Thursday 7 April 2022

मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा

🔹मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा

अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच अतिशय दाट अशी वनसंपदा लाभली आहे. या जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेमुळे ही बेटे जगासाठी जैवविविधतेची प्रयोगशाळाच आहेत.
कित्येक लाख वर्षांपासून नियमित येणाऱ्या मान्सूनचक्राने बंगालच्या उपसागरातील बेटांना समृद्ध आणि असामान्य वनसंपदा लाभली आहे. अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच दाट जंगले लाभली आहेत. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात, त्यामुळे वर्षांतून सरासरी आठ महिने या बेटांना पाऊस मिळतो. या बेटांवर उष्णकटिबंधीय आद्र्र सदाहरित वने, निमसदाहरित वने, दमट पानगळीची वने आणि समुद्रकिनाऱ्यातील दलदलीची वनेही आहेत. या सर्व वनांवर जगणारी जैवविविधताही तेवढीच समृद्ध आहे आणि म्हणूनच भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार बेटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संपूर्ण पृथ्वीच्या भूभागाचा विचार केल्यास जैवविविधतेचे प्रमाण उष्णकटिबंधीय भूक्षेत्रात (ट्रॉपिकल झोन) तुलनेने अधिक आहे. शीतकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये तुलनेने कमी आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उष्णकटिबंधीय भूप्रदेशात असणाऱ्या वर्षांवनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. आज पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त सात टक्के एवढेच क्षेत्र अशा वर्षांवनांनी व्यापलेले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता याच सात टक्के भूभागावर आहे आणि म्हणूनच ही वर्षांवने जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण आहेत.

भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर उष्णकटिबंधीय क्षेत्रात असे १७ देश आहेत जे जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न आहेत. त्यातील भारतासह बारा देश हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज भारतामध्ये प्राण्यांच्या जवळजवळ ९८ हजार आणि वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत. ही जगभरातील संख्येच्या जवळजवळ सात टक्के एवढी आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणारे भारताचे चार प्रमुख प्रदेश आहेत; ईशान्य भारत, पश्चिम हिमालयन प्रदेश, पश्चिम घाट आणि अंदमान – निकोबार बेटं. या चारही क्षेत्रांमध्ये अंदमान – निकोबारचा सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ८६ टक्के भूभाग वनांनी व्यापला आहे. यावरूनच आपल्याला या बेटांचे महत्त्व लक्षात येते. अंदमान बेटांवर निकोबारपेक्षा वन क्षेत्र मोठे आणि विस्तृत आहेत.
अंदमान मुख्यत: डोंगराळ प्रदेश आहे. इथे समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरापर्यंतच्या जंगलांची प्रमुख्याने चार प्रकारांत विभागणी केली गेली आहे. किनाऱ्याला लागून आहे ते खारफुटीचे जंगल, त्यानंतर गवताळ प्रदेश, मग वर्षांवने आणि सगळ्यात शेवटी दमट पानगळीचा प्रदेश अशी ही विभागणी आहे, त्यात गवताळ प्रदेशाचे क्षेत्र फार कमी आहे. इथल्या जंगलांत २२०० हून जास्त प्रकाराच्या वनस्पतींची नोंद झाली आहे आणि त्यातील जवळजवळ १३०० वनस्पती देशाच्या इतर भागात नसण्याचीच शक्यता आहे. यातील काही विशिष्ठ वनस्पती काही विशिष्ट बेटांवरच आढळतात. अनेक बेटांवर तिथल्या स्थानिक विशिष्ट वनस्पती आहेत, ज्या इतरत्र मिळत नाहीत.

खर म्हटलं तर उष्णकटिबंधीय वर्षांवने म्हणजे आपल्या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारी निम्म्याहून अधिक जीवसृष्टी या वर्षांवनांत जगते. या वर्षांवनांचा आणि इथल्या जैवविविधतेचा अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. काही संशोधनांप्रमाणे अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेपकी फक्त २० टक्के एवढेच प्राणी, वनस्पती, आणि सूक्ष्मजीवांची माहिती आहे. अजूनही संशोधनातून नवीन नवीन प्रजाती जगासमोर येत आहेत.

निसर्गाने या बेटांना सर्व काही मुक्तहस्ताने दिलं आहे. मान्सूनच्या मार्गावर असणाऱ्या या बेटांवर निसर्गाची संपन्नता आणि वैविध्य दिसून येते. या बेटांवर ९६ वन्यजीव अभयारण्ये आहेत, तसेच नऊ राष्ट्रीय उद्याने, एक जैविक उद्यान आणि एक जैव संरक्षित क्षेत्र आहे. या बेटांवर जगातील सगळ्यात मोठे कासव (लेदर बॅक टर्टल) अंडी घालतात, तसेच खारफुटीच्या जंगलात खाऱ्या पाण्याच्या मगरी आपल्या पिल्लाचं संगोपन करतात.
इथल्या जैवविविधतेचा अजून एक मजबूत कणा म्हणजे इथली खारफुटीची जंगले. मुळात खारफुटीची जंगले ही एक नाजूक परिसंस्था आहे जिच्यावर अनेक लहान-मोठय़ा तसंच ेसूक्ष्मजीवांचा अधिवास असतो. समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या खाऱ्या पाण्यामध्ये या वनस्पती जगतात. अंदमान हे खारफुटी जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील जंगलांत राईजोफोरा म्युक्रोनाटा, ब्रुगिएरा कोंजुगेटा, एव्हीसीनिया ओफिशिनेलिस, सेरिअप्स टगल प्रामुख्याने आढळतात. खारफुटी जंगले, किनाऱ्याची उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, पूर, तसेच वेगवान वाऱ्यांपासूनही सागरी तटांचे रक्षण करतात. ही जंगले अनेक लहान-मोठय़ा प्राण्यांची घरेही आहेत.

भारतात आढळणाऱ्या खरफुटींचे जवळजवळ २० टक्के क्षेत्र अंदमान आणि निकोबार बेटांवर असून हे भारताचं सुंदरबननंतरचं दुसरं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. इथे खारफुटीची जंगले २८३ वर्ग किलोमीटर क्षेत्रांत व्यापली आहेत. या क्षेत्रांत ४६ टक्के एवढे क्षेत्र अत्यंत दाट खारफुटीचे आहे. ४२ टक्के मध्यम आणि १२ टक्के क्षेत्र विरळ खारफुटीचे आहे.
खरफुटींच्या संरक्षण-संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य अंदमानच्या धानीनल्लाह या ठिकाणी अंदाजे दीड किमी लांबीचा नॅचरल मॅनग्रोव वॉक वे बनविण्यात आला आहे. इथे आपण प्रत्यक्ष दाट खारफुटीच्या जंगलातून किनाऱ्यापर्यंत जातो. धानीनल्लाह इथे कासवांची अंडी घालण्याची ठिकाणेही आहेत, इथे त्यांच्या त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे.

अंदमान आणि निकोबारची जंगलं फक्त प्रेक्षणीय नाहीत, तर श्रवणीयही आहेत, मग ती वर्षांवने असोत की खारफुटीची. तुम्ही कुठेही थांबून शांतपणे ऐकलं तर इथल्या जीवसृष्टीचं संगीत आणि लयबद्ध जीवन अनुभवू शकता. या सुंदर जीवसृष्टीच्या मागचा कणा आहे इथला मान्सून, जो भरभरून मुक्तहस्ताने अमृताचा वर्षांव करत आला आहे आणि पुढेही करत राहील. गरज आहे त्याला समजून घेण्याची आणि त्याला अनुसरून वागण्याची.

अंदमानातील जैवविविधता:
अंदमान आणि निकोबार ही जैवविविधतेची एक जिवंत प्रयोगशाळाच आहे. या बेटांवर एक मोठी जीवसृष्टी राज्य करते. त्यात कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव सर्व काही आहेत. या बेटांवर जवळजवळ ७१७१ वर्ग किमी एवढं वनक्षेत्र आहे. काही वृक्षांची उंची ४० ते ५० मीटपर्यंत असते, त्याचा बेस तीन मीटपर्यंत असतो. उष्ण हवामान आणि तीन हजार मिमीपेक्षा जास्त वर्षांचा पाऊस इथल्या जीवसृष्टीस एक वरदान आहे.

या बेटांवर माहीत असलेल्या जवळजवळ २२०० फुलांच्या जाती आहेत, त्यापकी २१५ या बेटांव्यतिरिक्त कुठेही आढळत नाहीत. या बेटांवर फर्नच्या १३० जाती, आíकडचे ११० प्रकार आढळतात. तर इथे पक्ष्यांच्या आजवर माहीत असलेल्या २७० प्रजाती आहेत आणि त्यांच्या पकी १०६ फक्त इथेच आढळतात. त्याव्यतिरिक्त अंदमानमध्ये १२ आणि निकोबारमध्ये नऊ पक्ष्यांच्या अशा जाती आहेत ज्यांचे क्षेत्र खूपच सीमित आहे. निकोबार मेगापोड, घरटं बनविणारी अबाबिल, आणि नारकोंडाम धनेश अशा काही संरक्षित जाती आहेत. शिवाय अंदमानी सप्रेट ईगल, निकोबार पेराकीट, अंदमानी महोक इथेच आढळणारे काही पक्षी आहेत.

इथे ७६ सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद आहे आणि त्यांच्यापकी २४ फक्त इथे विशिष्ट क्षेत्रांत आढळतात. या बेटांवर एकूण ४० जातींचे सर्प आढळतात त्यांच्यापकी १० विषारी आहेत. अंदमान नाग, अंदमान पिट वायपर, अंदमान करेत, अंदमान किलबॅक वॉटर स्नेक हे काही स्थानिक सर्प आहेत.
अंदमान आणि निकोबारला मगरींची फक्त एकच जात आढळते ती आहे खाऱ्या पाण्यातली मगर. या मगरी खारफुटींच्या क्षेत्रात राहतात. जितकं जंगलात वाघाचं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व खारफुटीच्या जंगलात मगरीचं आहे. इथल्या खाद्यशृंखलेत मगर ही सर्वोच्च स्थानावर आहे. या मगरींची लांबी सात मीटर आणि वजन एक हजार किलोपर्यंत असते.

काही संशोधकांच्या मते आज आढळणाऱ्या कासवांचा विकास जवळजवळ १२ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला असावा. अंदमानात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, किलोनिया मिडास, आणि लेदर बेक या कासवांच्या जाती आढळतात. समुद्री कासवे वर्षभरात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. ती काही विशिष्ट ठिकाणी अंडी घालायला येतात. अंदमान आणि निकोबारातली काही ठिकाणे ही त्यांची त्यासाठीची आवडती ठिकाणे मानली जातात. लेदर बॅक कासव हे जगातील सर्वात मोठं कासव आहे. त्याची लांबी तीन मीटपर्यंत असते. हे कासव खोल समुद्रात १२०० मीटपर्यंत जाते. अंदमानात रटलॅंड बेटांवर ही कासवं अंडी घालतात.

पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या जीवजातींपैकी कीटकांचे प्रमाण जवळजवळ ८० टक्के आहे. फुलपाखरंदेखील कीटक याच प्रकारात मोडतात. या बेटांवर वावरणाऱ्या फुलपाखरांच्या आजवर २२५ जाती ज्ञात आहेत. यातली काही फुलपाखरं बहुतेक जगातली सर्वात मोठी आहेत. अशांपैकी दहा जातींची फुलपाखरं फक्त या बेटांवरच आढळतात. यातील काही जाती अंदमान मोर्मोन, अंदमान क्लब टेल, अंदमान स्वोर्ड टेल, अंदमान याम फ्लाय अशी आहेत. माउंट हॅरियट नेशनल पार्कच्या क्षेत्रात सर्वात जास्त फुलपाखरं दिसतात.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...