Tuesday 15 September 2020

१०० वर्ष झालेली एक महत्तवपुर्ण घटना🔰डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नागपूरशी एक अनोखे नाते आहे. त्यांच्या चळवळीत नागपूरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केलेलाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ३० मे १९२० रोजी पहिल्यांदा नागपूरला आले आणि त्यानंतर भेटी वाढत जाऊन नागपूरकरांशी त्यांचे ऐतिहासिक ऋणानुबंध निर्माण झाले.

🔰३०, ३१ मे आणि १ जून १९२० रोजी नागपूर येथे

🔰 अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली होती.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कांच्या मागण्यासंबंधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली राष्ट्रीय स्तरावरील ही "पहिलीच" बाहिष्कृत समाजाची परिषद होती. त्यामुळे या परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व होते.

🔰कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते. गोंदियाचे बाबू कालिचरण नंदागवळी हे स्वागताध्यक्ष आणि गणेश आकाजी गवई व किशन फागुजी बनसोडे हे सेक्रेटरी होते.

🔰साऊथबरो कमिटीपुढे २७ जानेवारी १९१९ रोजी मतदानाच्या संदर्भात अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांची कैफियत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या परिषदेत बोलावण्यात आले होते. कस्तूरचंद पार्क (तेव्हाचा आर्सेनल ग्राऊंड)वर ही परिषद बोलावण्यात आली होती.

🔰परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा व्यासपीठावर होते. त्यांचे भाषण झाले नाही. परंतु अस्पृश्यांचे राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेतील त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले.

🔰 ‘अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व न देता त्यांचे हितसंरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे,’ असे मत डिप्रेस्ड क्लास मिशनचे वि. रा. शिंदे यांनी साऊथबरो कमिटीसमोर मांडले होते. याविरुद्धचा ठराव डॉ. आंबेडकरांच्या पुढाकारानेच या परिषदेत मंजूर करण्यात आला.

🔰पहिल्या दिवशीच्या सभेनंतर रात्री नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत बाबासाहेबांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांचे मत बहिष्कृत समाजासाठी कसे घातक ठरेल हे पटवून दिले. त्यानंतर एकमताने याविरुद्धचा ठराव मंजूर झाला.

🔰यासोबतच या परिषदेत बहिष्कृत समाजास राजकीय प्रतिनिधित्व देणे, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र खाते निर्माण करणे, स्थानिक स्वराज्य संस्थानात प्रतिनिधी घेणे आणि मुलांना आणि मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, असे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरावही परिषदेत मंजूर करण्यात आले. या परिषदेनंतर बाबासाहेबांचे काम अधिक गतीने सुरू झाले. आंदोलने झाली. नागपूरकर त्यांच्या कार्याशी, चळवळीशी अधिक जुळले. दुसºया गोलमेज परिषदेत बाबासाहेबांना सहभागी करून घेण्यासाठी नागपुरातून लंडनला अनेक तारा करण्यात आल्या. पुढे अनेक महत्त्वाच्या परिषदा, निवडणूक यानिमित्ताने त्यांचे नागपूर व विदर्भात येणे वाढले आणि शेवटी बौद्ध धम्माची ऐतिहासिक धम्मदीक्षा घेण्यासाठीही त्यांनी नागपूरचीच निवड केली.

🔴छत्रपती शाहू महाराजांची भव्य मिरवणूक

🔰छत्रपती शाहू महाराज यांचे नागपूरच्या भारतीय बहिष्कृत परिषदेला येणे ही अस्पृश्यांच्या चळवळीच्या दृष्टीने फार मोठी घटना होती. नागपुरात छत्रपती शाहू महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. महाराजांच्या या मिरवणुकीत कोणताही लवाजमा नव्हता. ही मिरवणूक साधी परंतु ऐतिहासिक होती. नागपुरातील अस्पृश्य बांधवांनी अतिशय आपुलकीने ही मिरवणूक ३० मे १९२० रोजी काढली होती. तत्पूर्वी शाहू महाराज यांच्या रेल्वे प्रवासातही त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रेल्वे स्टेशनच्या वरच्या माळ्यावर त्यांच्यासाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. बफसाहेब यांच्या बंगल्यावर त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. सायंकाळी ५ वाजता मिरवणुकीने त्यांना परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अका...