२१ एप्रिल २०२२

श्री. राजीव गांधी

श्री. राजीव गांधी

October 31, 1984 - December 2, 1989 | Congress

श्री. राजीव गांधी

वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी ते 58 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

देशात पिढी बदलाचे अग्रदूत श्री. राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. आपल्या मातोश्रींच्या हत्येच्या दुखातून सावरल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला मागील सात निवडणुकांच्या तुलनेत लोकप्रिय मते अधिक प्रमाणात मिळाली. पक्षाने 508 जागांपैकी 401 जागा मिळवून एक विक्रम केला.

70 कोटी भारतीयांचा नेता म्हणून अशी शानदार सुरुवात कोणत्याही परिस्थितीत उल्लेखनीय मानली जाते. हे याकरिता देखील अद्भुत आहे की श्री. राजीव गांधी अशा राजकीय कुटुंबाशी संबंधित होते ज्यांच्या चार पिढ्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सेवा केली. तरीदेखील श्री. राजीव गांधी राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक नव्हते व त्यांनी राजकारणात उशिरा आगमन केले.
श्री. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 ला मुंबई येथे झाला. ते केवळ तीन वर्षांचे होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यांचे आजोबा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. श्री. राजीव गांधी यांचे आई-वडिल लखनऊ येथून नवी दिल्ली येथे स्थायिक झाले. त्यांचे वडिल फिरोज गांधी खासदार बनले व एक निर्भय तसेच मेहनती खासदार म्हणून ख्याती प्राप्त केली.

श्री. राजीव गांधींनी आपले बालपण आपल्या आजोबांसोबत तीन मूर्ती हाउसमध्ये घालवले, ते काही काळासाठी देहरादूनच्या वेल्हम शाळेत गेले. परंतु लवकरच त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या निवासी दून शाळेत भरती करण्यात आले. तेथे त्यांचे कित्येक मित्र बनले. ज्यांच्यासोबत त्यांची आयुष्यभराची मैत्री झाली. नंतर त्यांचे छोटे भाऊ संजय गांधी यांनाही त्याच शाळेत पाठवण्यात आले. जेथे दोघे एकत्र राहिले.
शालेय शिक्षणानंतर श्री. राजीव गांधी केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले. पण लवकरच त्यांनी लंडन स्थित इम्पिरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यास केला.

हे तर स्पष्ट होते की राजकारणात करीअर करण्यामध्ये त्यांना रस नव्हता. त्यांच्या वर्गमित्रांनुसार श्री. राजीव गांधी यांच्याकडे तत्वज्ञान, राजकारण किंवा इतिहासाशी संबंधित पुस्तके नसत. तर विज्ञान व इंजिनीअरींगची बरीच पुस्तके असत. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडत असे. त्यांना छायाचित्रण व रेडिओ ऐकण्याचाही छंद होता.
विमान उड्डाण आकाशात उडणे ही त्यांची सर्वात मोठी आवड होती. त्यामुळेच हे अपेक्षितच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले. लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.
केम्ब्रिजमध्ये त्यांची भेट इटालियन विद्यार्थिनी सोनिया मैनोशी झाली, ज्या तेथे इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होत्या. या द्वयींनी 1968 मध्ये दिल्ली येथे विवाह केला. हे दोघेही राहुल व प्रियांका या आपल्या दोन मुलांसहित इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी राहत असत. आजूबाजूला राजकीय हालचालींचा गोंधळ असताना देखील ते आपले खाजगी जीवन जगत होते.

परंतु 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांच्या भावाचा संजय गांधींच्या मृत्यूने सर्व परिस्थिती बदलून टाकली. श्री. राजीव गांधी यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्याबाबत आणि आपल्या आईला राजकीय कामात मदत करण्यासाठी दबाव पडू लागला. त्यांनतर अनेक बाह्य व अंतर्गत आव्हाने देखील समोर आली. आधी त्यांनी या दबावांना विरोध केला. परंतु नंतर त्यांनी केलेल्या तर्काशी श्री. राजीव गांधी सहमत झाले. त्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या उत्तरप्रदेशच्या अमेठी येथून पोटनिवडणूक जिंकली.

नोव्हेंबर 1982 मध्ये भारताने आशियायी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद घेतले होते. यावेळी क्रीडासंकुल उभे करणे व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यात आली होती. श्री. राजीव गांधी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती की सर्व कामे वेळेत पूर्ण होतील व कोणत्याही अडचणींशिवाय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाईल. श्री. राजीव गांधी यांनी दक्षतेने व सहज समन्वयाद्वारे हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. सोबतच कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी त्याच तन्मयतेने काम करत पक्ष संघटनेला व्यवस्थित आणि सक्रिय केले. पुढे त्यांच्यासमोर याहून अधिक कठीण परिस्थिती येणार होती, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा होणार होती.

31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.
महिन्याभराच्या मोठ्या निवडणूक प्रचार कार्यक्रमादरम्यान श्री. राजीव गांधी यांनी पृथ्वी परिघाच्या दीडपट अंतराची यात्रा करत देशातील जवळपास सर्व भागात जाऊन 250 पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि लाखो लोकांना प्रत्यक्ष भेटले.

स्वभावाने गंभीर परंतु आधुनिक विचार व अदभूत निर्णयक्षमता असलेले श्री. राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते. ते सतत म्हणत की भारत एकसंघ ठेवण्याव्यतिरिक्त 21 व्या शतकातील भारत निर्माण करणे, हेही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

श्री. पी. व्ही. नरसिंह राव

श्री. पी. व्ही. नरसिंह राव

June 21, 1991- May 16, 1996 | Congress (I)
श्री. पी. व्ही. नरसिंह राव

पी. रंगराव यांचे सुपूत्र असलेले पी.व्ही.नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी करीमनगर येथे झाला. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. श्री. पी.व्ही. नरसिंह राव यांना तीन मुलगे आणि पाच मुली आहेत.
शेतकरी आणि वकील असूनही त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी 1962-64 या काळात कायदा आणि माहिती मंत्री, 1964-67 या काळात कायदा आणि धर्मादाय मंत्री, 1967 मध्ये आरोग्य आणि वैद्यकीय मंत्री 1968-71 या काळात शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. 1971-73 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1975-76 दरम्यान ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते. 1968-74 या काळात आंध्र प्रदेशच्या तेलगु अकादमीचे ते अध्यक्ष होते. 1972 पासून ते दक्षिण भारत हिंदी प्रचार सभाचे उपाध्यक्ष होते. 1957-77 या काळात ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य तर 1977-84 दरम्यान लोकसभेचे सदस्य होते. डिसेंबर 1984 मध्ये ते रामटेकमधून आठव्या लोकसभेवर निवडून गेले. 1978-79 मध्ये सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून ते लंडन विद्यापीठाच्या आशियाई आणि आफ्रिकी अभ्यास विभागाने आयोजित केलेल्या दक्षिण आशियावरील परिषदेला उपस्थित होते. राव यांनी भारतीय विद्या भवनाच्या आंध्र केंद्राचे अध्यक्षपदही भूषवले.

14 जानेवारी 1980 ते 18 जुलै 1984 दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री, 19 जुलै 1984 ते 31 डिसेंबर 1984 दरम्यान गृहमंत्री, 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 दरम्यान संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 25 सप्टेंबर 1985 मध्ये त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. राव यांना संगीत, चित्रपट, नाटक आदी विविध क्षेत्रात स्वारस्य होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती, काल्पनिक आणि राजकीय लेखन, विविध भाषा शिकणे, तेलगु आणि हिंदी भाषेत कविता करणे आणि एकूणच साहित्याबाबत त्यांना विशेष रुची होती. प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी अतुलनीय कामगिरी केली. ज्ञानपीठने प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांच्या प्रसिध्द “वेयि पडगलु” या तेलगू कादंबरीचा “सहस्त्रफन” हा हिंदी अनुवाद तसेच केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या “पण लक्षात कोण घेतो” या हरि नारायण आपटे यांच्या प्रसिध्द कादंबरीचे “अबला जीवितम्” हा तेलगू अनुवाद त्यांनी यशस्वीपणे प्रकाशित केला. मराठीतील अनेक उत्तम साहित्याचा त्यांनी तेलगू भाषेत तसंच तेलगू साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला. याशिवाय टोपण नावाने त्यांनी विविध मासिकांमध्ये अनेक लेख प्रकाशित केले. त्यांनी अमेरिका आणि पश्चिम जर्मनीच्या विद्यापीठांमध्ये राजकीय घडामोडींवर व्याख्यान दिले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी इंग्लंड, पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली आणि इजिप्त या देशांचा दौरा केला.

परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी क्षेत्रात आपला अनुभव पणाला लावला. जानेवारी 1980 मध्ये नवी दिल्लीत पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या तिसऱ्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच मार्च 1980 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जी-77 बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
1982 आणि 1983 ही दोन वर्षे भारतासाठी आणि परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाची ठरली. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातव्या परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी अलिप्त राष्ट्रांनी भारताला सोपवली. अलिप्त राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद नरसिंह राव यांनी भूषवले.
पॅलेस्तानी मुक्ती संघटना बरखास्त करण्यासाठी पश्चिम आशियातील देशांना भेटी दिलेल्या विशेष अलिप्त चळवळीचे नेतृत्व राव यांनी केले.
परराष्ट्र व्य वहार मंत्री म्हणून नरसिंह राव यांनी अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश, इराण, व्हिएतनाम, टांझानिया, गयाना आदींच्या संयुक्त आयोगांचे अध्यक्षपद भूषवले.
19 जुलै 1984 मध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. 5 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांना नियोजन मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 दरम्यान त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

श्री. मोरारजी देसाई

श्री. मोरारजी देसाई

March 24, 1977 - July 28, 1979 | Janata Party

श्री. मोरारजी देसाई

श्री.मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी भादेली गावात झाला. हे गाव आता गुजरातमधील बुलसर जिल्हयात आहे. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि अत्यंत कडक शिस्तीचे होते. लहानपणापासूनच, छोटया मोरारजींनी वडिलांकडून कोणत्याही परिस्थितीत कठोर मेहनत आणि सचोटी ही मूल्ये आत्मसात केली. सेंट बुसर हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन मुंबई प्रांतातील विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवी घेतली आणि उपजिल्हाधिकारी म्हणून 12 वर्षे काम केले.

1930 मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेल्या स्वातंत्र्य लढयादरम्यान देसाई यांचा ब्रिटीश न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य लढयात उडी घेतली. हा निर्णय अतिशय कठीण होता, मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, तेव्हा कौटुंबिक समस्या दुय्यम स्थानी येतात असा विचार त्यांनी केला.
स्वातंत्र्य लढयादरम्यान, देसाई यांनी तीन वेळा तुरुंगवास भोगला. 1931 मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले आणि 1937 पर्यंत गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव होते.

1937 मध्ये पहिलया काँग्रेस सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर देसाई हे तत्त्कालीन मुंबई प्रांतात बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात महसूल, कृषी, वन आणि सहकारी मंत्री होते. जागतिक युध्दात भारताच्या परवानगीशिवाय सहभागाचा काँग्रेस मंत्रालयानी निषेध केला.
महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात देसाई यांना ताब्यात घेण्यात आले आणि ऑक्टोबर 1941 मध्ये सोडून देण्यात आले. ऑगस्ट 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या वेळी पुन्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. 1946 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकानंरत, ते मुंबईत गृह आणि महसूल मंत्री झाले. या काळात त्यांनी जमीन महसुलात अनेक सुधारणा केल्या. पोलिस प्रशासनात त्यांनी जनता आणि पोलिस यांच्यातील दरी दूर केली, आणि जनतेच्या गरजांप्रती पोलिस प्रशासन अधिक सजग केले. 1952 मध्ये ते मुंबईचे मुख्यमंत्री बनले.

त्यांच्या मते, जोपर्यंत गावे आणि शहरांमध्ये राहणारे गरीब लोक सामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम होत नाहीत, तोपर्यंत समाजवादाबाबत बोलण्यात काही अर्थ नाही. देसाई यांनी शेतकरी आणि भाडेकरुंच्या समस्या सुधारण्याच्या हेतूने प्रगतीशील कायदा बनवला आणि आपला विचार कार्यान्वित करण्यासाठी ठोस पाऊल उचलले. यामध्ये देसाई यांचे सरकार अन्य राज्यांपेक्षा खूप पुढे होते. याशिवाय, त्यांनी प्रामाणिकपणे कायदयाची अंमलबजावणी केली आणि मुंबईतील त्यांच्या प्रशासनाची सर्वांनी प्रशंसा केली.
राज्यांची पुनर्स्थापना केल्यांनतर, 14 नोव्हेंबर 1956 रोजी देसाई वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. नंतर 22 मार्च 1958 रोजी त्यांनी अर्थ खात्याचा कार्यभार स्वीकारला.

आर्थिक नियोजन आणि वित्तीय प्रशासनाबाबतचे ज्ञान त्यांनी कृतीमध्ये उतरवले. संरक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी महसूल वाढवला, अनाठायी खर्चात कपात केली आणि प्रशासनावरील सरकारी खर्चात काटकसरीला प्रोत्साहन दिले. आर्थिक शिस्तीची अंमलबजावणी करुन त्यांनी वित्तीय तूट कमी केली. समाजातील उच्चभ्रू वर्गाकडून होणाऱ्या वारेमाप खर्चावर नियंत्रण आणले. 1963 मध्ये कामराज योजनेअंतर्गत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. पंडित नेहरुनंतर पंतप्रधान झालेल्या लालबहादूर शास्त्री यांनी प्रशासकीय यंत्रणेची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष बनण्यासाठी देसाई यांचे मन वळवले. या कामात सार्वजनिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण अनुभवाची त्यांना मदत झाली.

1967 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात देसाई यांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जुलै 1969 मध्ये, गांधी यांनी त्यांच्याकडून अर्थखाते काढून घेतले. देसाई यांच्या एक गोष्ट लक्षात आली की पंतप्रधानांना आपल्या सहकाऱ्यांची खाती बदलण्याचा विशेषाधिकार आहे. मात्र इंदिरा गांधी यांनी याबाबत त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचे साधे सौजन्यही न दाखवल्यामुळे त्यांच्या आत्मसन्माला ठेच पोहोचली. त्यामुळे त्यांनी विचार केला की भारताच्या उपपंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. 1969 मध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले, मात्र देसाई काँग्रेस संघटनेसोबत राहिले. पुढेही ते पक्षात प्रमुख भूमिका पार पाडत राहिले. 1971 मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून गेले. 1975 मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रश्नावर त्यांनी आमरण उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणामुळे जून 1975 मध्ये निवडणुका पार पडल्या. चार विरोधी पक्ष आणि एक अपक्ष यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या जनता दल पक्षाला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गांधी यांची लोकसभेवर निवड निरर्थक असलयाचे जाहीर केल्यानंतर देसाई यांच्या मनात आले की, लोकशाहीची तत्त्वे ध्यानात घेऊन गांधी यांनी राजीनामा दयायला हवा.

आणीबाणी घोषित झाल्यानंतर, 26 जून 1975 रोजी देसाई यांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांना एकांत कारावासात ठेवण्यता आले आणि लोकसभा निवडणुका घेण्याच्या निर्णयापूर्वी 18 जानेवारी 1977 रोजी सोडून देण्यात आले. त्यांनी देशभरात संपूर्ण ताकदीनिशी प्रचार केला आणि मार्च 1977 मध्ये सहाव्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता दलाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात त्यांची महत्त्वूपूर्ण भूमिका होती. गुजरातमधील सुरत मतदारसंघातून देसाई लोकसभेसाठी निवडून गेले होते. नंतर त्यांची सर्वसंमतीने संसदेतील जनता दलाचे नेते म्हणून निवड झाली आणि 24 मार्च 1977 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली.

1911 मध्ये देसाई आणि गुजराबेन यांचा विवाह झाला. त्यांच्या पाच मुलांपैकी एक मुलगी आणि एक मुलगा हयात आहेत.
पंतप्रधान म्हणून देसाई यांची इच्छा होती की, भारतातील जनतेला इतके निडर बनवायचे की देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीने जरी काही चूक केली तर त्या व्यक्तीच्या निदर्शनात ती चूक आणून दिली जावी. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की, “कुणीही मग तो पंतप्रधान असला तरी देशाच्या कायदयापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही.”
त्यांच्यासाठी सत्य ही एक संधी नसून विश्वासाचे एक अंग होते. त्यांनी क्वचितच आपल्या तत्त्वांना परिस्थितीच्या दबावापुढे मुरड घातली. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते कटिबध्दतेने पुढे जात राहिले. ते स्वत: मानायचे की, “सर्वांनी सत्य आणि विश्वासाच्या जोरावर आयुष्यात मार्गक्रमण करायला हवे.”

श्री. लाल बहादूर शास्त्री

श्री. लाल बहादूर शास्त्री

June 9, 1964 - January 11, 1966 | Congress

श्री. लाल बहादूर शास्त्री

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.
1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”
आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.