात. जमिनीवरील वा भूपृष्ठावरील वाहतूक ही प्रामुख्याने चाकांच्या वाहनांवर उदा., मोटारगाड्या, आगगाड्या व ट्रक यांवर अवलंबून असते. जहाजे व आगबोटी ही मुख्यतः जलवाहतूक करणारी वाहने होत. हवेतून केली जाणारी वाहतूक ही सर्वस्वी विमानांवरच अवलंबून असते.

प्रत्येक वाहतूक प्रकार ही पुन्हा ती वाहतूक करणारी वाहने एंजिनप्रणीत वा एंजिनाविरहित आहेत किंवा काय, यांवर सीमित असतो. एंजिनप्रणीत वाहनांना पेट्रोल, डीझेल वा जेट एंजिने लावलेली (बसविलेली) असतात. एंजिनविरहित वाहने ही मानवाच्या, प्राण्यांच्या स्नायुशक्तीमुळे अथवा वारा किंवा वाहते पाणी यांसारख्या नैसर्गिक शक्तिस्त्रोतांमुळे चालविणे शक्य होते.

एंजिनप्रणीत वाहतूक ही एंजिनरहित वाहतुकीपेक्षा पुढील कारणांमुळे फायदेशीर ठरतेः एकतर ती जलद, वेगवान, सोयीस्कर आणि अवलंबून राहता येईल अशी असते दुसरे म्हणजे तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण करणे शक्य होते. अर्थातच अशा प्रकारची वाहतूक ही महागडी व खर्चिक असते. एंजिनप्रणीत वाहनांद्वारे करण्यात येणाऱ्या वाहतुकीवर अनेक सहस्त्र डॉलरपासून लक्षावधी डॉलरपर्यंत खर्च करावा लागतो आणि ही खर्चमर्यादा वाहतूक कोणत्या प्रकारच्या वाहनांतून केली जाते, यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या वाहतुकीमध्ये, वापरण्यात येणाऱ्या वाहनांकरिता आधार सुविधा आवश्यक असतात. उदा., मोटारींना वाहतुकीसाठी रस्त्यांची, आगगाड्यांना लोहमार्गाची, जहाजे व आगबोटी यांना बंदरांची, तर विमानांना विमानतळांची अत्यावश्यकता असते. या सर्व सुविधा बांधावयास (निर्माण करावयास) व त्यांचे जतन वा संवर्धन करावयास अत्यंत खर्चिक (महागड्या) असतात. एंजिनप्रणीत वाहतुकीच्या प्रत्येक प्रकाराला ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे वाहनांची किंमत, आनुषंगिक सुविधा आणि ऊर्जा यांवर येणारा खर्च हे सर्व जमेस धरता एंजिनप्रणीत वाहतूक ही अत्यंत खर्चिक होऊ शकते.

औद्योगिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांमध्ये (उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, यूरोपीय राष्ट्रे इ.) एंजिनप्रणीत वाहनांचा सर्वाधिक उपयोग वापर केला जातो, तर आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका यांसारख्या खंडांतर्गत देशांत एंजिनप्रणीत वाहनांचा उपयोग वा वापर अतिशय खर्चिक व त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना परवडणारा असू शकत नाही.

भूपृष्ठीय वा जमिनीवरील वाहतूक ही सर्वाधिक स्वरूपात केली जाणारी वाहतूक मानली जाते. एंजिनप्रणीत (एंजिनचालित) भूपृष्ठवाहतुकीमध्ये मोटारगाड्या, बसगाड्या, मोटारसायकली, नळमार्ग, बर्फावरील घसरगाड्या, आगगाड्या (रेल्वे), तसेच ट्रक यांचा प्रामुख्याने समावेश होतो. नळमार्ग आणि बर्फावरील घसरगाड्या यांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांना चाकांची आवश्यकता असते.

मोटारगाड्या, बसगाड्या व मालवाहू गाड्या (ट्रक) ही प्रामुख्याने रस्त्यावरून धावणारी वाहने होत. ज्या भागांत रस्त्यांचे (मार्गांचे) चांगले जाळे पसरलेले असेल, त्या प्रदेशांत या वाहनांमुळे अनेक प्रकारच्या वाहतूक सुविधा पुरविल्या जाणे शक्य होते. लोकांना सोयीस्कर वेळेस व अतिजलद मार्गाने (मार्गावरून) मोटारगाड्यांमधून प्रवास करता येतो. बसगाड्यांच्यायोगे शहरांमधील तसेच शहरांच्या अनेक भागांमधून प्रवाशांना प्रवास करणे शक्य व सोयीचे होते. यूरोपीय देश, जपान यांसारख्या देशांमध्ये अनेक लोक आपल्या घरांतून कामाच्या जागी व पुन्हा घरी मोटारसायकली तसेच स्कूटर या जलद व सुटसुटीत वाहनांद्वारा प्रवास करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात, निखळ मनोरंजनाच्या हेतूने लोक मोटारसायकली वापरतात.

याउलट आगगाड्यांना लोहमार्गांवरून अथवा रुळांवरून धावावे लागते. परिणामी, ट्रकांप्रमाणे घरपोच मालवाहतूक सेवा अथवा बसगाड्यांप्रमाणे जोडसेवा रेल्वेला करता येणे अवघड असते. परंतु ट्रकांपेक्षा अधिक प्रमाणात मालवाहतूक तसेच बसगाड्यांपेक्षा कितीतरी अधिक संख्येने प्रवासी वाहतूक रेल्वेला करता येते. बर्फावरील घसरगाड्या या वर्षातून अधिक काळ बर्फवेष्टित उत्तर गोलार्धातील प्रदेशांतून वाहतूक करीत असतात. नळमार्ग हे वाहतुकीच्या अन्य प्रकारांसारखे स्वतः हालचाल करीत नाहीत. बहुतेक नळमार्ग हे जमिनीवरून बांधण्यात आलेले असतात परंतु काही नळमार्ग हे नद्यांमधून अथवा जलप्रदेशांतून टाकण्यात येतात. या नळमार्गातून मुख्यतः द्रवपदार्थ, वायू (उदा., खनिज तेल, नैसर्गिक वायू इ.) इत्यादींची वाहतूक केली जाते.

एंजिनरहित जमिनीवरील वाहतूक : चालणे हा वाहतुकीचा सर्वांत प्राथमिक प्रकार होय. पाठीवरून वा डोक्यावरून ओझे वाहून नेणे अथवा ओझे (माल) वाहून नेण्याकरिता, प्राण्यांचा वापर करणे, हाही प्राथमिक प्रकार होय. अशा प्रकारची मालवाहतूक करणाऱ्या जनावरांना ‘पॅक ॲनिमल्स’ अथवा ‘बीस्ट्‌स ऑफ बर्डन’ (ओझी वाहून नेणारी जनावरे वा प्राणी) असे संबोधिले जाते. या प्राण्यांमध्ये उंट, गाढवे, हत्ती, घोडे, लामा, बैल इत्यादींचा अंतर्भाव होतो. ज्या भागांत आधुनिक पद्धतीचे रस्ते नसतात, अशा भागांत (उदा., वाळवंटे, दुर्गम पर्वतीय प्रदेश, जंगले इ.) अशा प्राण्यांचा वापर करण्यात येतो.

कित्येक लोक ढकलगाड्या, सायकली, पेडिकॅब यांसारखी स्नायूंचे सामर्थ्य दाखविणारी वाहने वापरताना आढळतात. ढकलगाडीला दोन वा चार चाके असतात सायकलीला दोन चाके असून ती पायंड्याच्या आधाराने फिरविता येतात. यूरोपातील अनेक देशांमधून तसेच आशियाई देशांतून लोकांना मोठ्या प्रमाणावर कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणे शक्य होते. पेडिकॅबला मागील बाजूस दोन चाके असतात तिचा वापर टॅक्सीप्रमाणे आणि कित्येक पौर्वात्य देशांमधून शाळेत मुलांना नेण्या-आणणाऱ्या बसगाडीसारखा करण्यात येतो. बैल वा घोडे यांसारख्या प्राण्यांमार्फत खेचून नेणाऱ्या गाड्या पौर्वात्य व विकसनशील देशांच्या ग्रामीण भागांत सर्रास वापरात असलेल्या आढळतात.

जलवाहतूक ही मुख्यत्वे बोटी वा जहाजे, तसेच तराफे यांवर अवलंबून असते. वल्ह्यांच्या साहाय्याने नद्या, कालवे, सरोवरे यांमधून नावांचा वापर करण्यात येतो. जहाजांचा वापर खासकरून समुद्रातील वाहतुकीसाठी केला जातो. मोठमोठे ओंडके एकत्र बांधून त्यांद्वाराही सामानाची वा प्रवाशांची वाहतूक केली जाते. अशा साधनांना ‘तराफे’ असे संबोधतात.

एंजिनचालित जलवाहतूक : बहुतेक मोठ्या बोटी व जहाजे यांची एंजिनाच्या साहाय्याने वाहतूक करण्यात येते. कित्येक मोठी जहाजे वा बोटी ह्या प्रचंड प्रमाणावर माल सागरांतून वाहून नेण्याचे कार्य करतात. ग्रेट लेकसारख्या मोठ्या सरोवरांतून प्रचंड जहाजे माल वाहून नेत असतात. सर्व साधारणपणे एंजिनचलित जहाजे वा बोटी यांची वाहतूक ही तशी वेगवान नसते. जहाजे वा बोटी यांच्यापेक्षा अधिक वेगाने जलवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची (जलपर्णी नौका – हायड्रोफॉइल क्राफ्ट व वाततल्पयान -हॉव्हरक्राफ्ट)  अभियंत्यांनी रचना करून त्यांमार्फत प्रवासी अथवा माल यांची वाहतूक वेगने करण्याची कार्यवाही प्रत्यक्षात आणली आहे. मोठी सरोवरे वा नद्या यांमधून वरील वाहनांतून जलवाहतूक सामान्यतः केली जाते [⟶  जलपर्णी नौका वाततल्पयान].

एंजिनरहित जलवाहतूक : एंजिनांचा वापर न करता नौका, तराफे, शिडांच्या बोटी व जहाजे यांमधूनही जलवाहतूक करण्यात येऊन प्रवासी व माल एका ठिकाणाहून इष्ट त्या ठिकाणी पोहोचविले जातात. नौका, तराफे वगैरेंमधून वल्हे मारून वाहतूक करणे शक्य होते, तर वाऱ्याच्या मदतीने शिडांच्या जहाजांमधून प्रवासी व माल यांची वाहतूक केली जाते ताफा व तराफा यांमधून वल्हे, पायंडी, शिडे वा जलप्रवाह यांच्या मदतीने मालाची व प्रवाशांची वाहतूक करता येते. पौर्वात्य देशांत अशा प्रकारच्या वाहनांना ‘सेलबोट’ (शीडजहाज) वा ‘जंक’, तर रो-बोटींना ‘संपान’ अशी संज्ञा आहे. मोठ्या आकाराची जंक वा संपान यांमधून अवजड मालवाहतूक करणे सोईचे होते.

हवाई वाहतूक : एंजिनचालित वायुयानांमधून, म्हणजेच मुख्यत्वे विमानांमधून, हवाई वाहतूक करणे शक्य होते. एंजिनरहित वायुयाने म्हणजे ग्लायडर, उष्ण-वायुप्रणीत बलून यांचा उपयोग व वापर मुख्यतः मनेरंजनात्मक साधने वा क्रीडासाधने म्हणूनच करण्यात येतो.

विमानांमुळे सर्वांत अत्यंत गतिमान (जलद) वाहतूक उपलब्ध होऊ शकते. रॉकेटप्रणीत अवकाशयाने अधिक वेगाने प्रवास करतात. मोठाली विमाने दरताशी सु. ८०० ते १,००० किमी. या वेगाने प्रवास करतात. सांप्रतच्या काळात बहुतेक विमानांना जेट एंजिने असतात. स्वनातीत (सुपरसोनिक) जेट विमाने ध्वनीहून अधिक वेगाने प्रवास (सु. २,४०० किलोमीटर प्रतितास) करतात. विमानांतून सामानाची व मालाची वाहतूक करणे हे अतिशय खर्चिक असते कारण हवाई माल-वाहतुकीचे दर अतिशय महागडे असतात यामुळेच इलेक्ट्रॉनीय उपकरणांसारख्या अतिशय महाग तथापि वजनाने हलक्या वस्तू वा उपकरणे किंवा ताज्या फुलांसारख्या नाशवंत वस्तू विमानाने पाठविणे शक्य होते. हेलिकॉप्टर ही विमानांप्रमाणेच एंजिनप्रचलित असली, तरी त्यांचा आकार विमानांपेक्षा लहान असल्याने त्यांच्यामधून मर्यादित प्रमाणातच प्रवासी वाहतूक करता येते. हवाई वाहतुकीमध्ये यामुळेच त्यांची दुय्यम दर्जाची भूमिका असते. तथापि संचलनामध्ये व काही महत्त्वाच्या कार्यांमध्ये (मदत-कार्य तसेच जंगलांमधील वणवे विझविणे यांसारखी कामे) त्यांची उपयुक्तता अधिक असते.

इतिहास : प्रागैतिहासिक काळात (म्हणजेच इ.स.पू. ३०० वर्षापर्यंत) वाहतुकीचा विकास वा प्रगती अल्पगतीनेच झाली. कारण या कालावधीत लोकांचे व्यवसाय मृगया, मासेमारी व जंगली वनस्पती गोळा करणे, एवढ्यांपुरतेच सीमित होते. त्या काळी लोक पायीच प्रवास करीत असत आपल्याजवळील ओझे, सामान वा आपली मुले पाठीशी वा डोक्यावर बांधून नेत असत. अतिशय जड सामान मोठ्या कळकाला वा वाशाला बांधून ते दोन वा अधिक माणसांकरवी वाहून नेण्यात येई. काही काळाने प्रागैतिहासिक मानवाला वस्तू वा जड सामान ढकलगाडीवरून नेता येईल, हे सुचले व त्याप्रमाणे तो वागू लागला. हे लोक झाडांच्या फांद्या, खांब, कच्चे कातडे यांच्या साहाय्याने अवजड सामान वाहून नेऊ लागले. या ढकलगाड्यांना धावत्ये (रनर) लावून (बसवून) त्यांच्या योगे अधिक वेगाने ढकलगाड्या ओढता वा नेता येणे शक्य होत गेले. बर्फाळ प्रदेशात कमी वजनाच्या परंतु वेगाने धावणाऱ्या ढकलगाड्या बांधून त्यांचा वापर करण्यात येऊ लागला.

सुमारे इ.स.पू. ८००० वर्षाच्या अवधीत, मध्यपूर्वेतील अनेक लोक-समुदायांनी कृषितंत्र आत्मसात केले व अशा लोकांनी कायमस्वरूपी वस्त्या स्थापण्यास प्रारंभ केला. निरनिराळ्या वसाहतींनी पारस्परिक व्यापारवर्धनाची कास धरल्याने वाहतुकीच्या निकडीची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. गाढव तसेच बैल हे माणसाळलेले प्राणी शेतकामासाठी उपयोगी पडत होते, तसेच वापरातही होते त्यांचाही वाहतूक प्रकारासाठी वापर होऊ लागला. इ.स.पू. ५००० ते इ.स.पू. ३५०० वर्षे या कालावधीत ओझे वाहून नेणारे प्राणी (पॅक ॲनिमल किंवा बीस्ट्स ऑफ बर्डन) म्हणून या प्राण्यांचा उपयोग करण्यात येऊ लागला. ढकलगाड्या ओढून नेण्याच्या तसेच जड ओझी वा सामान या प्राण्यांच्या पाठीवरून वाहून नेण्याच्या प्रकारासही याच काळात मोठी चालना मिळाली.

प्रागैतिहासिक काळात, जलवाहतूक करण्यासही लोकांनी आरंभ केल्याचे आढळून आले. बांबू वा लाकडाचे ओंडके यांच्या मदतीने लोकांनी तराफे बांधून पाण्यातून वाहतूक करावयास प्रारंभ केला. प्रागैतिहासिक काळातील लोकांनी यानंतर होड्या, द्रोणी, पडाव, नावा तयार करण्याची कला आत्मसात केली आणि बांबू वा हातवल्हे यांच्या साहाय्याने हे लोक सरोवरे वा मोठे प्रवाह यांमधून वाहतूक करू लागले. समुद्रातून प्रवास करावयाला या नावा वा होड्या तेवढ्या सक्षम नव्हत्या.

इ. स. पू. ३५०० च्या सुमारास मानवाला चाकाचा शोध लागला असावा. हा शोध मेसोपोटेमियात लागल्याचे मानतात. [⟶  चाक]. इ. स. पू. ३२०० च्या सुमारास ईजिप्शियनांनी शिडाच्या गलबतांचा शोध लावला. पुढील काही शतकांच्या कालावधीत चाके असलेली वाहने तसेच शिडांची गलबते यांच्या योगे वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आली.

मेसोपोटेमिया व ईजिप्त यांमध्ये इ. स. पू. ३५०० ते ३००० वर्षांच्या कालावधीत जगातील अनेक प्राचीन मोठ्या संस्कृत्यांचा उदय झाल्याचे दिसून येते. मेसोपोटेमिया व ईजिप्त या दोन केंद्रांपासून या संस्कृत्यांचा प्रभाव व प्रसार हळूहळू पश्चिमेकडे भूमध्य समुद्राच्या किनारी भागांनी होत गेला. संस्कृतिप्रसाराच्या कार्यात शिडांच्या गलबतांनी मोठी कामगिरी बजावली. भूमध्य समुद्राच्या किनारी भागातील प्राचीन संस्कृत्यांचा समृद्धिकाळ इ. स. पू. ३००० ते इ. स. ५०० वर्षांच्या सुमारास घडून आल्याचे आढळते. याच काळात शिडांच्या गलबतांमध्ये त्याचप्रमाणे चाकांच्या वाहनांमध्ये घडत गेलेल्या सुधारणांच्या योगे वाहतूक विकास जलद प्रमाणात होत गेला. फिनिशिनयांनी इ. स. पू. १००० च्या सुमारास व्यापारी जहाजांचा ताफा विकसित केला. हे लोक भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्याच्या भागात वस्ती करून होते. फिनिशियनांनी मृत्पात्रांपासून गाईगुरांपर्यंत भूमध्य समुद्राच्या सर्व बंदरांमधून स्पेनपर्यंत व्यापारासाठी शिडांच्या जहाजांमधून वाहतूक केली. अर्थातच हा सागरी जलप्रवास नौकावहन उपकरणांच्या शोधाअभावी व दुर्लभतेमुळे अतिशय संथ व मंदगतीनेच विकसित होत गेल्याचे दिसते.

चाकाच्या वाहनांचा विकास मेसोपोटेमियात इ. स. पू. ३५०० च्या सुमारास झाला. हे तंत्र येथूनच हळूहळू प्रसृत होत गेले. भारतात ते इ. स. पू. २५०० च्या सुमारास, युरोपमध्ये इ. स. पू. १४०० च्या सुमारास व चीनमध्ये इ. स. पू. १३०० च्या सुमारास पोहोचले.

पहिली चाकांची वाहने चार-चाकी असून ती बैलांकरवी वा इ. स. पू. ३००० च्या सुमारास गर्दभसदृश प्राण्यांकडून ओढली जात असत. प्रथमतः मेसोपोटेमियनांनी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर शववाहिका म्हणून केला. इ. स. पू. ३००० नंतर अशी वाहने मेसोपोटेमियन सैनिक, त्याचप्रमाणे वाळू, धान्य आणि अशाच प्रकारचे सामान वाहून नेण्याकरिता वापरण्यात येऊ लागली. इ. स. पू. २००० पर्यंत चाके ही तीन लाकडी फळ्यांची बनविण्यात येत असत. नंतर इ. स. पू. २००० – इ. स. पू. १५०० च्या दरम्यान आरे असलेली चाके प्रथमच वापरात आली. या प्रकारच्या चाकांमध्ये एक पाळ (रिम), तुबा (हब) व आरे, असे तीन भाग असत. आऱ्यांच्या चाकांमुळे भरीव लाकडी चाकांपेक्षा अधिक सुखावह व जलद वाहतूक होऊ लागली. आरे असलेली चाके प्रथम रथांकरिता वापरली गेली असावीत. इ. स. पू. २००० च्या सुमारास रथ ओढण्याकरिता प्रथमच घोड्यांचा वापर करण्यात आला. इ. स. पू. ४०० च्या सुमारास ग्रीकांनी सागरी व्यापाराचा विस्तार केला. त्याचप्रमाणे एकाऐवजी दोन डोलकाठ्या व चार शिडांची जहाजे वापरण्यास प्रारंभ केला. ग्रीक व्यापारी जहाजांच्या योगे ग्रीक संस्कृतीचा पश्चिम दिशेकडे विस्तार होण्यास मोठीच मदत झाली. संस्कृतीपाठोपाठ जहाजवाहतूक व व्यापार या दोहोंत वाढ होणे अपरिहार्य होते.

इ. स. पू. १०० पासून इ. स. ४०० वर्षांच्या कालावधीत रोमन साम्राज्याची कारकीर्द लक्षणीय असल्याचे प्रत्ययास येते. रोमन साम्राज्याच्या उत्कर्षकाळी, भूमध्य समुद्राच्या किनारी भागातील सर्व प्रदेश रोमन साम्राज्यात अंतर्भूत झाले होते, उत्तरेस ब्रिटिश बेटांपासून पूर्वेकडील इराणच्या आखातापर्यंत रोमन साम्राज्या पसरले होते. एवढ्या विस्तीर्ण साम्राज्यातील भूप्रदेशाला सुसूत्रपणे सांभाळण्यासाठी रोमन शास्त्यांनी अतिशय प्रगत अशी रस्ते-यंत्रणा उभारली. अर्थातच रोमनांपूर्वी रस्त्यांचे बांधकाम चालू होते. इ. स. पू. २००० च्या सुमारास चीनमध्ये मोठी शहरे जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करण्या येत होते इराणी राज्यकर्त्यांनी इ. स. पू. ५०० च्या सुमारास असेच रस्ते तयार करण्याचे काम चालू केले होते. तथापि अशा प्रकारचे आंतर-नगरीय रस्ते म्हणजे धूळ- पायवाटेपेक्षा जरा बरी अवस्था असलेले, असे ते रस्ते होते. फरसबंदी रस्त्यांचे जाळे प्रथम रोमनांनीच निर्माण केले त्यांची रुंदी ५ ते ६ मी. व जाडी १ ते २ मी. एवढी होती. आपले सैन्यदल तसेच युद्धसामग्री यांची ने-आण करण्याच्या उद्देशानेच रोमनांनी हे रस्ते बांधले होते. त्याचबरोबर रोम व इतर प्रांत यांमधील संदेशव्यवस्था (संपर्कव्यवस्था) अबाधित राहण्याकरिताही (राखण्याकरिताही) या रस्त्यांचा विहित उपयोग केला जात असे. इ. स. २०० च्या सुमारास रोम व रोमन साम्राज्यांतर्गत बहुते सर्व प्रदेश ८०,००० किमी. पेक्षा अधिक लांबीच्या फरसबंदी रस्त्यांनी जोडण्यात आले होते. इ. स. ४०० च्या सुमारास जर्मन टोळ्यांनी पश्चिम यूरोपमधील बहुतेक रोमन प्रदेश बळकाविले. पुढेपुढे रोमन रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होत गेली. रस्त्यांप्रमाणेच सागरी वाहतुकीत रोमन मालवाहू जहाजांनी अग्रेसरत्व प्रस्थापित केले होते [⟶  रस्ते].

मध्ययुगामध्ये (इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंतचा कालावधी) भूपृष्ठीय व सागरी अशा दोन्ही वाहतूक प्रकारांत मोठ्या सुधारणा घडून आल्याचे आढळते. त्या म्हणजे घोड्याला बांधावयाचा गळपट्टा (हॉर्स कॉलर), घोड्याला मारावयाचे लोखंडी नाल (आयर्न हॉर्स-शू) आणि घोड्याच्या पाठीवर बांधलेले ओढण (व्हिफल ट्री), ह्या होत. घोड्याच्या गळपट्ट्याचा शोध इ. स. ८०० च्या सुमारास, लोखंडी नालाचा युरोपमध्ये इ. स. ९०० च्या सुमारास, तर घोड्याच्या ओढण्याचा इ. स. १००० च्या सुमारास लागला. गळपट्ट्यामुळे ओझ्याचा ताण घोड्याच्या मानेवरून त्याच्या खांद्यांवर पडला. त्यामुळे घोडे चौपट ते पाचपट अधिक ओझे ओढून नेऊ लागले. नालाशिवाय घोड्यांच्या खुरांना दूरवरच्या प्रवासात इजा होत असे. लोखंडी नालाच्या योगे घोड्यांच्या खुरांना संरक्षण लाभले व परिणामी घोड्यांना अधिक दूरवर व जलद गतीने अंतर कापणे शक्य झाले. ओढण्यामुळे वाहनांना एकापेक्षा अधिक घोडे जुंपता येऊ लागले, परिणामी वाहनांची गती वाढली, त्याचबरोबर घोड्यांनाही अधिक ओझे वाहून नेणे सोयीचे झाले. या तिन्ही शोधांमुळे जमिनीवरील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला घोड्यांच्या वाहनांमुळे प्रवासी वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होत गेली.

मध्ययुगात जहाजांचा अभिकल्प व त्यांची बांधणी अशा दोहोंतही परिणामकारक सुधारणा घडून आल्या. जहाजांच्या मागील बाजूस (स्टर्न –म्हणजेच वराम – भागात) असलेल्या वल्ह्यांऐवजी सुकाणूचा वापर करणारी जहाजे यूरोपात १३०० च्या सुमारास प्रचारात आली. १४०० च्या सुमारास जहाजांच्या आकारात पूर्वीपेक्षा चौपटीने वाढ झाली तसेच त्यांमधून एक सुकाणू, तीन डोलकाठ्या व तीन शिडे वापरण्यात येऊ लागली. याच काळात नौकांच्या मार्गनिर्देशनाची उपकरणेही (नॅव्हिगेशनल इन्स्ट्रूमेंट्स, उदा., खलाशांचा वा नावाड्यांचा दिक्‌सूचक-मरीनर्स कंपास) विकसित झाली [⟶  दिक्‌सूचक].

चौदाव्या व पंधराव्या शतकांत क्रिस्टोफर कोलंबस, फर्डिनंड मॅगेलन, सर फ्रॅन्सिस ड्रेक इ. समन्वेषकांनी धाडसी सफरी करून नवनवे प्रदेश शोधून काढले. जहाजबांधणी उद्योगात जरी सुधारणा होत गेल्या, तरी सागरी प्रवास व वाहतूक यांचे प्रमाण मंदच राहिले. सोळाव्या शतकापासून सागरी व्यापार-वाहतुकीत जलद वाढ होत गेली. मालवाहतुकीसाठी मोठ्या आकारमानाची जहाजे बांधण्यात येऊ लागली साहजिकच मोठ्या जहाजांना व गलबतांना अधिक शिडेही लावावी लागत होती. अठराव्या शतकाच्या मध्यास जलदगती जहाजांना सु. ३५ शिडे असत आणि त्यांचा वेगही सु. २० नाविक मैल (नॉट) एवढा असे.

देशांतर्गत वाहतूक : सोळाव्या शतकाच्या सुमारास मालाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी घोडागाड्या वापरण्यात येत असल्या, तरी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लांब अंतराच्या प्रवासाकरिता त्यांचे वापर-प्रमाण अत्यल्प असे. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, घोड्यांनी ओढली वा खेचली जाणारी जहाजे (नौका व पडाव) हीच काय ती अंतर्गत जलवाहतुकीची प्रमुख साधने समजण्यात येत. नदीच्या व कालव्याच्या काठाने घोडे चालत राहात आणि त्यांच्या गळ्यातील दोरखंड पाण्यातील जहाजांना व पडावांना बांधलेला असल्याने घोड्यांच्या हालचालींबरोबर पाण्यातील जहाजांची व पडावांचीही वाहतूक चालू राहत असे.

मध्ययुगाच्या अंतिम चतुर्थकापासून अठराव्या शतकारंभापर्यंतच्या काळात यूरोपमध्ये शेकडो कालवे बांधण्यात आले. ग्रेट ब्रिटनमध्ये बांधण्यात आलेल्या काही प्रारंभीच्या कालव्यांमधून खाणींपासून औद्योगिक शहरांपर्यंत कोळशाची स्वस्त दराने वाहतूक करण्यात येऊ लागली. १७६२ मध्ये सुरू झालेल्या ब्रिजवॉटर कालव्यामुळे वोर्स्ली येथील कोळसाखाणी मँचेस्टरमधील कारखान्यांशी जोडणे सुलभ झाले. कालवा -वाहतुकीमुळे औद्योगिक क्रांतीचे यश अधिकच विस्तारत गेले [⟶  कालवे व देशांतर्गत जलमार्ग]. १८४० पासून सुरू झालेल्या रेल्वेवाहतुकीमुळे कालवे-वाहतुकीवर निश्चितच गंभीर परिणाम झाला कारण रेल्वे अधिक जलद व सुदूर अंतरापर्यंत वाहतूक करणारे साधन बनले.

फ्रान्स व ग्रेट ब्रिटन ह्या दोन देशांत अठराव्या शतकात रोमनांनंतर प्रथमच फरसबंदीचे उत्तम दर्जाचे रस्ते बांधण्यास येऊ लागले. १८५० च्या सुमारास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ‘नॅशनल रोड’ नावाचा पहिला मोठा राजमार्ग (महामार्ग) बांधण्यात आला. उत्तर मध्ययुगापासून प्रचलित असलेली घोडागाडी (वॅगन) व कोच ही वाहने वापरात होती पॅरिसमध्ये १६६० च्या सुमारास पहिली कोच-वाहतूक सुरू झाली. शहरांतून धावणाऱ्या सांप्रतच्या बसगाड्यांचे हे आद्यरूप होय. १६७० पासून लंडन (ग्रेट ब्रिटन) ते एडिंवरो (स्कॉटलंड) या सु. ६३० किमी. दीर्घ अंतराच्या प्रवासी वाहतुकीचा प्रारंभ कोचसेवेने झाला. या गाड्यांना ‘स्टेजकोच’ असे म्हणावयाचे कारण म्हणजे, या गाड्या ठराविक ठिकाणी (स्टेज) घोडे बदलण्याकरिता थांबविण्यात येत असत.

वाफेचे युग : चाक आणि शिडांचे जहाज यांच्या शोधांनंतर वाफेच्या एंजिनांचा लागलेला शोध, ही वाहतूकक्षेत्रातील सर्वांत मोठी क्रांतिकारक घटना समजली जाते. १७०० च्या पुढे ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वाफेचे एंजिन विकसित केले. निकोलस कूनो या फ्रेंच लष्करी कॅप्टनने १७६९ मध्ये वाफेच्या एंजिनावर धावणारे पहिले वाहन तयार केले. १८०० च्या पुढील काळात वाफेवर धावणाऱ्या प्रवासीवाहक गाड्या ग्रेट ब्रिटनमध्ये बनविण्यात आल्या. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १८०७ च्या सुमारास पहिले बाष्पचालित प्रवासी जहाज कार्यान्वित झाले. १८२५ साली ग्रेट ब्रिटनमध्ये वाफेच्या एंजिनाची आगगाडी धावू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बाष्पचलित जहाजांनी शिडांच्या जहाजांची जागा घेतल्याचे आढळते. अर्थातच वाफेच्या एंजिनाच्या साहाय्याने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे वाहतूकक्षेत्रात यथार्थाने क्रांती झाल्याचे मानले जाते. या आगगाड्यांचा वेगही दर ताशी १०० वा त्यांहूनही अधिक किमी. एवढा होता. आगगाड्यांमधून पूर्वीपेक्षा शंभराच्या पटीहून अधिक वजनाचे अवजड सामान वाहून नेणे शक्य झाले. १९०० च्या सुमारास यूरोप, उत्तर अमेरिका, यांमधून तसेच आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका या खंडांमधील अनेक प्रदेशांतून कित्येक किमी. लांबीचे लोहमार्ग टाकण्यात येऊन रेल्वेवाहतूक चालू करण्यात आली. जसजसे जहाजवाहतूक व रेल्वे वाहतूक यांचे प्रमाण वाढत गेले, तसतशी प्रवासी व माल यांच्या वाहतूकदरांत साहजिकच घट होत गेली. त्यांयोगे पर्यटन, व्यापार आणि शहरे यांमध्ये वाढ होत गेली. जलद हालचाली, जलद व गतिमान प्रवास व गतिमान बदल यांची लोकांनाही सवय होऊ लागली. जीवनाच्या जलद गतिमानतेमुळे अधिक जलद व गतिमान वाहतुकीची मागणी निर्माण होऊ लागली [⟶  जलवाहतूक रेल्वे].

अर्वाचीन वाहतुकीचा प्रारंभ : १८८० च्या पुढील काळात विजेवर धावणाऱ्या आगगाड्या व ट्रामगाड्या यूरोपीय देश आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांमध्ये प्रथमच वापरात आल्या. १८९० च्या पुढे जर्मन यांत्रिक अभियंते रूडोल्फ डीझेल (१८५८-१९१३) यांनी संपीडन प्रज्वलन एंजिनाचा शोध लावला त्यांचेच नाव नंतर या एंजिनाला देण्यात आले. बहुतेक रेल्वेगाड्यांना तसेच अनेक जहाजांवर डीझेल एंजिने बसविण्यात आली. यामुळेही वाहतूकक्षेत्रात मोठी सुधारणा झाली तथापि पेट्रोल एंजिनाच्या शोधामुळे वाहतूकक्षेत्रात अतिशय दूरगामी परिणाम व बदल घडून आले. १८०० मध्ये यूरोप खंडात सायकलचा शोध लागून तिचा विकास करण्याचे प्रयत्न चालू होते. १८८० च्या पुढील काळात जर्मन संशोधकांनी पेट्रोल एंजिन पूर्णपणे विकसित केले आणि अशा प्रकारची एंजिने त्यांनी सायकली व तिचाकी गाड्या यांना बसविली. १८९० च्या पुढील काळात फ्रेंच अभियंत्यांनी मोटारींना प्रथमच पेट्रोल एंजिने बसविली याच सुमारास जर्मनीमध्ये पेट्रोल एंजिनांच्या बसगाड्या व मालवाहूगाड्या (मालट्रक) वाहतूक करू लागल्या. १९०३ मध्ये ऑर्व्हिल व विल्बर राइट या दोन अमेरिकन बंधूंनी स्वतः बनविलेल्या एका लहानशा विमानाला पेट्रोल एंजिन बसविले. मानवाला आकाशात घेऊन जाणारे हे पहिलेच विमान होय.

अनेक औद्योगिक देशांत १९२० च्या पुढील काळात मोटारी हे प्रवासी वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले. मोटारमालकांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतशी अधिक लांबीच्या व अधिक चांगल्या रस्त्यांची मागणीही वाढली. १९०० ते ११९३० या कालावधीत अनेक नवीन रस्ते बांधण्यात आले.

यूरोपमध्ये व्यापारी तत्त्वावर विमानसेवा प्रथम १९१९ मध्ये सुरू झाली. १९३० – ४० या दशकात सबंध जगात प्रतिवर्षी सु. ३५ लक्ष प्रवाशांची विमानवाहतूक होत होती. या विमानांना परिचालक (पंखे) व पेट्रोल-एंजिने होती. याच दशकात जर्मन अभियंत्यांनी प्रथमच विमानांना जेट एंजिने बसवून हवाईवाहतूक कार्यान्वित केली. १९५० च्या पुढील काळात जेट विमानांतून प्रवासीवाहतूक व्यापारी तत्त्वावर सुरू झाली.

जगभराच्या आढाव्यावरून असे दिसते की, १९०० च्या पुढील काळात वाहतूकक्षेत्रात घडून आलेल्या प्रगतीच्या अनेक टप्प्यामुळे लोकांच्या जीवनातही प्रचंड बदल घडून आले. व्यापारी स्वरूपातील प्रवासी हवाईवाहतुकीच्या योगे सुदूर अंतरावरचा प्रवास म्हणजे एक प्रकारचा नित्यक्रमच बनला आहे. सागरी जहाजवाहतूक तसेच प्रशीतन प्रक्रिया यांमधील सुधारणांमुळे काही विशिष्ट प्रदेशांतच मिळणारा शेतमाल जगात सर्वत्र त्वरित उपलब्ध होणे शक्य झाले आहे.

मोटार वाहतुकीतील सुधारणांच्या योगे महानगरांभोवती मोठी उपनगरे वसत गेली व वाढतही राहिली. दुकानात जाऊन माल खरेदी करणे, कामावर जाणे व घरी परतणे या कारणांसाठी मोटार हे वाहतूक-साधन अतिशय उपयुक्त ठरू लागले [⟶ मोटार वाहतूक].

वाहतूक : सद्यस्थिती : एंजिनप्रचालित वाहतूक विकसित होईपर्यंतच्या काळात, बहुतेक वाहतूक ही सामानाची ने-आण करण्यासाठीच केली जात असे कारण प्रवासी वाहतूक विशेष रूढ झाली नव्हती. एंजिनप्रचालित वाहतुकीच्या विकासाबरोबर या परिस्थितीत जलद सुधारणा होत गेली. सांप्रत औद्योगिक राष्ट्रांमध्ये प्रवासी वाहतूक ही नित्यजीवनातील एक महत्त्वाची बाब गणली जाते. या राष्ट्रांमधील कामगारांना पूर्वीच्या कामगारांपेक्षा कामाच्या स्थानापासून बऱ्याच दूर अंतरावर राहावे लागत असल्यामुळे प्रतिदिनी कामावर जाण्यासाठी त्यांना भरंवशाची व गतिमान वाहतूक सेवा अत्यावश्यक ठरली आहे. मुलांना शाळेस जाण्याकरिता व घरी येण्याकरिता, कुटुंबातील कर्त्या स्त्री-पुरुषांना कामावर जाण्याकरिता व परत घरी येण्याकरिता, कुटुंबातील विविध व्यक्तींना दुकानांत जाऊन विविध वस्तूंच्या खरेदीसाठी, अनेक लोकांना लांबच्या प्रवासाकरिता अशा अनेकविध कारणांसाठी वाहतूक सुविधेची आवश्यकता भासते. कित्येक औद्योगिक राष्ट्रांमध्ये मालवाहतुकीवर होणाऱ्या  खर्चापेक्षा कितीतरी अधिक खर्च विविध प्रकारच्या प्रवासी वाहतूकसेवेवर होत असलेला आढळून येतो.

प्रवासी वाहतूक : खाजगी व सरकारी (सार्वजनिक) असे प्रवासी वाहतुकीचे दोन प्रकार आहेत. खाजगी प्रवासी वाहतुकीमध्ये लोक आपल्या स्वतःच्या वाहनांचा वापर करतात. सरकारी प्रवासी वाहतूकसेवेमध्ये, लोक खाजगी कंपन्या वा सरकार यांच्या मालकीच्या वाहनांमधून भाडे देऊन प्रवास करतात.

खाजगी प्रवासी वाहतूक ही औद्योगिक देशांमध्ये, मुख्यतः मोटारगाड्या (टॅक्सी), सायकलरिक्षा, मोटारसायकली, खाजगी विमाने यांमार्फत केली जाते अधिककरून मोटारींचा वापर होत असतो. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत लोक प्रकर्षाने मोटरींमधून प्रवास करीत असतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, प. यूरोपीय देश यांमध्ये मोटारगाड्या हे प्रवासी वाहतुकीचे प्रधान साधन समजले जाते. वरील देशांत आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सबंध जगातील मोटारींच्या संख्येपैकी सु. ७७ टक्के मोटारी आहेत. एकट्या अमेरिकेत मोटारधारकांचे प्रमाण सु. ३५ टक्के आहे. अर्थातच वरील सर्व देशांमध्ये अतिशय उत्तम रस्तेयंत्रणा आहे. सबंध जगात सु. ११० लक्ष किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी सु. ३३ टक्के रस्ते एकट्या अमेरिकेत आहेत. विकसनशील राष्ट्रांतही शहरांत राहणाऱ्या व स्वतःच्या मालकीच्या मोटारीने प्रवास वा वाहतूक करणाऱ्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळते.

सार्वजनिक (सरकारी) वाहतूक : सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणारी सुसंघटित प्रवासी वाहतूकसेवा म्हणजे सार्वजनिक (सरकारी) वाहतूकसेवा होय. (१) शहरी वा नागरी (२) शहरांतर्गत (आंतरनगरीय) व (३) समुद्रपार, असे सरकारी वाहतूकसेवेचे तीन प्रकार आहेत.

(१) शहरी वा नागरी वाहतूक : बहुतेक मोठ्या नागरी क्षेत्रांमध्ये सामान्यजनांकरिता सरकारी वा सार्वजनिक वाहतूकसेवा उपलब्ध करण्यात येते. शहरांपासून उपनगरांकडे केल्या जाणाऱ्या वाहतूक सेवेला ‘कॉम्यूटर सर्व्हिस’ असेही म्हटले जाते. जगातील बहुतेक शहरांमध्ये बसगाड्या हाच काय तो सरकारी वाहतुकीचा कणा मानला जातो. याशिवाय अनेक मोठ्या शहरांमधून आगगाड्याचे (रेल्वेचे) जाळे पसरलेले असते. जगातील सु. ९० मोठ्या शहरांमध्ये रेल्वेची दुहेरी वाहतूकयंत्रणा (भूपृष्ठावरील व भुयारी) उपलब्ध आहे. काही मोठ्या शहरांमधून उंचावरून वाहतूक करणाऱ्या रेल्वे असून त्यांचा मार्ग (रूळमार्ग) हा मोटार-रस्त्यापेक्षा उंच स्थानावरून नेलेला असतो. अनेक मोठ्या शहरांमधून सार्वजनिक वाहतूकसेवेमध्ये कमी वजनाच्या डब्यांची व रूळांची ‘हलकी रेल्वेवाहतूक’ (लाइट रेल व्हीइकल्स) अंतर्भूत केलेली असते.

विजेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना ट्रॉली तारांमधून (रेल्वेवरून जाणाऱ्या) वीज पुरविली जाते. ट्रामगाड्या ह्याही हलक्या रेल्वे वाहनांचाच (लाइट रेल व्हीइकल्स) एक प्रकार आहे. एकोणिसाव्या शतकान्ती व विसाव्या शतकारंभी कित्येक शहरांतून ट्रामगाड्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा एक अविभाज्य भाग बनला होता. परंतु ह्या ट्रामगाड्यांचे रूळमार्ग हे रस्त्यांमधून जाणारे असल्याने तसेच मोटारींच्या वाढत्या वाहतुकीशी त्यांचा मेळ बसणे दुष्कर होऊ लागल्याने, त्यांची जागा वाढत्या बसगाड्यांच्या संख्येने घेतली.

सांप्रत विजेवर धावणाऱ्या आगगाड्या भुयारी लोहमार्गावरून, रस्त्यांपेक्षा उंचावर बांधलेल्या लोहमार्गांवरून अथवा मोटार रस्त्यांना समांतर अशा लोहमार्गांवरून धावत असतात. काही रेल्वेगाड्यांचे चालकाशिवाय केवळ संगणकांच्या साहाय्याने चलनवलनाचे नियंत्रण करण्यात येते. विजेवर धावणाऱ्या वाहनांना रबरी टायरची चाके लावलेली असल्याने या रेल्वेगाड्या अधिक सुलभतेने व ध्वनिरहित वाहूतक करू शकतात. मोठी शहरे व त्यांची उपनगरे ही लोकल गाड्यांनी (कॉम्यूटर ट्रेन्स) जोडण्यात येऊन उपनगरी प्रवाशांची मोठी सोय पाहिली जाते. कारण कामाच्या कचेऱ्या, कार्यालये, कारखाने इ. कार्यस्थाने मोठ्या शहरांमध्ये असल्याने तेथे उपनगरांतून लोकांना जाण्यासाठी लोकलगाड्या हे फार सोईचे वाहतूक साधन बनले आहे. [⟶ नागरी वाहतूक].

(२) आंतरनगरीय वाहतूकसेवा (इंटरसिटी सर्व्हिस) : ही वाहतूक सेवा मुख्यतः विमाने, बसगाड्या व रेल्वे यांमार्फत पुरविली जाते. नद्यांतून वाहतूक करणाऱ्या जहाजांचा व फेरी बोटींचा यामधील हिस्सा अत्यल्प आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया यांसारख्या उद्योगदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये आंतरनगरीय सुदूर अंतरावरील वाहतूकसेवेत विमानांचा वाढता वाटा असल्याचे आढळते. कमी अंतरावरील आंतरनगरीय वाहतूकसेवा अधिककरून खाजगी मोटारगाड्या, बसगाड्या व रेल्वे यांच्यामार्फत केली जाते. चीन, भारत यांसारख्या विकसनशील राष्ट्रांत तसेच आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांत रेल्वे व बसगाड्या ह्याच काय त्या प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर व वाहून नेण्याची मोठी क्षमता असलेल्या अशा ठरल्या आहेत. बहुतेक विकसनशील राष्ट्रांत रेल्वे व बसगाड्या आंतरनगरीय वाहतुकीच्या दृष्टीने विचार करता अधिक लोकप्रिय व सोयीस्कर मानल्या जाऊ लागल्या आहेत. अनेक पश्चिमी यूरोपीय राष्ट्रे व जपान यांमध्ये वेगवान (जलदगती) अशा प्रवासी रेल्वेगाड्या वापरात आहेत. अतिवेगवान आगगाड्या ह्या प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात विमानांबरोबरही स्पर्धा करीत असल्याचे आढळून आले आहे.

(३) समुद्रपार वाहतूकसेवा: १९३० पासून पुढील काळात समुद्रपार हवाई वाहतूकसेवा सुरू झाली. तथापि विमानांमध्ये पुन्हा इंधन घालण्याकरिता या विमानांना वारंवार मध्येच थांबावे लागत असे. १९५५–६० पर्यंत लोकांना समुद्रपार प्रवास जहाजांतूनच पुरा करावा लागे. अर्थातच जहाजवाहतुकीमध्ये अधिक वेळ जात असे. उदा., अटलांटिक महासागर पार करावयास या जहाजांना चार दिवस वा त्यांहूनही अधिक काळ लागे. १९४० च्या पुढे कोठेही न थांबता काही तासांतच महासागर पार करून जाणाऱ्या विमानांचे युग प्रथमच सुरू झाले. या प्रकारच्या विमान वाहतुकीमुळे सागरपार प्रवासातही वाढ होत गेली. १९५० पासून पुढील काळात महासागर ओलांडणाऱ्या जेट विमानांची वाहतूक प्रथमच चालू झाली. परिणामी समुद्रपार हवाई प्रवासी वाहतूक करणाऱ्याच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. असे असले, तरी सागरगामी जहाजांतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. ग्रेट ब्रिटनच्या ‘क्वीन एलिझाबेथ २’ या सागरगामी जहाजातून विविध पर्यटक कॅरिबियन तसेच भूमध्य समुद्रकाठच्या ऊबदार प्रदेशांत सुटी घालविण्यासाठी जात असतात. १९७६ मध्ये ‘काँकर्ड’ ह्या पहिल्या स्वनातीत जेट विमानाने यूरोप व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांमध्ये हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. काँकर्ड विमान लंडन वा पॅरिस ते अमेरिका हे सु. ५,६३० किमी. अंतर अटलांटिक महासागर ओलांडून सु. चार तासांत पार करते. तथापि स्वनातीत जेट विमान प्रवास हा निश्चितच खर्चिक व महाग आहे.

मालवाहतूक: पेट्रोजन्य पदार्थ व नैसर्गिक वायू यांची वाहतूक करण्यासाठी तेलनळ हे सर्वांत सोयीस्कर व स्वस्त पडतात. सामान्य मालाच्या वाहतुकीकरिता जलमार्ग हा वाहतूक प्रकार सर्वांत स्वस्त पडतो मालाची वाहतूक रेल्वेने करावयाची झाल्यास जलवाहतुकीच्या तिप्पट, ट्रकवाहतुकीस दसपट, तर विमानवाहतुकीला ४० पट खर्च येतो.

देशांतर्गत मालवाहतूक: देशांतर्गत मालाची वाहतूक विमाने, नौका व पडाव, नळमार्ग, आगगाड्या, जहाजे व ट्रक यांमार्फत केली जाते. कोळशासारख्या अवजड मालाची ने आण करण्यास रेल्वे हे अतिशय कार्यक्षम वाहतूक साधन मानले जाते. बंदरे व कारखाने यांच्याकडे खाणींपासून खनिज द्रव्याची वाहतूक करावयास रेल्वे अतिशय उपयुक्त ठरते त्याप्रमाणे रेल्वेद्वारा कोळसा विद्युत्निर्मितिगृहांकडे तेल परिष्करण केंद्रांपासून खनिज तेल व तज्जन्य पदार्थ यांची वाहतूक वितरण केंद्रांकडे बहुतेक सर्व वस्तूंची ने आण रेल्वेमुळे सुकर होते. ‘फ्रेटलायनर कंटेनर ट्रेन’ या विशेष प्रकारच्या रेल्वेमधून यूरोपीय देशांतून बहुतेक सर्व प्रकारच्या मालाची ने-आण करण्यात येते.

एखाद्या विशिष्ट वस्तूची मालपेटी इष्ट त्या स्थळी पाठविली जाण्यासाठी एकाच प्रकारच्या वाहतुकीचा अवलंब न करता अन्य वाहतूक प्रकारांचाही वापर करण्यात येतो. उदा., कित्येक वस्तूंच्या पेट्या खरेदीदारापर्यंत पोहचविण्यासाठी आगगाडी नाव पडाव, किंवा ट्रक या वाहतूक साधनांचा अवलंब करण्यात येतो. एकापेक्षा अधिक वाहतूक साधनांचा अवलंब करण्याच्या या पद्धतीला ‘आंतरप्रकारी वाहतूक’ (इंटर-मोडल ट्रॅन्स्पोर्ट) असे म्हणतात.

‘आंतरप्रकारी वाहतुकी’ चा ‘कंटेनरायझेशन’ (प्रमाणित पेट्यांत−कंटेनर्स−बंदिस्त केलेला, भरलेला माल वाहून नेणे) हा वाहतूक प्रकार १९५० पासून पुढे अवलंबिला जाऊ लागला. विशिष्ट माल हा मोठ्या प्रमाणित पेट्यांमध्ये भरण्यात येतो. या पेट्यांना ‘कंटेनर्स’ अशी संज्ञा आहे. या बंदिस्त पेट्या वाहून नेण्यासाठी ट्रक-अनुवाहन (ट्रक-ट्रेलर) व रेल्वे वाघिण्या ह्यांचा वापर करण्यात येतो. या प्रकारच्या पेट्या वाहून नेण्यासाठी खास कोठड्यांची पेटी जहाजे (सेल्यूलर पेटी-जहाजे) बांधण्यात येऊ लागली. प्रमाणित पेटीवाहतुकीच्या योगे जहाजवाहतुकीच्या खर्चात कपात (घट), मालाची जलद पोच (पाठवणी), तूटफुटीमुळे होणाऱ्या नुकसानीत वा तोट्यात घट यांसारखे फायदे संभवतात. अशा प्रकारची वाहतूकसेवा देशांतर्गत मालवाहतुकी ऐवजी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अधिककरून अवलंबिली जाते.

आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीमध्ये मुख्यतः जहाजांचा अवलंब करण्यात येते. सध्याची मोठी व्यापारी जहाजे मोठ्या आकाराच्या प्रमाणित पेट्या विशिष्ट प्रकारचा माल (उदा., पेट्रोलियम व तज्जन्य पदार्थ, धान्य, लोहधातुक इ.) वाहून नेण्यासाठी वापरताना आढळतात. या प्रकारच्या मालाची बंदरांवरील धक्क्यांमधून जहाजांवर तसेच जहाजांवरून बंदरांवर चढवणी-उतरवणी करण्यासाठी विशेष प्रकारच्या बंदरसुविधा असणे जरुरीचे असते. मोठ्या बंदरांमध्ये प्रमाणित पेट्यांची हाताळणी करण्याकरिता विशेष प्रकारच्या सुविधा (उदा., प्रचंड आकाराच्या याऱ्या, प्रचंड गुदामे इ.) उपलब्ध केल्या जातात. काही मोठ्या बंदरांमध्ये पेट्रोलियम व तज्जन्य पदार्थ यांची हाताळणी (माल बंदरावर उतरविणे या बंदरांतून जहाजांवर चढविणे) करण्याकरिता विशेष सुविधा निर्माण केलेल्या असतात. अशा प्रकारचे तेल टैंकर सुयोग्य प्रकारे हाताळण्यासाठी खोल बंदरांची निर्मिती केली जाते. हे तेल टँकर बंदरांच्या अंतर्भागात धक्क्यापर्यंत नेण्याची सुविधा केलेली असते. या टँकरमधील तेल बंदरांमधील टाक्यांमध्ये खेचून घेण्यासाठी तसेच टँकरमध्ये चढविण्यासाठी मोठ्या पंपांची उभारणी करण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या मालाची पोच वा पाठवणी करण्यासाठी सागरमार्ग, रस्ते, लोहमार्ग, नळमार्ग, अंतर्गत जलमार्ग, हवाईमार्ग या माध्यमांचा वापर केला जातो.

वाहतूक उद्योग: वाहतूक उद्योग हा सबंध जगातील अग्रेसर उद्योगांपैकी एक समजण्यात येतो. जगातील अनेक प्रचंड औद्योगिक कंपन्यांना वाहतूक सामग्री (उपकरणे) त्याचप्रमाणे वाहतुकीस लागणारी सर्व प्रकारची इंधने विकून बहुतेक उत्पन्न मिळू शकते. वाहतूक उद्योगामध्ये सबंध जगात मिळून लक्षावधी माणसे गुंतलेली आढळतात.

वाहतूक उद्योगाचे (१) वाहतुकीच्या सामग्रीचे व उपकरणांचे उत्पादक, (२) प्रवासी व माल यांची वाहतूक करणारी वाहक साधने आणि (३) अन्य संबंधित उद्योग, असे तीन भाग पडतात. त्यांतल्या त्यांत पहिले दोन प्रकारचे उद्योग म्हणजे वाहतूक उद्योगाचे अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. अन्य संबंधित उद्योदांमध्ये इंधनपूरक तसेच विविध संबंधित सेवासुविधा पुरविणारे उद्योग, ह्यांचा अंतर्भाव होत असून त्यांचेही अनन्यसाधारण महत्त्व गणले जाते. वाहतूक क्षेत्रातील शासनाचा सहभाग, ही गोष्ट त्या त्या देशातील उपलब्ध असणाऱ्या राजकीय व आर्थिक यंत्रणांवर निर्भर असू शकते.

वाहतूक सामग्री, साधने आणि साहित्य यांचे उत्पादन करणारे कारखानदार विविध प्रकारच्या वाहनांची निर्मिती करतात किंबहुना त्यांवरच सांप्रतची वाहतूकयंत्रणा पूर्णतया अवलंबून असते. वाहने चालविण्यसाठी लागणाऱ्या माध्यमांची (उदा., लोहमार्ग, हवाईमार्ग, दूरसंचारण यंत्रणा इ.) निर्मितीदेखील हे कारखानदार करीत असतात. मोटारी, बसगाड्या, मालवाहू गाड्या (ट्रक) इत्यादींची निर्मिती करणारे कारखानदारच (उदा., जपानच्या टोयोटा व निस्सान या मोटार कंपन्या, जर्मनीची फोक्सव्हागन, इटलीची फियाट) तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील जनरल मोटर्स कॉर्पोरेशन व फोर्ड मोटार कंपनी यांसारख्या कंपन्या) वाहतूक सामग्रीचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर करीत असलेले आढळतात.

प्रवासी व माल यांची ने-आण करणाऱ्या वाहक साधनांमध्ये हवाई वाहतूक कंपन्या, नळमार्गां द्वारे द्रवपदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या, रेल्वे, जहाजकंपन्या, रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या कंपन्या इत्यादींचा समावेश होतो. अनेक देशांत रेल्वे वाहतूक, जहाजवाहतूक, बसवाहतूक यांचे स्वामित्व (मालकी), नियंत्रण व कार्यवाही केंद्र शासनाकडेच असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये सर्व हवाई वाहतूक कंपन्या तसेच बहुतेक रेल्वे कंपन्या यांची मालकी, नियंत्रण व कार्यवाही खाजगी कंपन्यांकडे असते. पूर्व यूरोपातील काही देशांत आंतरनागरी बसवाहतूक, नळमार्ग, जहाज व ट्रक यांची वाहतूक शासनाच्या मालकीची असून त्यांची कार्यवाही शासनाकरवीच होत असते. बहुतेक औद्योगिक राष्ट्रांत अशा प्रकारच्या सेवासुविधा जरी खाजगी कंपन्या उपलब्ध करीत असल्या, तरी शासनाचे त्यांवर विविध प्रकारांनी नियमन असते. अन्य संबंधित उद्योगांमध्ये काच, पेट्रोलियम व तज्जन्य पदार्थ, पोलाद, टायर यांचे निर्मितिउद्योग, रस्ते-बांधणी, वाहनांची देखभाल व निगा यांसारख्या अंतर्भाव होतो.

शासन व वाहतूक: ज्या राष्ट्रांत वाहतूक ही सार्वजनिक क्षेत्रात समाविष्ट असते, त्या राष्ट्रांत शासनाचे वाहतूकक्षेत्रावर मोठे नियंत्रण असू शकते. जवळजवळ सर्व वाहतूक खासगी क्षेत्रात असणाऱ्या देशांतही शासनाचा महत्त्वाचा नियंत्रणात्मक सहभाग प्रत्ययास येतो. या सहभागाचे स्वरूप (१) काही वाहतूकसुविधांच्या पूर्ततेसाठी द्रव्य उपलब्ध करून देणे व (२) वाहतूकक्षेत्रावरच नियंत्रण जारी करणे, या दोन प्रकारांत आढळते. (१) हवाईवाहतूक नियंत्रण केंद्र, (२) विमानतळ, (३) सार्वजनिक रस्ते आणि (४) नदी व बंदर सुविधा, या चार प्रकारच्या वाहतूकसुविधांच्या कार्यवाहीसाठी सार्वजनिक (सरकारी) निधीची विशेष गरज भासते. बहुतेक राष्ट्रांत नागरी भागातील वाहतूकयंत्रणा कार्यान्वित करणे व ती चालू ठेवणे यांकरिता शासकीय अर्थसाहाय्याची व आधाराची नितांत आवश्यकता लागते कारण उपभोक्त्या ग्राहकांकडून त्या यंत्रणेची देखभाल, निगा वगैरे राखण्यासाठी ग्राहकांच्या तिकिटांच्या उत्पन्नातून जमा होणारा पैसा पुरेसा पडत नाही. वाहतूकयंत्रणा सतत कार्यशील ठेवण्यासाठी शासनाला पुरेसे द्रव्यसाहाय्य उपलब्ध करावे लागते. शासनाचे वाहतूक कंपन्यांवर जे नियंत्रण असते, ते वाहतूक सुरक्षितता तसेच वाहतूक कंपन्यांकडून वाहतूकविषयक निर्बंध, नियम व कायदे यांची पायमल्ली होत नाही ना, ते पाहणे व तपासणे यांसंबंधी असते [⟶ वाहतूक नियंत्रण वाहतूक नियमन].

वाहतूक समस्या: यांमध्ये (अ) वाहतूकसुरक्षा व सुरक्षितता (आ) इंधन साठे व स्त्रोत ह्यांचा होत जाणारा तुटवडा (ऱ्हास) (इ) पर्यावरणविषयक समस्या आणि (ई) अपर्याप्त (अपुरी) सार्वजनिक वाहन व्यवस्था, ह्यांचा अंतर्भाव होतो. खाजगी मोटारगाड्यांच्या वाहतुकीवर प्रकर्षाने भर दिला जाणाऱ्या राष्ट्रांमध्ये शासनाला वरील समस्यांना अधिककरून तोंड द्यावे लागते.

वाहतूक सुरक्षा: भरधाव वेगाने (अतिजलद) धावणाऱ्या मोटारींच्या बाबतीत वाहतूक सुरक्षिततेच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात प्रतिवर्षी मोटार अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांची संख्या, इतर वाहतूक अपघातांतील मृत्यूंपेक्षा नेहमीच अधिक असल्याचे आढळले आहे. हे अपघात प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन तसेच कडक शासकीय वाहतूक नियंत्रण या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्या मानाने हवाई वाहतुकीमध्ये अपघात प्रमाण कमी आढळत असून सुरक्षिततेचे प्रमाण चांगले राखण्यात हवाई वाहतूक चालक नेहमीच यशस्वी ठरले आहेत. तथापि याही क्षेत्रात मोठ्या विमानतळांवर प्रचंड प्रमाणात वाढत असणारी प्रवाशांची गर्दी व वर्दळ, यांमुळे येथेही अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. कित्येक वैमानिकांना विमानतळ आपले विमान उतरविण्याची अथवा विमानतळावरून विमानाचे उड्डाण करण्याची पूर्वसूचना मिळविण्यासाठी विमानतळावरी ल नियंत्रणकक्षाकडून संदेशांची प्रतीक्षा करावी लागते कारण त्याच सुमारास विमानतळाचा आसमंत तसेच धावपट्ट्या या अनुक्रमे प्रवासी व इतर विमाने यांमुळे व्यापून गेलेल्या आढळतात. याशिवाय कित्येक मोठ्या विमानतळांवर खाजगी विमानांची वाहतूक व वर्दळ इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू राहते की, तिचा परिणाम एकूणच विमानवाहतूकीवर होत राहतो. यामुळे वाहतूक नियमन नियंत्रण कठीण होते.

रेल्वे वाहतूक ही साधारणतः सुरक्षित मानली जाते. आगगाड्यांची टक्कर, गाडी रुळांवरून घसरणे इ. दुर्घटना दूरसंदेशयंत्रणेतील अचानक (आकस्मिक) बिघाडामुळे किंवा दोषांमुळे घडून येतात कधी कधी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे किंवा लोहमार्गावरून पुराचे पाणी गेल्यामुळे लोहमार्गाचा बराचसा भाग विस्कळीत होतो किंवा वाहून जातो, तेव्हा ही दुर्घटना घडू शकते.

घटते इंधन साठे: पेट्रोलियम आणि तज्जन्य इतर इंधने ही एंजिनचालीत वाहतुकीसाठी ऊर्जा पुरवितात तथापि हा इंधन साठा अतिशय जलद रीतीने वापरण्यात येत असल्यामुळे, तो २०५० च्या सुमारास संपुष्टात येईल की काय, अशी भीती ऊर्जा तज्ञांना वाटू लागली आहे. इंधन संवर्धनाची गरज वा आवश्यकता दोन कारणांसाठी भासते: पहिले म्हणजे, इंधन-चणचणीची (इंधन-टंचाईची) वाटणारी गंभीर संभाव्यता (इंधन-टंचाईचा गंभीर धोका) आणि दुसरे कारण म्हणजे, पेट्रोलियमचे वाढत जाणारे दर वा भाव. वाढत्या पेट्रोलियम दरांमुळे वाहतुकीच्या परिव्ययांतही भरमसाट वाढ होऊ शकते परिणामी मालवाहतूक दरांमध्येही प्रचंड वाढ होण्याचा धोका संभवतो याची झळ उपभोक्त्यांना फार मोठ्या प्रमाणात सोसावी लागते. मोटारगाड्यांना सर्वसाधारणतः एकूण ऊर्जेच्या ५० टक्के ऊर्जा वाहतुकीच्या वेळी लागते आणि हे प्रमाण उद्योगधंद्यांच्या दृष्टीने प्रगत देशांत प्रकर्षाने जाणवते. मोटार वाहतुकीमुळे सबंध देशाच्या ऊर्जा-पुरवठ्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता अशा राष्ट्रांतील सरकारे मोटारनिर्मिती करणाऱ्या कारखानदारांना मोटरींबाबत इंधनसेवन परिमाणे निर्धारित करून देतात, या परिमाणांमुळे मोटार उत्पादकांना छोट्या आकाराच्या परंतु कमी पेट्रोलमध्ये अधिक लांबवर प्रवास करणाऱ्या मोटारींचे उत्पादन करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे.

अपर्याप्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था: अनेक देशांतून खाजगी मोटारगाड्यांची वाहतूक अधिकाधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. या खाजगी मोटारवाहतुकीवरील अवलंब कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अधिकाधिक वाढ करावी, असे सुचविले जाते. परंतु हा कल वळविण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे. या सुधारणांचे स्वरूप पुढीलप्रमाणे : (१) नागरी सेवासुविधांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि त्यांमध्ये गुणवत्ता आणणे. (२) आंतरनगरीय रेल्वेसेवांमध्ये वाढ व त्यांमध्येही उच्च प्रकारची गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न करणे.

(१) मागरी सेवासुविधांचा प्रसार व सुधारणा: अनेक मोठ्या शहरांना आपल्या क्षेत्रात नवीन प्रकारच्या नागरी वाहतूक सुविधा निर्माण करणे द्रव्याभावी शक्य होत नसले, तरी अस्तित्वात (चालू) असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा निकराचा प्रयत्न, ही शहरे करताना आढळतात. काही शहरांमध्ये बसवाहतूक जलद व गतिमान करण्यासाठी काही विशिष्ट मार्ग केवळ त्यांच्याकरिता राखून ठेवण्यात येतात. गर्दीच्या ठिकाणी मोटारी थांबविण्याबाबतही अतिशय कडक निर्बंध व नियम जारी करण्यात आल्याचे दिसते. सिंगापूरसारख्या काही मोठ्या व अतिशय गर्दीच्या शहरांमध्ये आठवड्यातील ठराविक दिवसच मोटार चालकांना मोठे रस्ते वाहतुकीसाठी वापरावयास मुभा दिली जाते. काही वाहतूकतज्ञांच्या मते विजेवर धावणाऱ्या प्रवासी आगगाड्या ह्या नागरी वाहतुकीमध्ये सुधारणा घडविणाच्या कामी मोटारींपेक्षा अधिक साह्यकारी होऊ शकतील कारण त्यांच्याकडून मोटारींप्रमाणे निष्कास वायू वा धूर बाहेर जात नाही त्याचप्रमाणे त्यांची वाहतूकही अधिक गतिमान आणि ध्वनिविरहीत अशी होत असते. भुयारी रेल्वेपेक्षा या प्रकारच्या आगगाड्यांचे डबे बनविण्यास तुलनेने कमी खर्च येतो. नागरी वाहतुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे चालकरहित परंतु स्वयंचलित अशा विद्युत्प्रेरित गाड्या (पीपल मूव्हर) या प्रकारच्या गाड्यांत प्रवासी बसले, म्हणजे ठराविक मार्गांनी या गाड्या धावतात आणि ठराविक ठिकाणी प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी त्या थांबतात. (२) आंतरनगरीय रेल्वेसेवांमध्ये सुधारणा : अनेक उद्योगप्रधान राष्ट्रांत अतिशय मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या आंतरनगरीय रेल्वे प्रवासीसेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न त्या त्या राष्ट्रांतील शासनांमार्फत केले जात आहेत. मोटारी, बसगाड्या, विमाने यांच्यापेक्षा आगगाड्यांबाबत प्रतिप्रवासी ऊर्जासेवन प्रमाण निश्चितच कमी आहे.

फ्रान्स, जर्मनी यांसारख्या पश्चि यूरोपीय राष्ट्रांत अतिवेगवान प्रवासी रेल्वेगाड्या विशेष प्रकारच्या रूळमार्गांवरून वाहतूक करतात. या प्रकारच्या रूळमार्गांना वळणे नसल्यामुळे या रेल्वेगाड्यांना प्रतितास २०० किमी. एवढ्या वेगाने मार्गक्रमण करणे शक्य होते. इंग्लिश खाडीखालून फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांना जोडणारा ‘चॅनेल टनेल’ हा बोगदा-रेल्वेमार्ग (‘युरोटनेल’ या नावाचा) एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प १९८६ साली सुरू करण्यात आला. १९९४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला असून त्याचे मे महिन्यात उद्घाटनही करण्यात आले. या प्रकल्पावर गेल्या आठ वर्षांत सु. १३.५ कोटी डॉलर खर्च करण्यात आले आहेत. डोव्हरची खाडी पार करण्याकरिता बोटींना काही तासांचा अवधी लागतो. ह्या युरोटनेलमुळे रेल्वेने केवळ ३५ मिनिटांत ५० किमी. चे हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरापासून अतिजलद धावणाऱ्या रेल्वे, प्रतितास १६० किमी. या वेगाने मुख्य लोहमार्गांवरून वाहतूक करतात.

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, इटली यांसारख्या यूरोपीय राष्ट्रांमध्ये तसेच जपानमध्ये अतिजलद वेगाने धावणाऱ्या हलक्या रेल्वेगाड्या जलद आंतरनगरीय प्रवाससेवा उपलब्ध करतात. जपानमध्ये अशा रेल्वेगाड्यांना ‘बुलेट ट्रेन’ अशी संज्ञा असून त्यांचा दर तासाला २१० किमी. एवढा प्रचंड वेग असतो. या गाड्या होन्शू बेटावरील प्रमुख शहरे एकमेकांना जोडतात. फ्रान्समधील ‘टीजीव्ही ट्रेन’ (अतिवेगवान रेल्वे) पॅरिस व लीआँ ही शहरे तसेच प. फ्रान्समधील अन्य शहरेही एकमेकांशी जोडते. ही रेल्वे तासाला ३०० किमी. एवढ्या प्रचंड वेगाने धावत असते.

अतिवेगवान प्रवासी रेल्वेगाडी चालू करण्याच्या प्रयत्नांत यूरोपीय अभियंते सांप्रत गुंतलेले असून अशा प्रकारच्या प्रवासी रेल्वेगाडीला ‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन’ (किंवा ‘मॅगलेव्ह ट्रेन’) असे संबोधिले जाते. या प्रकारच्या आधुनिक तंत्रविद्येच्या संशोधनाला १९७० च्या पुढे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान इ. राष्ट्रांत सुरुवात करण्यात आली. मात्र जर्मनी व जपान या दोन राष्ट्रांतच वरील प्रकारच्या तंत्रविद्येचा अवलंब करून प्रायोगिक तत्त्वावर ‘मॅगलेव्ह ट्रेन’ या आगगाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्यांमुळे आंतर महानगरीय वाहतूक प्रतितास ३०० किमी. किंवा त्याहीपेक्षा अधिक किमी. वेगाने चालू करणे शक्य होणार आहे. या दोन्ही देशांमागोमाग अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, कॅनडा यांसारख्या राष्ट्रांत गतिमान आगगाड्या वापरात आणण्याकरिता चुंबकीय प्रतिसारण व चुंबकीय आकर्षण या दोन्ही तांत्रिक प्रणालींपैकी एकीचा अवलंब केला जाणार आहे. ‘मॅगलेव्ह ट्रेन’ या आगगाड्या प्रतितास ४८० किमी. एवढ्या वेगाने धावतील, अशी अपेक्षा आहे तथापि सांप्रत तरी यापेक्षा कमी वेगाने धावतील, अशी अपेक्षा आहे तथापि सांप्रत तरी यापेक्षा कमी वेगाने धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेन वापरात आणल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...