Tuesday 19 November 2019

झाशीची राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीची राणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या धाडसी स्त्रीची आज १९१ वी जयंती. कशाचीही भिडभाड न ठेवता इंग्रजांशी लढण्यासाठी सज्ज झालेल्या या राणीबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. झाशीच्या राणीच्या १९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करुया…

१. राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मदिनाबाबतचा वाद मागच्या अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी येथे झाला असे म्हटले जाते.

२. आपल्याला त्यांचे नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई असल्याचे माहित आहे. मात्र त्यांचे खरे नाव मनिकर्णिका तांबे असे होते. अनेक जण त्यांना मनू या नावाने हाक मारत.

३. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

४. झाशीचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी वयाच्या ७ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना त्याच नावाने ओळखले जाऊ लागले.

५. त्या जन्मत: अतिशय धाडसी होत्या. त्यांनी घरी राहून शिक्षण घेतले. त्यांच्या अभ्यासात घोडेस्वारी, बंदूक चालविणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता.

६. अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या.

७. त्यांनी लढलेल्या युद्धात ह्युज रोज हा वरिष्ठ ब्रिटीश आर्मी ऑफीसर होता. त्याने राणीचे वर्णन चाणाक्ष, सुंदर आणि देखण्या असे केले होते.

८. लक्ष्मीबाई यांचा राजवाडा राणीचा महाल म्हणूनही ओळखला जातो. आता त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे.

९. त्यांचे पहिले मूल ४ महिन्याचे असताना गेले. मग त्यांनी मुलाला दत्तक घेतले.

१०. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

११. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

१२. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण भारतामध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता.

१३. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले.

१४. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

१५. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here