Monday 31 August 2020

श्रीपाद अमृत डांगे

: (१० ऑक्टोंबर १८९९ - २२ मे १९९१)  एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण नासिक येथे. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पण गांधीच्या तत्त्वज्ञानाने भ्रमनिरास झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन (१९२१) हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते (१९२४). या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले; पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत.
डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर्. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६–२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना श्रीपाद अमृत डांगेश्रीपाद अमृत डांगे उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७) हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास ते हजर राहिले (१९२८). १९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.
१९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली. तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले. डांगे हे व्यवहारी राजकारणपटू आहेत. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास सखोल असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी (१९४९) व व्हेन कम्युनिस्ट डिफर (१९७०) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
खासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...