Monday 7 November 2022

ज्ञानाची भूक शमविण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली. विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे.

इंग्लंडमध्ये विद्यार्जन करताना आपणाला कोणत्या परिस्थितीत दिवस काढावे लागले व किती कष्ट सोसावे लागले याबद्दलच्या स्वतःच्या आठवणी सांगताना बाबासाहेब त्या जितक्या उत्साहाने व खुमासदारपणे एकावेळी सांगतात तितक्याच उत्साहाने व खुमासदारपणे दुसऱ्यावेळी त्याच आठवणी सांगत असतात. एकच गोष्ट अनेकवेळा सांगितली तरी ती सांगण्याच्या त्यांच्या पध्दतीत यत्किंचितही बदल होत नाही. सांगण्याची तऱ्हा प्रत्येकवेळी सारखीच असते. त्यांच्या तोंडून अशा गोष्टी अनेक वेळा ऐकणाऱ्याला त्यांच्या या सांगण्याच्या एकाच पध्दतीची गंमत व कुतूहल वाटते.


इंग्लडमध्ये ते शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. त्या लायब्ररीचा एक असा दंडक अाहे की, लायब्ररीत कुणी खाद्यपदार्थ आणून खाता कामा नये. बाबासाहेब सकाळी एक कप चहा व एक टोस्ट खाऊन त्या लायब्ररीत ८ वाजता जात असत. ते संध्याकाळी ८ वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत सतत वाचीत बसत. लायब्ररी बंद झाली की मग घरी जात. दुपारी जेवण वगैरे करण्यास बाहेर हाॅटेलात जाण्याची त्यांची ऐपत नव्हती.


कारण हाॅटेलात जेवणे म्हणजे अतिखर्चाचे. तेवढ्या पैशांची त्यांच्याजवळ तरतूद असण्याची काहीच शक्यता नव्हती. दुपारी भूक लागेल म्हणून ते घरुन येतानाच सँडविचचे दोन तुकडे कागदात गुंडाळून खिशात घालून आणीत. लायब्ररीमधल्या माणसाची नजर चुकवून ते सँडविच दुपारच्या वेळी तेथेच खात व वाचन चालू ठेवीत. असे काही दिवस लोटल्यावर एकदा त्यांना अशाप्रकारे दुपारी सँडविच खाताना लायब्ररी अटेन्डन्टने पाहिले. तो तडक त्यांच्याकडे घाईघाईने आला व त्याने हटकले (विचारले), “हे काय करीत आहात तुम्ही?” बाबासाहेबांना त्या माणसाला काय उत्तर द्यावे हे सुचेना. ते किंचित गोंधळले. पण त्यांनी आपली खरी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले,


“मी शिष्यवृत्ती घेऊन येथे शिकण्यासाठी आलो असल्यामुळे दुपारी हाॅटेलात जाऊन जेवण घेण्याइतके पैसे माझ्याजवळ पैसे नसतात. त्यामुळे मी घरूनच दोन सँडविच आणून त्यावर दुपारची वेळ निभावून नेतो.” त्यांचे हे स्पष्टीकरण ऐकून त्या अधिकाऱ्याला जरी त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली तरी त्यांना तशाप्रकारे लायब्ररीत सँडविच खाण्याची तो परवानगी देऊ शकत नव्हता. त्यांनी बाबासाहेबांना चक्क सांगितले.


“छे छे, येथे कोणताही खाद्यपदार्थ आणता कामा नये. येथे एक तुकडा जर नकळत जमिनीवर पडून राहिला तर रात्री शेकडो उंदीर धावून येतील आणि या लायब्ररीतील हजारो पुस्तकांचा फडशा उडवतील. म्हणून येथे तुम्ही उद्यापासून कसल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ आणता कामा नये. नाहीतर मी तुमच्याविरुध्द मुख्य लायब्ररीयनकडे तक्रार करून तुम्हांला येथे येण्याचे बंद करीन.”


बाबासाहेबांनी त्याला सांगितले, “उद्यापासून मी काहीही आणणार नाही.” आणि त्या दिवसापासून बाबासाहेबांनी दुपारी खाण्याकरिता काहीही सोबत आणण्याचे बंद केले. दुपारी काहीही न खाता ते आपले वाचन सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सतत लायब्ररीत बसून करू लागले. 
केवढा तरी कष्टाळू व निश्चयी स्वभाव! त्यांनी ज्ञानाची भूक शमविण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली. विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...