Saturday 28 March 2020

मराठी व्याकरण अलंकार

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात.  

अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.  

🔹उदा.

ढगांशी वारा झुंजला रे

काळाकाळा कापुस पिंजला रे

आतां तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच !              

🟤भाषेचे अलंकार :-🟤

🔸भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.  

🔹केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.                

🔹केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.                

🔹भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात.🔹   

१. शब्दालंकार  

२. अर्थालंकार         

🟤शब्दालंकार🟤      

शब्दालंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे

अ) अनुप्रास अलंकार :-  

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ            

गडद गडद निळे जलद भरुनी आले, 

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.            

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।

गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।       

🔹ब) यमक अलंकार :-

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो.          

उदाहरणार्थ              

राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी

फळा आली माय । मायेची पाठवणी

🔹पुष्पयमक या यमकाचे उदाहरण

सुसंगती सदा घडो,  

सृजनवाक्य कानी पडो, 

कलंक मातीचा झडो, 

विषय सर्वथा नावडो

🔹दामयमक या यमकाचे उदाहरण

आला वसंत कवीकोकील हाही आला, 

आलापितो सुचवितो अरुणोदयाला

🔹क) श्लेष अलंकार :-         

वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो.     

उदाहरणार्थ

मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही.- अभंग श्लेष

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.- अभंग श्लेष          

ते शीतललोपचारे जागी झाले हळूच मग बोले

औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले- अभंग श्लेष

श्रीकृष्ण नवरा मी नवरी  

शिशुपाल नवरा मी न-वरी- सभंग श्लेष  

कुस्करु नका ही सुमने  

जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने- सभंग श्लेष            

वरील ओळींमधील नवरी, न-वरी, सुमने, सु-मने, नलगे, न-लगे अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्यास अभंग श्लेष म्हणतात.           

श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे.

🟤अर्थालंकार🟤

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

१) उपमा अलंकार :-

दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ  

अ) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी 

आ) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी 

इ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 

🟤२) उत्प्रेक्षा अलंकार :-🟤

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.

उदाहरणार्थ

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे

किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार  

शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले  

अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार

🟤३. अपन्हुती अलंकार🟤

उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.

उदाहरणार्थ- 

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी  

ती हाक येई कानी, मज होय शोककारी  

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी

ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे              

हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले   

मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो  

नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो 

🟤४. रूपक अलंकार 🟤  

उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.

उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा  

दावी मुखचंद्रमा सकळीकांसी

बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी  

अमृताची वृष्टी, मज होय.              

🟤५. व्यतिरेक अलंकार🟤

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

अमृताहून गोड, नाम तुझे देवा             

कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हीच बलवान       

तू माउलीहून मयाळ, चंदाहून शीतळ, 

पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा         

सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो,

त्याला पाहता लाजून, चंद्र आभाळी लोपतो    

🟤६. अनन्वय अलंकार 🟤

उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध    

उदाहरणार्थ  

झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा

आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी

या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान     

🟤७. भांतीमान अलंकार 🟤      

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो.        

उदाहरणार्थ 

हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, 

म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा  

शंख द्वयी धरुनी कुंकुम किरवाणी  

लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी            

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे, 

पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे  

घालीन अंजन अशा मातीने तटाकी  

कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी     

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...