Friday 29 November 2019

विष्णुबुवा ब्रह्मचारी (विष्णू भिकाजी गोखले)

जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक 

विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुबाबा भावंडांमध्ये दहावे. ते पाच वर्षांचे असतांना वडील गेले. तरीदेखील एक वर्ष वेदाध्ययन करता आले. त्याच काळात लेखन, वाचन, हिशेब करणे असे जीवनावश्यक शिक्षणही मिळाले. त्यात अक्षर अतिशय सुंदर! ह्या एवढया शिदोरीवर अवघ्या नवव्या वर्षी त्यांना त्या काळांत जमीन-महसूल खात्यात नोकरी मिळाली. पण आईने नोकरी सोडावयास लावून त्यांना पुन्हा घरच्या शेतीत आणि गाईगुरांना रानात चारण्यासाठी नेण्याचे काम करण्यास सांगितले. मात्र विष्णुबुवा फार काळ ह्या कामात रमले नाही. कोणाला न सांगता घर सोडून ते महाडला एका किराणा दुकानात नोकरी करु लागले. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा देऊन साष्टी तालुक्यात कस्टम खात्यात रुजू झाले. सात वर्षांच्या नोकरीच्या काळात ते अनेक ठिकाणी फिरले.

हे करीत असतानाही त्यांची धार्मिक वृत्ती सतत सजग होती. एवढया लहान वयातही कीर्तन-प्रवचनें, पूजा-अर्चा नेमाने करीत असत. कधी ना कधी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु मिळेल अशी त्यांना आशा वाटत असे. आत्मज्ञानाची त्यांची भूक काही शमेना. दुसरीकडे धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन चालूच होते. ह्या विषयातील त्यांची प्रगती एकलव्याप्रमाणे होत होती. अखेर व्यावहारिक जीवनाचा कंटाळा येऊन त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरी सोडली. घर त्यागले. पुन्हा गुरुप्राप्तिसाठी पुष्कळ हिंडूनही निराशाच पदरी आली. शेवटी सप्तशृंगीच्या डोंगरावर स्वतःच्या मनानेच घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.

ह्या आत्मसाक्षात्काराचा लाभ सर्व समाजालाही व्हावा, संपूर्ण हिंदु समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ख्रिश्चनांच्या धार्मिक अतिक्रमणाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ह्या धर्मांतरविरोधात लढा देण्यास सुरुवात केली. लेख लिहून आणि भाषणे करून ते ख्रिस्तीधर्मातील दोष लोकांना दाखवून देऊ लागले. त्यांच्या ह्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. उदंड म्हणजे किती? तर त्यांना व्याख्यानाला जागा कमी पडू लागली. 'कुठलीही शंका घेऊन या, मी त्या शंकांचे निरसन करण्यास समर्थ आहे' ह्या त्यांच्या आश्वासकतेमुळे लोकांना धीर आला.

समाजाची उन्नती होण्यासाठी स्त्री मुक्तीची आवश्यकता आहे. त्याचवेळी स्त्रीशिक्षणाची जोडही दिली जाणे गरजेचे आहे. हा विचार समाज मनावर त्यांनी प्रथम बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरीनेच स्त्रीचा विवाह तिच्या अनुमतीने व्हावा, तो योग्य वयात व्हावा. पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर फार नसावे, तीस वर्षांवरील गृहस्थाने विधवेशीच लग्न करावे. सतीप्रथा पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे, विधवा विवाह होणे आवश्यक आहे. जाती किंवा वर्ण जन्मावरुन न ठरविता कर्मावरुन ठरविणे योग्य ठरेल, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावयास हवे. असे अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी सतत सोळा वर्षें आपल्या व्याख्यानांमधून समाजासमोर मांडले.

१८७१ मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...