Sunday 31 January 2021

बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ आता जैविक वारसा क्षेत्र


🔰सिंधुदुर्ग जिल्ह्यतील बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ या प्रजातीकरिता जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.


🔰बांबर्डे येथील ग्रामपंचायत हेवाळे हद्दीतील २.५९ हेक्टर क्षेत्र ‘मायरिस्टीका स्वम्प्स’जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ‘मायरिस्टीका’ या दुर्मिळ प्रजाती वृक्ष असून स्थानिक लोक या वृक्ष प्रजातीला देवराई संबोधतात व अनेक पिढय़ांपासून या प्रजातीचे करत आहेत. निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटनेने (आययूसीएन-इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर) ‘मायरिस्टीका’ प्रजाती ही दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जैविक वारसा क्षेत्रास महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रामध्ये या वृक्षासह विविध वृक्ष व वन्यप्राणी यांचा वावर असून ‘मायरिस्टीका’ या वृक्ष प्रजातीचे संरक्षण व जतन होणे गरजेचे आहे. भविष्यात या प्रजातीवर संशोधन होवू शकेल. त्यासाठी हे क्षेत्र जैविक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे. जैवविविधतेच्या संसाधनांचे संवर्धन व शाश्वत असा विकास घडवून आणणे व त्यातून मिळणाऱ्या अनुषंगिक फायद्यांचे न्याय्य व समान वाटप करणे हा जैवविविधता कायदा आणि नियमांचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.


🔰राज्यातील चौथे जैविक वारसा क्षेत्र

शासनाने आतापर्यंत ग्लोरी अल्लापली, लांडोरखोरी जळगाव व गणेशखिंड पुणे हे क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले होते. जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित होणारे बांबर्डे येथील ‘मायरिस्टीका स्वम्प्स’ हे राज्यातील चौथे स्थळ ठरले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...