Monday 23 September 2019

मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे पुनर्मुद्रणामध्ये योगदान

आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अल्पवयीन विवाहाला विरोध, हुंडा प्रथेला बंदी आणि अस्पृश्यता निवारण अशा विविध क्षेत्रांत देशाच्या पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज प्रबोधन आणि समाज सुधारणेमध्ये मूलगामी स्वरूपाचे योगदान देणाऱ्या ‘प्रार्थना समाज’ या संस्थेचा इतिहास नव्या स्वरूपात अभ्यासकांसाठी खुला होणार आहे. प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून प्रार्थना समाजाच्या इतिहासाचे पुनर्मुद्रण करण्यामध्ये मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने योगदान दिले आहे. सामाजिक सुधारणेचा दस्तऐवज लवकरच खुला होणार आहे.

इतिहासाचे अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. राजा दीक्षित यांनी ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या ९० वर्षांपूर्वीच्या ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ हा सुमारे सातशे पृष्ठांचा मूळ ग्रंथ समाजाच्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून १९२७ मध्ये प्रकाशित झाला होता. आता प्रार्थना समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मुंबई येथील एशियाटिक सोसायटीने या इतिहासाचे पुनर्मुद्रण करण्याचा संकल्प केला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद काळे आणि ग्रंथ प्रकाशन समितीच्या अध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन यांनी या नव्या स्वरूपातील ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून केवळ प्रस्तावना लिहिण्यापेक्षाही संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली असल्याचे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. डॉ. दीक्षित यांनी यापूर्वी तेलंगणा येथील मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘समग्र सेतू माधवराव पगडी’ या दहा खंडांच्या बृहत प्रकल्पातील पगडी यांच्या इतिहासविषयक लेखनाच्या दोन खंडांचे संपादन केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...