Sunday 3 April 2022

निजाम राजवटीची स्थापना

1. निजाम राजवटीची स्थापना

1. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.

2. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.

3. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.

4. मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२० मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.

5. निजाम व मोगल सरदार मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.

6. पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात.

7. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले. इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान अलीचे स्वप्न होते.

8. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला दिले.

9. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.

 

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...