Monday 18 March 2024

दमा म्हणजे नेमके काय


रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.


 दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.


 दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.


 दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.


 दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.


 दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.


No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...