Friday 5 January 2024

गोंद्या आला रे .....



कालच्या दिवशी १८९७ साली पुण्यात एक प्रतिशोधाचे धगधगते अग्निकुंड पेटले. त्यात जुलमी ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध तर झालाच, पण पुणेकर जनतेवर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून रँडवर ही कारवाई करणारे तीन युवा क्रांतिकारक चाफेकर बंधू यांनीही फाशीच्या तक्तावर चढून आत्माहुती दिली.

त्यांच्या या बलिदानाने साऱ्या देशात खळबळ उडाली. चाफेकर बंधू अमर झाले.

वासुदेव, दामोदर व बाळकृष्ण हे तिघे चाफेकर बंधू मुळचे कोकणातले. त्यांचे कुटुंब पुण्याजवळ चिंचवडला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले.

ते लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले व त्यांच्या कार्याला दिशा व गती लाभली. १८९7मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यात अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले.

रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची व रँडचा वध करण्याची योजना त्यांनी तयार केली.

त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव भारतातही साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

याच संधीचा फ़ायदा घेत दामोदर चाफेकर यांनी गणेश खिंडीत पाळत ठेवली व २२ जून १८९७ च्या मध्यरात्री रँडच्या घोडागाडीवर चढून जवळून गोळ्या झाडल्या. रँड काही काळ कोमात राहिला व ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.

याचवेळेस दामोदराचा  भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू हुतात्मा झाले.

तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी स्वातंत्र्य लढ्यास बलिदान करण्याची जगातील ही बहुधा पहिली व एकमेव घटना!

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...