Thursday 10 December 2020

महेंद्रगिरी



महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.


पुराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.


बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.


महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.


ब्रिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.


या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...