क्रियापद व त्याचे प्रकार

क्रियापद व त्याचे प्रकार

वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा.

गाय दूध देते.
आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो.
मुलांनी खरे बोलावे.
आमच्या संघाचे ढाल जिंकली.
धातु :

क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातु’ असे म्हणतात.

उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी.

धातुसाधीते/ कृदंते :

धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्‍या शब्दांना ‘धातुसाधीत’ किंवा ‘कृंदते’ असे म्हणतात.
धातुसाधीते वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येतात.
धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.
फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते.
उदा.   

क्रियापदे- केले, करतो, बसला, लिहितो, खातो.
धातुसाधिते- करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना.
धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (धावणे-धातुसाधीत, असते-क्रियापद)
त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत. (खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत, आहेत-क्रियापद)
जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले. (बुडतांना- क्रियाविशेषण, बुडतांना-धातुसाधीते, पाहिले–क्रियापद)
त्याचे हसणे लांबूनच एकू आले. (हसणे – नाम, हसणे-धातुसाधीत, आले–क्रियापद)
(टीप :एखादे वाक्य सकर्मक किंवा अकर्मक आहे हे कसे ओळखावे. ओळखण्याची क्रिया कोणावर होते व वाक्यातील क्रिया करणारा/ करणारी कोण असा प्रश्न विचारले असता उत्तर दोन भेटतात. म्हणजे उत्तर वेगवेगळे तर सकर्मक व जर उत्तर एकच भेटत असेल तर ते अकर्मक क्रियापद).

क्रियापदांचे प्रकार :

क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात.

सकर्मक क्रियापद
अकर्मक क्रियापद
1. सकर्मक क्रियापद –

ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. 

गाय दूध देते.
पक्षी मासा पकडतो.
गवळी धार काढतो.
राम आंबा खातो.
अनुराग निबंध लिहितो.
आरोही लाडू खाते.

2. अकर्मक क्रियापद –

ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते. म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते त्यांना ‘अकर्मक क्रियापदे’ असे म्हणतात.
उदा.   

मी रस्त्यात पडलो.
तो बसला.
आज भाऊबीज आहे.
तो दररोज शाळेत जातो.
(टीप : जेव्हा क्रिया कोणावर होते व क्रिया करणारा/करणारी कोण असे प्रश्न विचारले असता दोन्ही प्रश्नांचे उत्तर हे एकच सारखीच मिळतात त्याला ‘अकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.)
क्रियापदांचे इतर प्रकार :

व्दिकर्मक क्रियापदे –

ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास ‘व्दिकर्मक’ असे म्हणतात किंवा ज्या वाक्यातील क्रिया ही कर्त्यांकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास ‘व्दिकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

आजीने नातीला गोष्ट सांगितली. (आजी – कर्ता, नातीने – अप्रत्यक्ष कर्म, गोष्ट- प्रत्यक्ष कर्म, सांगितले- व्दिकर्मक क्रियापद)
गुरुजी विधार्थ्यांना व्याकरण शिकवितात.
मुलीने भिकार्यायला पैसा दिला.
(प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तूवाचक असते व त्याची विभक्ती ही प्रथमा/ व्दितिया असते. अप्रत्यक्ष कर्म हे नेहमी व्यक्तिवाचक असते व त्याची विभक्ती ही नेहमी चतुर्थी असते.)
उभयविध क्रियापदे –

जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास ‘उभयविध क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

त्याने घराचे दार उघडले. (सकर्मक क्रियापद)
त्यांच्या घराचे दार उघडले. (अकर्मक क्रियापद)
रामाने धनुष्य मोडले. (सकर्मक क्रियापद)
ते लाकडी धनुष्य मोडले. (अकर्मक क्रियापद)
अपूर्ण विधान क्रियापद –

जेव्हा वाक्यात क्रियापद असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तेव्हा अशा क्रियापदास ‘अपूर्ण विधान क्रियापद’ असे म्हणतात. अशावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाव्यतिरिक्त ज्या शब्दांची गरज असते त्याला ‘विधान पूरक’ किंवा ‘पूरक’ असे म्हणतात.
उदा.

राम झाला.
राम राजा झाला. (राजा–विधानपूरक)
मुलगा आहे.
मुलगा हुशार आहे. (हुशार-विधानपूरक)
(टीप : नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जर नामापूर्वी आला तर त्याला विशेषण म्हणतात आणि नंतर आला तर त्याला पूरक/विधक पूरक असे म्हणतात.)
संयुक्त क्रियापद –

धातुसाधीत व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास ‘संयुक्त क्रियापद’ असे म्हणतात. मात्र या दोन्ही शब्दांमधून कोणत्याही एकच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे.
(धातुसाधीत+सहाय्यक क्रियापद= संयुक्त क्रियापद)
उदा.

क्रिडांगणावर मुले खेळू लागली. (खेळू=धातुसाधीत, लागली=सहाय्यक क्रियापद)
बाळ एवढा लाडू खाऊन टाक (खाऊन=धातुसाधीत, टाक=सहाय्यक क्रियापद)
सहाय्यक क्रियापद –

जेव्हा धातुसाधीत व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधीताला मदत/सहाय्य करणार्‍या क्रियापदाला ‘सहाय्यक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.   

क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
बाळ एवढा लाडू खाऊन टाक.
सिद्ध क्रियापद –

जा, ये, कर, ऊठ, बस, असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात व या सिद्ध धातूना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदाला ‘सिद्ध क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

तो दररोज शाळेत जातो.
ती खूप अभ्यास करते.
सूर्य पूर्वेस उगवतो.
आम्ही सकाळी लवकर उठतो.
साधीत क्रियापद –

विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणार्‍या धातूंना ‘साधीत धातू’ असे म्हणतात व अशा साधीत धातुंना प्रत्यय लागून तयार होणार्‍या क्रियापदांना ‘साधीत क्रियापदे’ असे म्हणतात.
उदा.

हात-हाताळ-हाताळणे/ते/तात.
स्थिर-स्थिराव-स्थिरावतो/ला/वेल.
पुढे-पुढार-पुढारले/पुढारतात.
आण-आणव-आणवली
पाणी-पाणाव-पाणावले.
उदा.   

माझ्या कपटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो.
तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिरावला.
आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले.
आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली.
खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.
प्रायोजक क्रियापदे –

जेव्हा कर्ता ती क्रिया स्वत: करीत नसून दुसर्‍या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदास ‘प्रायोजक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

आई मुलांना हसविते.
तो मुलांना रडवितो.
त्याने त्याच्या मित्राला तुरुंगातून सोडविले.
तो मुलांना खेळवितो.
आई बाळाला निजविते.
तो गुरे चारतो.
शक्य क्रियापद –

वाक्यामधील ज्या क्रियापदाव्दारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते. त्या क्रियापदाला शक्य क्रियापदे म्हणतात.
उदा.

मला आता काम करवते.
त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.
मला दररोज 20 कि.मी. चालविते.
बाईंना वह्या वर्गात आणवत नाही.
अनियमित/गौण क्रियापद –

मराठीत काही धातू असे आहेत त्यांना काळांचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोडया वेगळ्याच प्रकारे चालतात, त्यांना ‘अनियमित/गौण क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

मुलांनी सतत खेळू नये.
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
या दरवाजाने जाऊ नको.
परमेश्र्वर सर्वत्र आहे.
मला कॉफी पाहिजे.
असे वागणे बारे नव्हे.
आई घरी नाही.
भावकर्तुक क्रियापदे –

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना ‘भावकर्तृक क्रियापद’ असे म्हणतात.
उदा.

मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.
पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळते.
पुण्यात जातांना कात्रज जवळ उजाडले.
आज दिवसभर सारखे गडगडते.

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...