Saturday 11 December 2021

शहीद भगतसिंग आणि गांधीजी

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."

भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...