Wednesday 4 May 2022

प्राचीन इतिहासाची साधने

प्राचीन इतिहासाची साधने
प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी पुढील साधनांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो.
आलेख – शिलालेख, स्तंभलेख, गुहालेख, ताम्रपट यावरून आपल्याला प्राचीन इतिहासाची ओळख होते. जर हे आलेख सापडले नसते तर अनेक राज्यांच्या इतिहासापासून आपण अज्ञात राहिलो असतो. उदा. ओरिसामधील हातीगुंफा या ठिकाणी जो गृहालेख सापडला आहे, त्यावरून आपणास कलींग सम्राट खारवेल यांची माहिती उपलब्ध होते. अशोकाच्या अनेक शिलालेखांवरून त्या काळच्या राज्यकारभाराचीही माहिती मिळते.
नाणी – प्राचीन काळातील जी नाणी सापडली आहेत. त्यांच्यावर जी अक्षरे कोरली आहेत, त्यावरून आपणास प्राचीन इतिहासाची माहिती मिळते. उदा. समुद्रगुप्त राज्याच्या नाण्यावर अश्वमेधाचे चित्र असून या राजाने पृथ्वीचे पालन करून स्वर्ग जिंकल्याचे वाक्य या नाण्यावर कोरले आहे. याचा अर्थ या राज्याच्या ताब्यात फार मोठा प्रदेश असू शकतो.
वाङ्मयीन साधने – यात धर्मग्रंथ, इतर वाङ्मय तसेच परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते यांवरून आपल्याला बरीच माहिती मिळते.
प्रागतिहासिक कालखंड – हा कालखंड खूप मोठा होता. हा मानवी इतिहासाचा सुरूवातीचा कालखंड आहे. या कालखंडाला ‘अश्मयुग’ असेही संबोधले जाते. या कालखंडात मानवाला लेखन कला अवगत नव्हती. या कालखंडाचे तीन भाग पडतात – पुराश्मयुग (Palaeolithic age ), मध्याश्मयुग (Mesolithic age), नवाश्मयुग ( Neothilic age)
१. पुराश्मयुग (Palaeolithic age ) – या कालखंडात मानवाने प्रामुख्याने दगडी हत्यारांचा वापर केला. या हत्यारांचा वापर प्रामुख्याने कंदमुळ काढणे, मांसाचे तुकडे काढणे यासाठी केला असावा. या काळातील मानवाने दगडांवर तसेच गुहांमध्ये काही चित्रे काढली आहेत. यावरून त्या काळातील सामाजिक जीवनासंदर्भात माहिती मिळते.
२. मध्याश्मयुग (Mesolithic age ) – पुराश्मयुग व नवाश्मयुग यांना जोडणारा हा कालखंड आहे. या काळात मानव शिकार करून अन्न मिळवत असे. या काळात मानवाने टोकदार हत्यारांचा वापर शिकारीसाठी सुरू केला. भीमबेटका, आदमगड, प्रतापगड याठिकाणी मध्याश्मकालीन चित्रकला सापडली आहे.
3) नवाश्मयुग ( Neothilic age) – या काळात मानवाने शेती करायला सुरूवात केली. या काळातील मानव चिखलाने बांधलेल्या आयताकृती किंवा वर्तृळाकृती घरात राहत असे. या काळात धान्य साठवणुकीसाठी व अन्न तयार करण्यासाठी भांडय़ांचा वापर केला गेला. या काळात मानवाने चाकाचा शोध लावला. थोडक्यात शिकारी अवस्थेतून माणूस या युगात शेतकरी अवस्थेत आला.
हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती ही सर्वात प्राचीन व विकसित संस्कृती होती. ही संस्कृती कांस्ययुगीन संस्कृती होती, या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. सिंधू संस्कृतीच्या कार्यकालाबाबत इतिहासकारांमध्ये एक मत नाही. मात्र,  साधारणत: इ.स. पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व २६०० हा कालखंड प्रारंभिक हडप्पा संस्कृतीचा तसेच इ.स. पूर्व २६०० ते २८०० हा कालखंड परिक्पव हडप्पा संस्कृतीचा सांगता येईल. या संस्कृतीचा विस्तार उत्तरेकडील- मांडा (जम्मू काश्मीर) पासून दक्षिणेकडील दायमाबाद (महाराष्ट्र) तर पश्चिमेला सुतकागेंडोरपासून पूर्वकडील उत्तर प्रदेशातील आलमगीपर्यंत झालेला आढळतो.
वैशिष्टय़े :- ही कांस्ययुगीन संस्कृती होती. यात योजनाबद्ध नगररचना व पक्क्य़ा इमारती होत्या. सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन होते. लिपीचे ज्ञान होते. भुयारी गटारी झाकण्यासाठी दगड व पक्या विटांचा वापर केला जात असे. जवळपास सर्व हडप्पा संस्कृतीतील शहरांतील घरात स्वत:चे अंगण व स्नानगृह होते. पुष्कळ घरात स्वत:च्या विहिरी होत्या. स्त्री-पुरुष सौंदर्यप्रसाधनांचा वापर करीत असत. पुरुष दाढी करून  मधोमध भांग पाडत. उत्खननात स्त्रियांच्या टेराकोटा मूर्ती सापडल्या आहेत. उत्खननात आरसे व कंगवेदेखील सापडले आहेत. येथे सापडलेल्या एका मूर्तीमध्ये झाडांचा उगम स्त्रीच्या गर्भातून झालेला आहे, असे दाखवण्यात आले आहे. यावरून हे लोक भूमीला मातृदेवता मानत असत. हडप्पाकालीन लोक मर्तिपूजक होते. मात्र, हडप्पा लोकांच्या धर्म संकल्पना कोणत्या स्वरूपाच्या आहेत, हे मात्र त्यांच्या लिपीचे पुरेसे ज्ञान न झाल्याने आपण सांगू शकत नाही.
हडप्पाकालीन लिपी :– या लिपीचे अद्याप पुरेसे आकलन झालेले नाही. ही लिपी चित्रात्मक स्वरूपाची होती.
वजन आणि मापे :- उत्खननात जे वजन व मापे आढळली आहेत, त्यावरून व्यापारासंबंधी कल्पना येते. येथे व्यापार दोन प्रकारे चालत असावा- एक म्हणजे अंतर्गत व दुसरा म्हणजे बहिर्गत.
कृषी जीवन :- शेती हा व्यवसाय हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. हडप्पा संस्कृतीतील लोक लाकडी नांगरांचा वापर करीत असत. पण नांगरांचे ओढणे बलामार्फत किंवा माणसामार्फत होत असेल, याचे आकलन होत नाही. येथील लोक गहू, बार्ली, वाटाणा, तीळ, मोहरी या पिकांचे उत्पादन घेत असत. हे धान्य मोहोंजोदरो, हडप्पा तसेच कालीबंगन येथील धान्य कोठारात साठवले जात असावे. उत्खननात सापडलेल्या अनेक मृदांवर प्राण्यांचे चित्र आहे. गाय, म्हैस, हत्ती, डुक्कर, मांजर, कुत्रा, ससा, माकड, हरीण, मोरांचे पालन हे लोक करीत असत. हत्ती व गेंडा या प्राण्यांची माहिती हडप्पा लोकांना होती. मात्र सिंह या प्राण्याची ओळख हडप्पावासीयांना नव्हती. हडप्पा संस्कृतीचा अंत कसा झाला, याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
सिंधू संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे :-
१) हडप्पा :- रावी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर पाकिस्तानातील पूर्व पंजाबमधील मॉण्टगोमरी जिल्ह्य़ात आहे. याचा शोध १९२१ मध्ये दयाराम साहनी यांनी लावला. येथे धान्याचे कोठार सापडले आहे. तसेच दफनभूमी, दगडाची मानवी नृत्य करणारी मानवी मूर्ती सापडली आहे. येथे मानवी सांगाडे सापडले आहेत.
२) मोहोंजोदरो :- याचा अर्थ ‘मृताची टेकडी’ असा होतो. याचा शोध १९२२ मध्ये आर. डी. बॅनर्जी यांनी लावला. हे ठिकाण सिंधू नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हे सर्वात मोठे नगर असावे. शहराचा आकार आयताकृती होता. कांस्य समिश्राचे नर्तिकेची मूर्ती येथे सापडलेली आहे. दाढी असलेली दगडी मूर्ती देखील सापडली आहे. भांडय़ात कपडय़ाचा तुकडा सापडलेला आहे. भांडय़ाच्या तुकडय़ावर जहाजाचे चित्र आढळून आले आहे.
3)    चन्होदारो :- ( chanhudaro) :- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंध नदीवर वसलेले होते. याचा शोध  एम. जी. मुजुमदार यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील एकमेव ठिकाण जेथे Citadel  ( किल्ला ) आढळलेला आहे. येथे बांधकामाचे दगड मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. हे मनी तयार करण्याचे प्रसिद्ध ठिकाण असावे.
४) कालिबंगन  ( kalibangan) :- राजस्थानातील घग्गर नदीवर वसलेले ठिकाण. याचा शोध ए. घोष यांनी लावला. कालिबंगन म्हणजे काळ्या बांगडय़ा येथे उंटाचे हाड सापडले आहे. येथे पूर्व हडप्पा व परिपक्व हडप्पा अशा दोन्ही अवस्था आढळून आल्या आहेत.
५) लोथल :- गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ातील भोगावा नदीतीरावरील वसलेले ठिकाण. याचा शोध एस. आर. राव यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर होय. येथे कृत्रिम जहाज बोट सापडली आहे. येथील मुद्रांवर जहाजाची चित्रे आहेत.
६) बनवाली :- याचा शोध आर. एस. बिस्त यांनी लावला. हरियाणातील हिस्सार जिल्ह्य़ातील हे ठिकाण. येथे यव ( बार्ली) हे धान्य सापडलेले आहे.
७) धोलवीरा :- गुजरातमधील हे ठिकाण. याचा शोध डॉ. जे. पी. जोशी व आर. एस. बिस्त यांनी लावला.
८) राखीगड :- घग्गर नदीवरील हरियाणातील हे शहर धोलवीरापेक्षाही मोठे होते.
९) रोपार :- पंजाबमधील सतलज नदीवरील ठिकाण. याचा शोध यज्ञदत्त शर्मा यांनी लावला.
मृतांसोबत कुत्रा पुरल्याचे अवशेष येथे सापडलेले आहेत.
१०) सुरकोटाडा :- गुजरातमधील कच्छ जिल्ह्य़ातील हे ठिकाण. याचा शोध जगपती जोशी यांनी लावला.
११) कोटदिजी :-पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंधू नदीवरील हे ठिकाण. येथे परिपक्व हडप्पा संस्कृती असावी. येथे चाकावरील मृद भांडी व तीही रंगवलेली आढळून आलेली आहे.
१२) सुतकागेंडोर :-पाकिस्तानातील बलुचिस्तानातील ठिकाण. याचा शोध औरेल स्टेईन याने लावला.
वैदिक संस्कृती
वैदिक संस्कृतीचे दोन कालखंडात विभाजन करतात.
१) ऋग्वेदी कालखंड – ( इ. स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व १०००) ऋग्वेदी कालखंड हा आर्याचा भारतातील प्रारंभिक कालखंड आहे.
२) उत्तर वैदिक कालखंड – ( इ. स. पूर्व १००० ते इ. स.पूर्व. ५००) आर्याच्या भटकंती जीवनास स्थिरता प्राप्त झाली. शेतीचा हळूहळू विस्तार.
ऋग्वेदी कालखंड  – या काळात वेदांची निर्मिती झाली म्हणून आर्याच्या या संस्कृतीला वैदिक संस्कृती म्हणतात. वेद हा शब्द संस्कृत भाषेतील असून तो विद या धातूपासून बनलेला आहे. विद म्हणजे ज्ञान होणे. हिंदू लोकांची अशी श्रद्धा आहे की, वेद हे अपौरुषेय आहेत ते कोणत्याही मानवाच्या हातून लिहिले गेलेले नाहीत. त्यांची रचना परमेश्वराने केली आहे. ऋग्वेद हा आर्याचा पहिला ग्रंथ होता. आर्याच्या साहित्यनिर्मितीवरून आर्याच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचा आढावा घेता येतो.
धार्मिक जीवन
ऋग्वेदातील सर्वात महत्त्वाची देवता इंद्र. याला पुरंदर या नावाने ओळखले जायचे. त्याचा अर्थ दुर्ग नष्ट करणारा.
१) इंद्र :- ऋग्वेदात २५० ऋचा इंद्राला अर्पन केल्या आहेत. पर्जन्याची देवता, दुर्ग नष्ट करणारी देवता, राक्षसांविरुद्ध लढणारा व आर्याना विजयी करणारी देवता.
२) अग्नी :- ऋग्वेदातील २०० ऋचा अग्नीला अर्पण केलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाची देवता देव आणि सामान्य लोकांतील दुवा म्हणून भूमिका.
३) वरूण :- ऋग्वेदातील २०० ऋचा वरूणाला अर्पण तिसरी महत्त्वाची देवता, नसर्गिक देवता नसर्गिक व्यवस्थेचा आधार मानला जात असे.
४) सोम :- वनस्पतींची देवता.
५) मरूत :- वायुदेवता.
६) आदिती उषस :- स्त्री देवता ( ऋग्वेदात उल्लेख)
वैदिक वाङ्मय :- वेद हा शब्द संस्कृत भाषेतील असून तो विद या धातूपासून बनलेला आहे. विद म्हणजे ज्ञान होणे. हिंदू लोकांची अशी श्रध्दा आहे की वेद हे अपौरुषेय आहेत. ते कोणत्याही मानवाच्या हातून लिहिले गेलेले नसून त्यांची रचना परमेश्वराने केली आहे. पूर्वी लिखाणाची कला मानवाला अवगत नव्हती. वैदिक वाङ्मयात चार प्रकारच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो- संहिता, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषदे
संहिता – सर्व संहितांमध्ये ऋग्वेद हा आद्यवेद मानला जातो.
ऋग्वेद – तो सर्वात प्राचीन वेद आहे. ऋग्वेदात दहा मंडले असून १०२८ सूक्ते  आहेत. ही सूक्ते भिन्नसमयी भिन्न ऋषींनी रचिली आहेत. यापकी दोन ते सात मंडले ही प्राचीनतम आहेत. तिसऱ्या मंडलात गायत्री मंत्र सांगितलेला आहे. सातव्या मंडलात दशराजजन्य युद्धाचा उल्लेख आहे. नवव्या मंडलात सोमाचे वर्णन केले आहे. पहिले आणि दहावे मंडल हे अर्वाचीन मानले जाते. ऋग्वेदातील सूक्ते फक्त पुरुषांनीच लिहिली नाहीत, तर यात स्त्रियांचाही मोठा वाटा होता. ऋग्वेदातील देवता म्हणजे निसर्गाने धारण केलेली विविध रूपे होत.
सामवेद –  सामन म्हणजे स्वर किंवा छंद, म्हणून सामदेवाला स्वरशास्त्र म्हणतात. भारतीय संगीताचा उगम आपणास सामवेदात आढळतो. सामवेदात १५४९ किंवा १८१० ऋचा आहेत. परंतु, यापकी केवळ ७५ ऋचाच स्वतंत्र किंवा नवीन रचिल्या आहेत. बाकीच्या सर्व ऋचा ऋग्वेदातून घेतल्या आहेत. गाण्याचे राग शिकवणे हा सामवेदाचा प्रमुख हेतू होता. सामवेदापासून आपल्याला भारतीय संगीतशास्त्राचा इतिहास माहीत होतो.
यजुर्वेद – यजूस याचा अर्थ मंत्र किंवा सूक्त. यज्ञविधीवेळी म्हणावयाचे मंत्र या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. आर्य जेव्हा गंगा-यमुनेच्या खोऱ्यात स्थायिक झाले तेव्हा त्यांच्या नित्य जीवनात यज्ञयाग, गृहकृत्ये यांना महत्त्व प्राप्त झाले. यज्ञ कसे करावे, कोणत्या वेळी करावे, यज्ञाच्या वेळी कोणते मंत्र म्हणावे इत्यादी सर्व माहिती आहे. म्हणून या वेदाला यज्ञवेद असेही म्हणतात. या वेदाचे शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद असे दोन प्रकार आहेत. साहित्यिक दृष्टीने विचार केला तर यजुर्वेद हा रुक्ष व नीरस वाटतो. कारण यात कर्मकांडाचेच वर्णन आहे. परंतु या वेदातून आपणास आर्याची यज्ञसंस्था कशी विकसित होत गेली याचे ज्ञान मिळते.
अथर्ववेद – अथर्वन लोकांचा वेद म्हणून यास अथर्ववेद म्हणतात. पूर्वीच्या काळी अग्नीची उपासना करणाऱ्या पुरोहितांना अथर्वन म्हणत. या वेदांपकी एकतृतीयांश भाग ऋग्वेदातून जसाचा तसा घेतला आहे. अथर्ववेद हा पहिल्या तीन वेदांपेक्षा भिन्न वाटतो. यातील भाषा, विचार आणि तत्त्वज्ञान हे पहिल्या तीन वेदांपेक्षा वेगळे आहेत. या वेदात अंत्यविधी, रोग बरे करणे, राक्षसांचा व शत्रूंचा नाश
करणे, राज्याभिषेकसमयी म्हणावयाचे मंत्र, कामशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादी अनेक विषय चर्चिले आहेत. अथर्ववेद म्हणजे आयुर्वेदशास्त्राचा प्रारंभ होय. यात अनेक रोग आणि त्यावरील औषधांची माहितीही वाचायला मिळते. अथर्ववेदात तंत्रज्ञानविषयक विचारही मांडलेले आढळतात. अशा रीतीने अथर्ववेदाचे स्वरूप हे सार्वत्रिक आहे. प्रत्येकाला सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, हा या वेदाचा उदात्त हेतू आहे.
ब्राह्मणे- वेदांतर निर्माण झालेले वैदिक वाङ्मय म्हणजे ब्राह्मणे ही होत. वेदानंतर वेदांचा अर्थ व यज्ञविधी लोकांना समजणे कठीण जाऊ लागले. म्हणून जे ग्रंथ निर्माण झाले, त्यांना ब्राह्मणे असे म्हणतात. ब्राह्म म्हणजे यज्ञकर्मामधील एखाद्या मुद्दय़ावर विद्वान पुरोहिताने केलेले स्पष्टीकरण, अशा स्पष्टीकरणाचा संग्रह ज्या ग्रंथात आहे ते, ग्रंथ म्हणजे ब्राह्मण्ये होत.
आरण्यके – ब्राह्मण ग्रंथाच्या शेवटच्या भागाला आरण्यके म्हणतात. ब्राह्मण ग्रंथ लिहूनही ज्या गोष्टींचे पुरेसे स्पष्टीकरण झाले नाही, अशा गोष्टींचे स्पष्टीकरण या ग्रंथात आढळते. यज्ञकर्म व त्यामागील पाश्र्वभूमी यांचा विचार निवांत जागी अरण्यात बसून होऊ लागला. हा विचार संग्रहित केलेले ग्रंथ म्हणजे आरण्यके होत. आरण्यके ग्रंथ म्हणजे ब्राह्मण्ये आणि उपनिषद ग्रंथ यातील दुवा समजले जातात.
उपनिषदे – वेदग्रंथाच्या निर्मितीनंतर यज्ञसंस्थेचे महत्त्व फारच वाढले. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी यज्ञाशिवाय दुसरा मार्ग शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण त्याची शेवटची परिणती आपणास उपनिषदे या ग्रंथात झालेली आढळते. उपनिषद या शब्दाचा अर्थ (उप+नि+सद) म्हणजे गुरूच्या जवळ बसून ज्ञान-प्राप्ती करणे हा आहे. उपनिषद ग्रंथ ब्राह्मण ग्रंथाच्या शेवटी येतात. म्हणून यांना वेदांत असेही म्हणतात. उपनिषदांची एकूण संख्या किती आहे, हे सांगणे कठीण आहे. उपनिषदात विश्व, ब्रह्म, आत्मा आणि सत्य यांचा विचार केलेला आढळतो. विश्वाची निर्मिती ब्रह्मापासून झाली. ब्रह्म म्हणजेच अंतिम सत्य. हे ब्रह्म मानवात आत्मा या नावाने निवास करते. ब्रह्म म्हणजे आत्मा.
वेदांगे – वेदांचा विस्तार जास्त असून, आकलन होण्यास कठीण व मुखोद्गत असल्याने अवघड वाटते. अनेक विद्वान ऋषींनी हे ज्ञान सूत्ररूपात मांडले. तेच वेदांग म्हटले जाते. वेदांगे हा काही एक ग्रंथ नाही. तो एक सहा ग्रंथांचा संच आहे. प्रत्येक ग्रंथ हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी ही सहा वेदांगे आहेत.
शिक्षा – वेद पठणाचे व गायनाचे नियम, प्रत्येक मंत्रातील शब्दांचा उच्चार व आघात यासंबंधीची माहिती आणि त्यातील पदज्ञान शिक्षा व वेदांगात अंतर्भूत आहेत.
कल्पसूत्रे – मानवी जीवन नियमबद्ध करणारे अनेक आचार-विचार यज्ञ विधी, यज्ञ कुंड रचना इत्यादींची माहिती देणारे हे साहित्य होय. याचे चार विभाग आहेत- श्रोतसूत्र, गृहसूत्र, धर्मसूत्र, शुल्बसूत्र.
व्याकरण – वेदांची संस्कृत भाषा व तिची रचना समजून घेण्यासाठी व्याकरण शास्त्रात जन्मले. आज मात्र वैदिक व्याकरण उपलब्ध नाही. नंतरचा अष्टाध्यायी ग्रंथ आधारभूत आहे व त्याला वेद वाङ्मयाचे व्याकरण म्हणतात.
निघंटू – वेदातील कठीण शब्दांचा अर्थ सांगणारा निघंटू नावाचा शब्दकोश कश्यपहरींनी तयार केला होता.
निरुक्त – यात वैदिक शब्दांची उत्पत्ती व त्यांच्या अर्थाचे वर्णन केलेले आहे.
छंदशास्त्र –  वैदिक मंत्राचे तालसुरात उच्चारण यात दिले आहे.
ज्योतिष – यज्ञ हे विशिष्ट काळात, विशिष्ट मुहूर्तावर करावयाचे असतात. सूर्य, चंद्र व आकाशातील इतर ग्रहांच्या गतीवरून ही कालगणना तयार करण्यात येते. त्यासंबंधीचे सर्वशास्त्रीय विवेचन या ग्रंथात करण्यात आले आहे.
उपवेद –  या सहा ग्रंथात वैदिक वाङ्मयाची पूरक शास्त्रे म्हणता येतील. औषधोपचाराविषयी माहिती पुरविणारा ग्रंथ आयुर्वेद तर युद्ध कलाविषयक माहितीचे शास्त्र म्हणजे धनुर्वेद संगीत कलेची उकल करणारे शास्त्र गांधर्ववेद स्थापत्य कलाशास्त्रांची माहिती पुरविणारे शास्त्र हे शिल्पवेद.
वैदिक काळातील मंत्रिमंडळाची पदे व कर्तव्ये  –
१) राजन्य – या पदावर राजपुत्र राज परिवार सरदार यांपैकी क्षत्रिय व्यक्ती असे.
२) माहिषी – पट्टराणी हे पद देत तिने नाजूक बाबींवर व संकटकालीन सल्ला द्यावा.
३) पुरोहित – हा राजाला धर्म प्रमुख राहून व संकटकाळी मदत करणारा.
४) सेनानी – हा सन्य प्रमुख असे.
५) सूत – हे राजाचे खासगी अधिकारी व सारथी.
६) संग्रहित – हा अर्थ व्यवहार सांभाळणारा कोषाध्यक्ष होय.
७) भागदूत – हा कर वसुली करणारा.
८) ग्रामणी – हा ग्रामप्रमुख या पदाचे कार्य पाहत असे.
९) अक्षवप- हा अधिकारी जुगार निरीक्षक व नियंत्रक होता.
आश्रमव्यवस्था
ब्रह्मचर्याश्रम (२५ वर्षे)- जीवनाच्या या प्रथमावस्थेचा आरंभ वयाच्या ८ ते १२ व्या वर्षी मौजी बंधनानंतर  ज्ञानार्जनासाठी गुरुग्रही प्रवेश करून होत असे. तेथे अनेक समवयस्कांसमवेत गुरुसेवा व आज्ञापालन करून हे ब्रह्मचारी राहात.
गृहस्थाश्रम (२६ ते ५० वर्षे)- ही ऐन तारुण्याची अवस्था होय. संसारी जीवनाची ही प्रथमावस्था होय. विवाह व वैवाहिक जीवनाची जबाबदारी पेलण्याचे हे वय. पित्याला वानप्रस्थाश्रमी जाण्यास मदत करणे व स्वत: गृहस्थाश्रमाची जबाबदारी पेलणे हे आद्य कर्तव्य होते.
  वानप्रस्थाश्रम (५१ ते ७५ वर्षे )- वृद्धावस्थेपूर्वीची ही प्रौढ अवस्था होय. संसार मोह त्यागून जगण्याचा हा प्रयत्न, ऐहिक बंधने त्यागून पारलौकिक सुखासाठी कष्ट सोसण्याची ही पूर्वतयारी होय. या सवयींमुळे संन्यासाश्रमाची वाट मोकळी होते असा समज होता.
संन्यासाश्रम (७६ ते १०० वर्षे) – सर्व मायेचे पाश तोडून वैराग्यवृत्ती पत्करून एकांतवास पत्करला की, षङ्रिपूंचे दमन होते. गुरु ऋणमुक्ती, देव स्मरण, चिंतन, ध्यान व मोक्षाकडे नेणारा हा आश्रम होय.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...