Saturday 28 March 2020

करोनाला झुंजवणाऱ्या चार प्रतिकारक पेशींचा शोध :

करोना विषाणूला मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणाली कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी केला असून त्यांच्या मते लहान मुलातील प्रतिसाद यात सर्वात प्रखर असतो व वृद्धांमधील प्रतिसाद सर्वात क्षीण असतो. करोना विषाणूचा मानवी शरीर नैसर्गिक पातळीवर प्रतिकार करताना प्रतिपंड तयार होत असतात त्यांचा अभ्यास केल्याने आता या विषाणूवर औषध शोधणे सोपे जाणार आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास ऑस्ट्रेलियातील  संशोधकांनी केला असून त्यात रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे की, प्रथमच करोनाला मानवी प्रतिकारशक्तीकडून दिला जाणारा प्रतिसाद नोंदला गेला आहे.

मेलबर्न विद्यापीठातील पीटर डोहर्थी इन्स्टिटय़ूट फॉर इनफेक्शन अ‍ॅण्ड इम्युनिटी या संस्थेतील संशोधक कॅथरिन केडझिरन्स्का यांनी म्हटले आहे की, मानवी प्रतिकारशक्ती करोना विषाणूला जोरदार प्रतिसाद देत असते असे दिसून आले आहे. जे लोक दगावतात त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते.

एक महिला तीन दिवस बरीच आजारी दिसत होती पण नंतर ती व्यवस्थित बरी झाली. मध्यम तीव्रतेच्या आजारात तरी प्रतिकारशक्ती चांगली काम करताना दिसली आहे. जे लोक बरे झाले त्यांच्यात नेमके कुठले घटक प्रभावी ठरले व जे मरण पावले त्यांच्यात कुठले घटक कमी पडले याचा शोध घेण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून विषाणूतज्ञांना लस तयार करणे सोपे जाणार आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...