07 January 2021

ब्रिटनमध्ये करोनाचे गंभीर संकट, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला भारत दौरा



ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. करोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारले होते.


“बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली. महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली” असे डाऊनिंग स्ट्रीटवरील प्रवक्त्याने सांगितले.


“करोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. व्हायरसमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी यूकेमध्येच थांबणे आवश्यक आहे” असे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.


काही दिवसांपूर्वी बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना पुढच्यावर्षी युकेमध्ये होणाऱ्या G-7 परिषदेचे आमंत्रण दिले होते. यापूर्वी १९९३ साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान होते. पुढच्या दशकात भारत-ब्रिटन संबंध कसे असावेत? याविषयी मित्र आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर उत्तम चर्चा झाली असे मोदींनी २७ नोव्हेंबरच्या टि्वटमध्ये म्हटले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्त्वाचे ऑपरेशन 2025

1. 'ऑपरेशन नादेर' :- भारतीय लष्कर जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी - 2. ऑपरेशन टू प्रॉमिस ३:- इराण इस्राईल देश...