Monday 11 April 2022

संत तुकोबांचा उपदेश

🌷संत तुकोबांचा उपदेश🌷

तो चि लटिक्यामाजी भला ।
म्हणे देव म्यां देखिला ।।१।।
ऐशियाच्या उपदेशें ।
भवबंधन कैसें नासे ?।
बुडवी आपणासरिसे ।
अभिमानें आणिकांस ।।ध्रु.।।
आणिक नाहीं जोडा ।
देव म्हणवितां या मूढा ।।२।।
आणिकांचे न मनी साचें ।
तुका म्हणे या श्रेष्ठांचें ।।३।।

🌷अर्थ व चिंतन🌷
देव ही काही पहायची वस्तू नाही. देव दिसतही नाही आणि दिसणारही नाही. देव हा विषय नंतरचा; पण देवत्व पाहता येते. रंजल्या-गांजल्यांची सेवा करणाऱ्यात देवत्व असते. देव दगडात नाही तर माणसात असतो. तुका सांगे मूढजना । देही देव का पाहणा? ।। देवाची व्याख्या समजून न घेता वाट्टेल तिथं डोकं टेकवणाऱ्या 'मूढ' म्हणजेच मूर्ख लोकांना तुकोबा 'देहात देव का पाहत नाहीत?' असा प्रश्न करून देवाचं मुख्य ठिकाण हे आपलं शरीर म्हणजेच माणूस असल्याचं  सांगतात.

प्रत्येक जीवात शिव आहे. म्हणून जात, धर्म, वर्ण, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रत्येक जीवात शिवाला पाहायला पाहिजे. म्हणजे एकमेकांविषयीच्या द्वेषाचे वातावरण निवळू शकेल.

ईश्वराचं स्वरूप तुकोबांइतके आणखी कुणाला नक्की सांगता येईल? म्हणून या अभंगात ते याविषयी अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडतात. त्यांना कुणीतरी 'मी देव पहिला' असं म्हणणारा आणि कुणीतरी 'मीच देव आहे' असं म्हणणाराही नक्कीच भेटला असणार. आजतर अशा लोकांचा प्रचंड भरणा पाहायला मिळतो.

अपप्रचाराला बळी पडणारी आपण आंधळी माणसं. पण संत डोळस असतात. ते नेमकं पाहत असतात. तुकोबा म्हणतात, "तोच लबाडातला 'महालबाड' आहे; जो म्हणतो, मी देव पहिला."

मी देव पहिला म्हणणाऱ्याच्या पुढं डोकं टेकायला रांगा लावणाऱ्यांमध्ये संत कधीच नसतात. तुकोबांनातर या विषयावर बोलण्याचा अधिकारच आहे. म्हणून ते 'मी देव पहिला म्हणणारा नुसता लबाड नाही, तर महालबाड' असल्याचं स्पष्टपणे सांगतात. आणि पुढे म्हणतात, "अशा महालबाड लोकांच्या उपदेशाने सामान्य माणसांची दुःखं कशी दूर होणार? यांची बंधने कधी संपणार?"

"ही महालबाड माणसे आपल्याच अहंकारात इतरांनाही स्वतःसारखी बुडवून टाकणार." हे अहंकारी असतात. ते आपलं तर नुकसान करतातच पण इतरांचंही नुकसान करून ठेवतात.

देवाच्या स्वरूपाचं आकलन सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. सामान्य माणूस देवाला दगडात पाहतो, तर असामान्य माणसे देवाला प्रत्येक सजीवाच्या जीवात पाहतात.

संतांची शिकवण सामान्य माणसांना तर आहेच. सोबतच ते 'महालबाड आणि महामुर्ख' असणाऱ्यांना सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण भक्तांनी त्यांना इतकं डोक्यावर घेतलेलं असतं की ते संतांच्या शब्दालासुद्धा किंमत देत नाहीत. म्हणून या अभंगात शेवटी तुकोबा म्हणतात, "हे महालबाड आणि महामुर्ख माणसे, यांच्यापेक्षा इतर श्रेष्ठ लोकांनी सांगितलेल्या खऱ्या गोष्टी मानतच नाहीत."

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...