Monday 25 April 2022

महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती

महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती


महाराष्ट्राच्या  एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते.
महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्यक्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते.
महाराष्ट्रात दगडी कोळसा, मँगनीज, लोह खनिज, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात.
महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ  इत्यादी जिल्हे येतात.
शिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी ठिकाणी देखील खनिजे आढळतात.
1] लोहखनिज :
भारतातील एकूण लोहखनिजाच्या साठ्यांपैकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात  लोहखनिजाचे साठे प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळतात.

पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड येथील लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत .


चंद्रपूर : चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत.
गडचिरोली : गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात.
गोंदिया : गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्यात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.
सिंधुदुर्ग : या जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकड्यांत दोन किमीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत.
कोल्हापूर : या जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.
2] बॉक्साइट :
बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनिअम निर्मितीसाठी केला जातो.

भारतातील सुमारे २१ टक्के बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे उच्च प्रतीचे आहेत. ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्यांत आढळतात.

कोल्हापूर :  शाहूवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साईटचे साठे आढळतात. येथील बॉक्साईटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनिअम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनिअम कारखान्यात धातुनिर्मितीसाठी होतो.
रायगड : या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने मुरुड, रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.
ठाणे : या जिल्ह्यात सालसेट बेट व तुगार टेकड्यांच्या प्रदेशात बॉक्साईटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांव्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साईटचे साठे आढळतात. बॉक्साईटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.
3]मँगनीज :
भारतातील एकूण मँगनीज साठ्यांपैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनीजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांत आढळतात.

भंडारा : या जिल्ह्यात आढळणारे मँगनीजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.
नागपूर : या जिल्ह्यात मँगनीज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासून पूर्वेस, रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्यात कांद्री, मनसर, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनीजचे साठे आढळतात.
सिंधुदुर्ग : या जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनीजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनीजचे साठे आढळतात.


4]चुनखडी :
बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासून तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर ह्या जिल्ह्यांत आढळतात.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे सर्वांत जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदूरबार, नांदेड इत्यादी ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात वरोरा व राजुरा ङ्मा तालुक्यांत चुनखडीचे साठे आढळतात.
5] डोलोमाईट :
याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलादनिर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो.
डोलोमाईट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर ह्या जिल्ह्यांतही थोडे साठे आढळतात.
भारतातील डोलोमाईटच्या एकूण साठ्यांपैकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो.
6]कायनाईट :
हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिमेंट उद्योग इत्यादी ठिकाणी कायनाईटचा उपयोग होतो.
महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया ह्या जिल्ह्यांत कायनाईटचे साठे आढळतात.
7] मीठ :
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत विशेषत: रायगड, ठाणे, मुंबईलगतच्या भागात मीठ तयार केले जाते.
मिठाचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त रासायनिक उद्योगातही केला जातो.


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...