Saturday 1 October 2022

विविध चालू घडामोडी

हॅट्स ऑफ नादिया..! तालिबान्यांमुळं देश सोडला, ११ भाषा शिकल्या, २०० गोल केले आणि आता बनली डॉक्टर :
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आहे. तालिबानने महिलांवर विविध निर्बंध लादले आहेत. १९९६-२००२ दरम्यान तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यानही त्यांनी महिलांचे शोषण केले. या राजवटीत एक मुलगी अफगाणिस्तान सोडून गेली होती आणि डेन्मार्कला पोहोचली.
डेन्मार्कसाठी ती राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली. मेहनतीने ती त्या संघाची प्रमुख खेळाडू बनली. आता ती डॉक्टर झाली आहे. नादिया नदीम असे या महिलेचे नाव असून तिची संघर्षगाथा थक्क करणारी आहे..
नादियाचा जन्म अफगाणिस्तानातील हेरात येथे झाला. तिचे वडील अफगाण नॅशनल आर्मीमध्ये जनरल होते, तालिबानने नादियाच्या वडिलांना मारले. वयाच्या ११ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर नादियाने देश सोडला.
खोट्या ओळखीखाली प्रवास करून अनेक निर्वासितांच्या छावण्या गाठल्या. ती पाकिस्तानातील कराचीला दोन महिने राहिली. यानंतर ती इटलीला पोहोचली, जिथे ती अनेक दिवस भटकत होती.
१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरणाबाबत समोर आली नवीन माहिती :
भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
या अगोदर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय माध्यमांमधून याबाबत बातम्या देखील झळकल्या होत्या. त्यानंतर आज वृत्ताचे खंडण करण्यात आले असून, अद्याप या बद्दल कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अंमलबाजवणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता :
भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही.
मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.
तीन राज्यांचे चित्ररथ वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार नाही :
यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या दिल्लीतील संचलनात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच चित्ररथ समाविष्ट न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
संचलनासाठी यंदा १२ राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. चित्ररथ वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.  हा संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.
आसाम - लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी :
ओमायक्रॉनसह करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणाने लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णालयांसाठी हे आदेश लागू नसल्याचे आसाम सरकारने सांगितले.
करोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर दिला होता. तरीही आसाम सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आसाममध्ये आता सार्वजनिक ठिकाणी जाताना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...