Wednesday 28 August 2019

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती

आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू, जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस दरवर्षी देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणून आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विशेष काही... 

1) *असे पडले नाव* : मेजर ध्यानचंद यांचे मुळ नाव ध्यान सिंग होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करत. नंतर त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.

2) *खेळाची सुरुवात* : ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त 6 वी पर्यंतच झाले. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा विशेष अनुभव नव्हता.

3) *भारतीय संघाचे नेतृत्त्व* : हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांचा सामना करत होते. अशा परिस्थितीतही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

4) *न्यूझीलंड दौऱ्यात छाप* : ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. 1926 च्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 21 सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते.

5) *ऑलिम्पिक हिरो* : मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.

6) *हिटलरची ऑफर नाकारली* : 1936 मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या लढतीत ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर त्यांचे चाहते झाले. यामुळे हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

7) *पद्मभूषण देऊन गौरव* : ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले.

हॉकी विश्वात आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...